? इंद्रधनुष्य ? 

☆ दृष्टांत… तांबड्या गणपती ☆ प्रस्तुती – सुश्री लता निमोणकर

श्री गजानन विजय ग्रंथानुसार श्री निमोणकर हे महाराष्ट्रात राहणारे गृहस्थ होते व यांना योगाभ्यास यावा अशी इच्छा होती. अनेक ठिकाणी फिरून अनेक लोकांना भेटून त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा ते हताश झाले व आपल्या दैवाला दोष देऊ लागले. तेव्हा अहमदनगरजवळ इगतपुरी तालुक्यात कपिलधारा नावाचे तीर्थ आहे, त्या तीर्थाजवळ त्यांना एक योगी भेटले.. त्या योग्यांनी त्यांना एक तांबडा खडा दिला व सांगितलं की या तांबड्या खड्यासमोर रोज योगाभ्यास करत जा….  असं म्हणून ते योगी गुप्त झाले. निमोणकरांना हुरहुर वाटायला लागली की हे योगी कोण होते, यांचं नाव गाव काय, तांबडा खडा दिला याचा अर्थ काय… काही दिवसांनी त्यांना तेच योगी पुन्हा भेटले.   निमोणकरांनी विचारलं की “ त्या दिवशी आपली भेट झाली, पण आपण आपलं नावगाव सांगितलं नाही,” तेव्हा महाराज थोडंसं रागवून त्यांना म्हणाले, “ तुला तांबडा खडा दिला होता त्यातच माझं नाव आहे. हा लाल रंगाचा दगड नर्मदेत सापडतो आणि याला नर्मद्या गणपती असे म्हणतात आणि म्हणून माझं नाव गणपती हे मी तुला सुचित केलं होतं. पण तुला ते समजलं नाही. म्हणून आता तुला आदेश आहे या खड्याच्या प्रभावाने तुला योगाभ्यास येईल. हा खडा आपल्या देवघरात ठेवून त्याच्यासमोर योगाभ्यास करत जा”… 

एवढे कथानक, एवढा दृष्टांत श्री गजानन विजयामध्ये आहे. परंतु या पुढील कथानक हे आम्हाला निमोणकरांच्या नातसुनेने सांगितले. ती म्हणाली की तेव्हा घरातल्या कोणालाही हे माहिती नव्हतं की यांच्याजवळ म्हणजेच निमोणकर या गृहस्थाजवळ हा तांबडा खडा आहे. ते काहीतरी नेहमी आपल्या कमरेतल्या धोतरात बांधून ठेवायचे.   बाह्य अंगावरून काही कोणाला कळत नव्हतं. कालमानाप्रमाणे काही दिवसांनी वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ते अहमदाबादकडे होते. गृहस्थ असल्यामुळे तिथेच त्यांना अग्निसंस्कार करण्यात आला. तो अग्निसंस्कार होत असताना कमरेच्या वरचा व खालचा भाग जळून राख झाला पण कमरेचा तेवढा भाग– त्याला अग्नी लागत नव्हता. तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले व विचार करू लागले की असं का झालं असेल? तेव्हा त्यांच्या मुलाला असं आठवलं की वडील काहीतरी आपल्या धोतराच्या सोग्यात बांधायचे. ते जर आपण काढलं तर कदाचित या भागाला सुद्धा अग्नी लागेल. तेव्हा बास घेऊन तो तांबडा खडा काढला गेला व लगेच त्या भागाला अग्नीस्पर्श झाला. तो तांबडा खडा आणि काही वस्तू त्यांनी अनेक वर्ष पेटीमध्ये जपून ठेवल्या. काही वर्षांनी एक अधिकारी गृहस्थ त्यांना भेटले.  निमोणकरांच्या मुलाला  त्यांनी असं सांगितलं की ‘ तुमच्या पेटीत तुम्ही काहीतरी कुलूप लावून ठेवलेलं आहे, ते  आपण बाहेर काढा व पूजा करा.’ तेव्हा त्यांनी पुन्हा पेटी उघडून तांबडा खडा काढला आणि रोज त्याची पूजा करायला लागले. असा हा ‘ तांबड्या गणपती ‘ ज्याला ‘ नर्मदा गणपती ‘ सुद्धा म्हणतात, तो आज ४० वर्ष त्यांच्या नातवाकडे आहे, जे रतलामला वास्तव्य करून आहेत. असा हा प्रासादिक गणपती.  महाराजांच्या कृपेने आम्हा सर्वांना त्याचे दर्शन घडले . जे लोक नाही येऊ शकले त्यांना सुद्धा दर्शन घडावं या हेतूने ही कथा व हा फोटो.  

– जय गजानन –

माहिती संग्राहिका : लता निमोणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments