? इंद्रधनुष्य ?

☆ हट्ट… अट्टाहास… आणि दुराग्रह… भाग -2… डाॅ. श्रीराम गीत ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

( यातून मनात असूयेचा प्रवेश होतो.) इथून पुढे —- 

मी का नाही? मला का नाही? मला नाही तर कोणालाच नाही ! असा हा सारा अट्टाहास असतो.

मर्चंट नेव्हीमध्ये खूप पैसे असतात. पहिला पगार दीड लाख रुपयांचा असतो. पायलट बनले तर जगभर हिंडता येते. त्यासाठीचा खर्च मोठा असला तरी दोनतीन वर्षात फेडता येतील इतके पैसे मिळतात. मालिका आणि मॉडेलिंगमध्ये एकदा शिरकाव झाला की मजाच मजा. कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यावर अमेरिका तर नक्कीच. गेम खेळून आणि युट्युबवर व्हिडिओ टाकून लाखो रुपये मिळतात. क्रिकेट खेळणे हा मुलांचा, तर कथ्थकचा क्लास लावणे हा मुलींचा आवडीचा विषय, पाहता-पाहता करियरच्या अट्टाहासात बदलतो. परदेशी भाषा शिकली म्हणजे आपण त्या देशाचे नागरिकच बनलो हा गैरसमज  आठवी-नववीत घेतलेल्या परदेशी भाषेपासून सुरू होतो. अशा रंजनाला दिवास्वप्नाचे स्वरूप कधी येते ते कळेनासे होते.

मम्मी-पप्पांची सुद्धा अशीच अट्टाहासाची विविध रूपे पाहायला मिळतात. मुलाला फायनान्स मध्ये घालूयात, पदवीसाठीच परदेशात शिकायला पाठवू, डॉक्टर बनवायला हरकत काय आहे, शिकेल कॉम्प्युटर आणि जाईल आयटीत, एनडीए मध्येच घालून टाकू, असे म्हणता म्हणता ही गाडी पगारावर येते. म्हणजे इतके शिकून लाखभर रुपये सुद्धा नाहीत मिळणार? या अट्टाहासाला यथावकाश पूर्णविराम मिळणार असतो. पण निराशेचे सावट ओढवून घेतलेले असते हे नक्की.

दुराग्रहाचे बळी कसे असतात? पस्तिशीतला एखादा भकास चेहरा पाहिला, हरकाम्याची नोकरी करत जेमतेम मिळवणारी एखादी व्यक्ती पाहिली, निवृत्त आईवडिलांच्या पेन्शनच्या आधारावर राहणारा बेकार मुलगा पाहिला, किंवा तीन पदव्या हाती असूनही नोकरी न मिळालेली तीस-बत्तीसची मुलगी पाहिली तर माझी उत्सुकता करिअर कौन्सेलर म्हणून जरा चाळवते. बहुदा थक्क करणारी माहिती मला मिळते. खऱ्या अर्थाने ज्याला हुशार म्हणावे अशा वाटचालीतून यांचे शालेय शिक्षण झालेले असते. आई-वडील, नाहीतर स्वतः च्या  दुराग्रहातून नकोशा शाखेची, नकोशा पदवीची, भरपूर खर्चून घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणाची बाजार नियमानुसार किंमत शून्य असते. हे कळेपर्यंत वेळ गेलेली असते. उमेद संपलेली असते. हातातील पदवीतून मिळणारी नोकरी व पगार अत्यंत क्षुल्लक वाटल्याने नाकारले जाते.

पीडब्ल्यूडीतील वरिष्ठ सिव्हिल इंजिनियरने अट्टाहासाने मुलाला सिव्हिल इंजिनिअरिंगला  घातले. त्याला कला शाखेतून मास कम्युनिकेशन करण्याची खूप इच्छा होती. वडिलांच्या दुराग्रहापुढे त्याचे काहीच चालले नाही. आईने वडिलांच्या नोकरीतील सुबत्ता पाहिली असल्यामुळे तिचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला.  नोकरी मिळेना, मिळाली तर बिल्डर दहा हजार रुपये पगार द्यायला तयार. तेवढाच पॉकेटमनी घेणारा मुलगा नोकरीला नकार देत गेला. आई युपीएससीची परीक्षा दे म्हणून त्याच्या मागे लागली. मुलाने होकार दिला. पण ते मिळाले नाही. ना युपीएससी ना सिव्हिल इंजीनियरिंगमधली नोकरी. आता वडील व मुलगा दिवसभर समोरासमोर पेपर वाचत बसतात.

मोठ्या बँकेतील अधिकाऱ्याची मुलगी बी.कॉम. झाली. तिची इच्छा एम.बी.ए. करण्याची होती. आई-वडिलांनी नकार दिला व एम. काॅम. करताना बँकांच्या परीक्षा द्यायला भाग पाडले. एम.कॉम. झाली पण बँकेत नोकरी लागलीच नाही. माझ्या मुलीने किरकोळ अकाउंटंटची कामे करायची नाहीत, कारकुनी कामात तिने जायचे नाही हा पालकांचा अट्टाहास नडल्याने वयाच्या 32 व्या वर्षी ती आता आईला घरकामात मदत करते. 

साऊंड इंजिनियरिंगचा महागडा अभ्यासक्रम बारावीनंतर  पूर्ण करून मुलगा, त्यात काम नाही व अन्य काही करता येत नाही म्हणून नोकरीविना घरी बसून आहे. मी काम केले तर फक्त साऊंडमध्येच करणार हा त्याचा दुराग्रह.

घरातील एकाचा दुराग्रह दुसऱ्याच्या साऱ्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. अशी प्रत्येक क्षेत्रातील अनेक उदाहरणे आहेत. 

म्हणूनच हट्ट, अट्टाहास व दुराग्रह बाजूला ठेवून करियरचा विचार करा …. 

— समाप्त —

लेखक – डॉ. श्रीराम गीत

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments