डाॅ.निशिकांत श्रोत्री
पुस्तकावर बोलू काही
☆ निशिगंध – डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. जयमंगला पेशवा ☆
पुस्तकाचे नाव: निशिगंध
साहित्य प्रकार : भावगीत संग्रह
लेखक : डाॅ. निशिकान्त श्रोत्री
प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन
पृष्ठसंख्या : २१२ मूल्य रु. २००
निशिगंध -विविध भावतरंग
प्रत्येकाच्या मनात कवी दडलेला असतो असे म्हणतात. कधी त्याचे प्रखर तेज प्रकट होते ,तर कधी तो काजव्यासारखा रात्रीच्या अंधारात फक्त लुकलुकताना दिसतो. डॉ . निशिकांत श्रोत्री यांचा “निशिगंध” हाती आला आणि प्रथम पान उघडण्यापूर्वी शेवटच्या पानाने लक्ष वेधून घेतले . स्वतः निष्णात सर्जन असणारा माणूस साहित्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली लेखणीही तितक्याच सामर्थ्याने व कौशल्याने चालवू शकतो हे वाचून मी स्तिमित झाले. अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, काव्यसंग्रह त्यांनी लिहिले आहेतच, पण वैद्यकीय साहित्यदेखील त्यांनी समाजापुढे आणले आहे. इतक्या निरनिराळया प्रांतात ते सहजपणे वावरत आहेत .
“निशिगंध” मध्ये त्यांनी केलेले विषयाचे वर्गीकरण ही फार चांगली गोष्ट आहे. भक्तीपर काव्यांचा आस्वाद घेत असताना पुढचे पान जर शृंगाररसाच्या शब्दांनी नटलेले आले तर ते आपलं मन सहज स्वीकारू शकत नाही; किंवा प्रेमाच्या अनोख्या सुरेख रंगांचा आनंद घेत असताना पुढच्या कवितेतला समाजातील असूर आपल्याला त्रास देतो.
डॉ . श्रोत्रींचा ईश्वरावर, त्या अनाम तेजावर पूर्ण विश्वास आहे .गणेश, दत्तगुरु, किंवा कृष्ण त्यांना सारखीच भुरळ घालतात. साईबाबांचे तर ते परम भक्त आहेत. त्या दैवी सामर्थ्यांची आपल्याला अनुभूति यावी ही इच्छा मनात दडलेली आहेच आणि ते कधीतरी प्रत्यक्षात येईल अशी आशाही आहे. त्या तेजस्वी प्रकाशाच्या दर्शनास आपण अजून योग्य झालो नाही याची खंत मनात आहे .त्या तेजाला आवाहन करतानाही ते तेज व आपण यात अमर्याद अंतर आहे ही खंत आहे. आपल्यासाठी ईश्वरापर्यंतचा पल्ला फार दूरचा आहे अस वाटत असताना, “तो” प्रेमळ आहे, आपल्यातील कमतरतेसहित तो कधी तरी आपल्याला स्वीकारेल हा विश्वास सुद्धा आहे,
भवपाशाच्या मोहामधुनी सोडव रे मजला —
किंवा
अहंकार हा व्यर्थ जाहला, दीन जाहली प्रज्ञा
तुझ्या कृपेने सार्थ होउनी मुक्ती मिळावी अज्ञा —–या शब्दातून प्रभूची विनवणी करत असतांनाच “कार्य समर्पित फला न आशा ” असेही ते म्हणतात. प्रभूकडे आशीर्वाद मागतांना केवळ त्यांच्या चरणी समर्पण हीच इच्छा दर्शवतात. कवींच्या शब्दात किंचित निराशा डोकावते तरीही, तो सर्वज्ञ आपल्याला एक न एक दिवस निश्चित जवळ करेल असे “चिंतन” अखंड होते आहे. मनात प्रभूभेटीची आस आहे, हुरहूर आहे- त्यातून कवीमन कधी तरी हळूच बाहेर पडते आणि किंचित निराशेतून एक कोमल, सुंदर, सुरेख रंगांनी नटलेला प्रेमाचा कोंब हसतहसत डोकावतो. चांदण्याच्या सौंदर्यात रातराणीचा घमघमाट हलकेच मिसळतो. प्रीतीचे अबोल सूर हृदयाला जाऊन भिडतात; प्रेमातील अभंगत्व, मांगल्य जाणवते. हे धुंद करणारे गुपित वाऱ्याने कुणाला सांगू नये वाटते, त्याचवेळी आपली प्रेयसी आपल्याकडे पाठ तर फिरवणारनाही ना अशी भीती वाटते आहे आणि — “नको सोडूनी जाऊ” अशी विनवणी होते आहे .
