श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ श्रद्धा आणि अनुभूती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(डॉक्टर शैलेश मेहतां विषयी अब्दुल कलामांची एक व्हिडीओ क्लिप आहे….ती ऐकून ही गोष्ट लिहिली आहे.)
१३ वर्षापूर्वीची, २००९ ची गोष्ट आहे.
सोनुलीका….. सहा वर्षाची गोंडस गोल चेहऱ्याची मुलगी. दिसायला तिच्या बंगाली आईवर गेली होती. तिचे नाव जरी सोनुलीका ठेवले होते तरीही तिला सगळे सोनुली म्हणत. सहा महिन्यापूर्वी सोनुली शाळेत तिच्या दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी जिना चढत असतांना अचानक चक्कर येऊन पडली.
सोनुलीच्या आई वडिलांनी पुढचे सहा महिने चिंतेत काढले. खूप डॉक्टर झाले. अनेक चाचण्या झाल्या तेव्हा समजले की, सोनुलीच्या हृदयात रक्तपुरवठा नीट होत नव्हता. हृदयात रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे होते. शस्त्रक्रिया करूनही सोनुली वाचेल ह्याची शाश्वती कोणताही डॉक्टर देत नव्हता आणि अशातच सोनुलीच्या वडिलांना डॉक्टर शैलेश मेहता हे नाव सुचविले गेले.
डॉक्टर शैलेश मेहता बडोद्यातील एक महान कार्डियाक सर्जन. ओपन हार्ट सर्जरीसाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किमान एक महिना आधी भेटीची वेळ घ्यावी लागते. सोनुलीच्या वडिलांनी काही ओळखी काढून डॉक्टर शैलेश मेहतांशी तडक संपर्क साधला आणि त्यांची एक आठवड्यानंतरची भेटीची वेळ नक्की केली.
त्या आठवड्यात सोनुलीच्या आईने सोनुलीसाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीचे साईबाबा ह्या ठिकाणी जाऊन त्यांना सोनुली बरी होण्यासाठी साकडे घातले. घरी आल्यावर ती सोनुलीला नेहमी प्रसाद देऊन देवावरच्या श्रद्धेच्या काही गोष्टी सांगत असे. देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि तोच आपला तारणहार आहे हे ती सोनुलीला निक्षून सांगत असे. सोनुलीच्या आईचा देवावरचा विश्वास, श्रद्धा ह्या स्वभावाच्या छटा छोटुल्या सोनुलीमध्येही आल्या होत्या. आतापर्यंत सोनुलीच्या एक लक्षात आले होते की आपल्याला काहीतरी मोठा आजार झाला आहे. पण आपले आई बाबा आणि देवबाप्पा आपल्याबरोबर असतांना आपण त्या आजारातून बाहेर पडणार ह्याची तिला खात्री होती.
एक आठवड्याने सोनुली आणि तिचे आई बाबा डॉक्टर शैलेश मेहतांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर शैलेश मेहतांच्या मदतनीस डॉक्टरांनी सोनुलीची सुरवातीची प्राथमिक तपासणी केली. सोनुलीचे आधीचे रिपोर्ट्स आणि तिला दिलेली औषध ह्याची सगळी माहिती घेऊन तिची फाईल डॉक्टर मेहतांच्या रूममध्ये त्यांच्या टेबलवर ठेवली गेली. काही वेळाने सोनुलीचा नंबर आला तसे सोनुली आणि तिचे आईबाबा डॉक्टर शैलेश मेहतांच्या केबिनमध्ये गेले.
डॉक्टर मेहतांनी सोनुलीला झोपवून तिला तपासले. सोनुलीला तपासतांना डॉक्टरांनी सोनुलीलाही काही प्रश्न विचारून तिला बोलके केले. सोनुलीही मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलत होती. सोनुलीला तपासून झाल्यावर डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स आणि पेपर्स बघायला सुरवात केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सोनुली आणि तिच्या आईला त्यांच्या केबिनमधून त्यांनी बाहेर पाठवले आणि सोनुलीच्या वडिलांना त्यांनी सोनुलीवर तातडीने ओपन हार्ट सर्जरी करायला लागेल आणि विशेष म्हणजे ते ऑपरेशन करूनही सोनुली वाचेल असे काही सांगता येणार नाही, तसेच ऑपरेशन करूनही फक्त १० टक्केच वाचायची शक्यता आहे, म्हणून ऑपरेशन करायचे आहे का नाही ह्याचा निर्णयही आत्ताच घ्यावा लागेल असे सांगितले. सोनुलीच्या वडिलांनी डॉक्टरांना तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आम्ही सोनुलीला तुमच्या हातात देत आहोत जे काय ठरवायचे आहे ते तुम्ही ठरवा, मी सगळ्या केसपेपर्सवर सही करून देतो असे सांगितले. डॉक्टरांनी एक आठवड्यानी ऑपरेशनचा दिवस ठरविला.
ऑपरेशनच्या दिवशी डॉक्टर ऑपरेशन रूममध्ये आले. ऑपरेशनरुममध्ये आल्यावर भुलीचे इंजेक्शन देण्याआधी आपल्या पेशंटशी बोलून त्याला धीर देण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता असे. त्यामुळे आजही ते सोनुलीच्याजवळ गेले. सोनुली बेडवर झोपली होती आणी तिच्या चेहऱ्यावर चिंतेची किंवा काळजीची कसलीही छटा नव्हती. तरीही नेहमीच्या सवयीप्रमाणे डॉक्टरांनी सोनुलीला विचारले, ” सोनुली बेटा, कशी आहेस.” सोनुलीने उत्तर दिले, ” मी एकदम ठीक आहे. पण मला तुम्हाला काही विचारायचे आहे. डॉक्टरकाका आईने मला सांगितले आहे की, तुम्ही माझे हृदय ओपन म्हणजेच उघडे करणार आहात खरे आहे का ? ” डॉक्टरांनी सांगितले, ” हो, बेटा, पण तू काळजी करू नकोस, अशातऱ्हेने मी ते उघडून बघणार आहे की तुला काही दुखणार नाही “. “नाही, नाही काका मला अजिबात काळजी नाही, मला फक्त तुम्हांला काही सांगायचे आहे ” सोनुलीने लगेच उत्तर दिले. ” मला आई नेहमी सांगते की, आपल्या हृदयात देवबाप्पा असतो. जेव्हा तुम्ही माझे हृदय उघडाल तेव्हा त्या हृदयातला देवबाप्पा तुम्हाला दिसेल. जेव्हा मी झोपून उठेन तेव्हा मला तुम्ही बघितलेला माझ्या हृदयातला देवबाप्पा कसा दिसतो तेवढे नक्की सांगा.” प्रथम डॉक्टर मेहतांना सोनुलीला काय उत्तर द्यायचे ते कळत नव्हते. जिचे ऑपरेशन सफल होण्याची शक्यता कमी आहे, जी आता भूल दिल्यानंतर परत उठेल का नाही हे सांगू शकत नाही तिला तिच्या हृदयात वसलेला देव कसा दिसतो ते सांगायचे ?…. ” नक्की नक्की बेटा” असे बोलून डॉक्टर त्यांच्या पुढच्या कामाला लागले.
ऑपरेशन टेबलवर सोनुली भुलीचे इंजेक्शन दिल्याने निश्चल झोपली होती. डॉक्टरांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या सगळ्या साथीदार डॉक्टरांना दक्ष राहण्यास सांगून ऑपरेशनला सुरवात केली. पुढील प्रत्येक क्षण महत्वाचा होता. काही वेळाने डॉक्टर सोनुलीच्या हृदयापर्यंत पोहोचले. हृदयात धमन्यांकडून रक्तप्रवाह होत नव्हता. डॉक्टरनी हृदयापर्यंत रक्त पोचण्यासाठी आधीच काही आराखडे तयार केले होते, पण ते आराखडे सगळे निष्क्रिय ठरत होते. खूप वेळ झाला असेल हृदयापर्यंत रक्तपुरवठा होत नव्हता. सगळे प्रयत्न करूनही रक्तपुरवठा होत नाही हे जेव्हा डॉक्टरांना कळले तेव्हा त्यांनी हार मानून सगळ्या टीमला सॉरी म्हणून ‘ सगळे संपले ‘ असे सांगितले. एक मिनिट झाला असेल डॉक्टर सोनुलीकडे नुसते बघत उभे होते. ऑपरेशनच्या आधीचे तिचे शेवटचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. देव हृदयात असतो असे तिच्या आईने तिला सांगितल्याने तिची खात्री होती, तिची श्रद्धा होती की तो आपल्याला वाचवणार. कुठे होता तो देव, आणि असता तर का नाही आला सोनुलीला वाचवायला. डॉक्टरांच्या मनात काहूर माजले होते. कधी नव्हे ते आज डॉक्टरांच्या डोळ्यातही पाणी आले होते. त्यांना सोनुली दिसत होती पण डोळ्यांतल्या पाण्यामुळे भुरकट दिसत होती आणि तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले डॉक्टर हृदयात रक्त पुरवठा चालू झाला आहे. हो खरंच हृदयात रक्तपुरवठा चालू झाला होता. अनपेक्षितपणे काहीतरी वेगळे घडले होते. डॉक्टरांनी परत जोमाने ऑपरेशनला सुरवात केली. जवळ जवळ पुढचे तीन तास डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि डॉक्टर शैलेश मेहतांनी सोनुलीची जी केस अशक्यप्राय वाटत होती तिच्यावर विजय मिळविला होता. सोनुलीची ओपन हार्ट सर्जरी यशस्वी झाली होती. सोनुली वाचली होती.
सोनुली शुद्धीवर आली आणि काही वेळाने डॉक्टर शैलेश मेहता तिला भेटायला आले तसे सोनुलीने नजरेनेच त्यांना विचारले ‘ देवबाप्पा कसा होता ‘— तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले, ” सोनुली बेटा, तुझ्या हृदयातल्या देवबाप्पाला मी बघितला असे मी तुला सांगू शकत नाही. पण तुझ्या हृदयातल्या देवबाप्पाला मी अनुभवला नक्की. बेटा तू तुझ्या देवबाप्पावर असाच विश्वास आणि श्रद्धा कायम ठेव पण बाप्पाला शोधत बसू नकोस, तो कसा दिसतो ह्याचा विचार करत बसू नकोस. फक्त त्याला अनुभवत जा. मला खात्री आहे देव तुझ्याबरोबर कायम तुझ्या हृदयात असणार आहे.
——ह्या प्रसंगानंतर डॉक्टर शैलेश मेहता– महान कार्डियाक सर्जन हे ओपन हार्ट सर्जरी करायच्या आधी देवाचे स्मरण करतात.
——श्रद्धा असली की, सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसत नसला तरी त्याची अनुभूती ही मिळतेच.
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