मयूरपिसांच्या डोळ्यातून प्रियकराच्या स्वप्नात जाण्याचे आणि प्रेमाच्या विविध रंगाने दिपून जाऊन इंद्रधनूनेही नतमस्तक व्हावे असे प्रेयसीचे चित्र कवी मानसपटावर रेखाटत आहेत. प्रेमाचा ठेवा जपून ठेवावा, उधळून टाकू नये असे त्यांना वाटते. जरुरीनुसार प्रेमकवितात शारीरिक जवळीक आहे, पण कुठेही किंचितही वासनेची दुर्गंधी नाही. स्वच्छ नितळ विचार आहेत. जगण्याला प्रेमाचा आधार आवश्यक आहे हीच भावना आहे —
“ जे जगायला हवे ते क्षण मला देऊन जा ” —-
किंवा
“ दाटून मनीचे भाव आणले ,धुंडाळूनीया शब्द
प्रतिक्षेमध्ये सप्तसुरांच्या ते ही मुग्ध नि स्तब्ध “ — असे म्हणत असता एक हळुवार आणि आशेचा अलवार स्पर्श अनुभवावा असे कवीला वाटते .
एकतर्फी प्रेमाची भावना व्यक्त होताना दोघांनीही हातात हात घालून जीवनाचीही वाटचाल करावी ही इच्छा आहे “युगुल” मध्ये एकमेकांशिवाय जीवन व्यर्थ आहे, असे त्याला व तिलाही जाणवतांना दिसते. साथ कधी सुटू नये ही इच्छा आणि ती कधीही सुटणार नाही हा विश्वास आहे. अंतराय किंवा दुरावा नको हीच भावना आहे.
असे असतांनाही परिस्थितीपुढे कधी कधी मानव हतबल होतो . निळ्याभोर आकाशात सूर्याची केशरी किरणे बागडत असतानाच अभ्र दाटून यावे असे, ताटातुटीचे, विरहाचे क्षण येऊन ठेपतात आणि—-
“ फुलती स्वप्ने सुकून गेली विरून जायला ” —असे निराशेचे सूर हृदयी दाटून येतात. प्रीतीचा फुलोरा कोमेजून गेला असे वाटू लागते आणि मग —- “ भावना गोठून गेल्या , शब्द झाले पोरके ” अशी अवस्था अनुभवावी लागते; कशातच गोडी वाटत नाही. जोडीदाराशिवाय चांदणे, रोहिणी, रातराणीचा गंध काहीच मनाला मोहवू शकत नाही, जीवनातला आनंद, सौंदर्य सर्व संपल्यासारखे वाटते . भेट किंवा एकत्र जीवन प्रत्यक्षात न येणारे आहे हे शल्य उरी असतानाच निदान एकमेकांचे दर्शन तरी घडावे ही आस हृदयाला पोखरत राहते. एकांत हवासा वाटतो; इतरेजनांची जवळीक नकोशी वाटते. परंतु सुदैवाने एकमेकांची साथ मिळाली तर जीवन उमलून येते . स्पर्शातील कोवळी ओढ शब्दाशिवाय खूप काही सांगून जाते, एक तृप्तता जाणवू लागते .जीवन परिपूर्ण होते. धुंद क्षण सुखावून जातात.
विविध नात्यांनीही आयुष्याला परिपूर्णता लाभते. नात्यांचे निरनिराळे रंग कवीने दर्शवले आहेत. माता, पत्नी, अपत्ये, सखे-सोबती, सर्वांचे रंग निरनिराळया रंगछटांचे आहेत, एक तऱ्हेची तृप्ती देणारे आहेत.
स्त्री जीवन किती खडतर आहे याचीही जाणीव कवीला आहे . डॉक्टर म्हणून येणारे काही अनुभव त्यांच्या नजरेतून निसटले नाहीत .समाजातील राक्षसी वृतीच्या लोकांचा सामना समाजानेच एकजुटीने करायला हवा असे त्यांना वाटतेच, पण स्त्री जन्माच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या माणसाबद्दलचा राग त्यांच्या शब्दातून जाणवतो— “ माणूस तुझाच वैरी झाला ” यामध्ये त्यांची असहाय्यता खूप काही सांगून जाते व डॉक्टर म्हणून त्यांच्या सुसंस्कृत व सुशील मनाची एक घट्ट वीण जाणवते; मायेच्या नात्याची साक्ष आहे असे वाटते .
प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. डॉ. श्रोत्रींसारख्या यशस्वी सर्जन असून साहित्याच्या प्रांतात मनमुराद विहार करणाऱ्या पतीला खंबीर साथ देणाऱ्या डॉ .अपर्णा यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. आपल्या मताशी ठाम असणाऱ्या अपर्णा कोणत्याही प्रसंगाशी सडेतोड सामना करणाऱ्या आहेत . त्या नात्यातला हळुवारपणा, मैत्रीतले रेशमी धागे नेहमीच जपतात. वेळप्रसंगी कठोर वागावे-बोलावे लागले तरी शब्दांनी सभ्यतेची पायरी कधीच ओलांडली नाही. दुसऱ्याच्या जिव्हारी लागेल असे त्या कधीच बोलल्या नाहीत. त्या डॉ. निशिकांतच्या पाठीशी सदैव कोणत्याही परिस्तितीत ठामपणे उभ्या राहिल्या. डॉ अपर्णाविषयी निशिकांतच्या मनात प्रेम आहेच आहे परंतु त्यापेक्षा जास्त आधाराची भावना आहे— “ नाही मला जगायचेही जीवन तुझियाविना ” असे त्यांना वाटले तर त्यात आश्चर्य काय ? ही कविता वाचताना छान तर वाटेलच. सर्व जीवन अपर्णामय असल्याची कबुली ते देतात —-“ तुला न ठाऊक सामर्थ्य तुझे,जाणून घेई अपर्णा ”– अपर्णाशिवाय सर्व शून्य आहे.
“निशिगंध” काव्यसंग्रह वेगवेगळ्या सुवासिक फुलांचा गुच्छ असावा तसे डॉ. निशिकांत यांच्या मनातील विविध भावनांच्या लाटा-तरंग यांचे एकत्रीकरण आहे; त्यांच्या भावनांचा गंध आहे. सर्व सुरेख म्हणत असताना काही कमतरता नाहीत का, असे वाचकांच्या मनात येईल. पण काव्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत आविष्कार असल्याने त्या कमतरतेचा विचार नसावा..
आकाशवाणी व दूरदर्शन या दोन्ही माध्यमात डॉक्टरांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे . त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा ! त्यांना पुढच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या संधी मिळोत,अपर्णाची साथ सदैव लाभून पुढील जीवनही समृद्ध व्हावे!
त्यांच्यासारख्या सिद्धहस्त व प्रतिभावान लेखकाच्या शब्दांवर लिहावे इतकी पात्रता नसतानाही त्यांच्या शब्दांची भुरळ पडल्याने लिहायचे धाडस केले ! डॉक्टर तुमच्या आगामी “झुळूक” ची आम्ही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत .
परिचय : सौ. जयमंगला पेशवा
संपर्क – “रघुनाथ” पुणे, मोबाईल नं :९६५७५३९६७० फोन : २५६७६५७०
(ई-अभिव्यक्तीच्या वाचकांना हा संग्रह ५०% सवलतीच्या दरात मिळू शकेल. पाठवण्याचा खर्च वेगळा.)
👌👌👌 खुप छान लिहले आहे.!