श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘या सम हा’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

इतर कोणत्याही शब्दांसाठी त्यांच्या अर्थदृष्ट्या अनुरुप असे पर्यायी शब्द सहज सुचतात. सांगता येतात. चित्र हा शब्द मात्र याला अपवाद आहे. चित्र या शब्दाची असंख्य विविध आकर्षक रूपे सामावून घेणारा पर्यायी शब्द सहज सांगता येणार नाही.

चित्र या शब्दाची विविध रूपे आणि त्यात सामावलेल्या अर्थरंगांच्या वेगवेगळ्या छटा हेच या शब्दाचे सौंदर्य आहे.चित्रांचे जितके प्रकार तितकी त्याची रुपे.रेखाचित्र,रंगचित्र,तैलचित्र, जलरंगातलं चित्र, भित्तिचित्र, निसर्गचित्र, स्थिरचित्र, अर्कचित्र, व्यक्तिचित्र, छायाचित्र, त्रिमितिचित्र,हास्यचित्र,व्यंगचित्र असे असंख्य प्रकार.प्रत्येकाचं रुप, तंत्र, व्याकरण,निकष परस्पर भिन्न. तरीही ही सगळीच रुपं भावणारी ! हे सगळं सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधून तरी सापडेल का?

चित्रकला ही निसर्गाने माणसाला दिलेली एक अद्भूत देणगी आहे.चित्र या शब्दाची व्याप्ती अधोरेखित करणारी जशी विविध रुपे आहेत,तशीच चित्रकलेद्वारे होणाऱ्या अविष्कारातही वैविध्य आहे.त्यातील प्रत्येक आविष्कारासाठी लागणाऱ्या कॅनव्हासचेही अनेक प्रकार.ड्राॅईंग पेपर,चित्रकलेच्या विविध आकाराच्या वह्या,अक्षरं गिरवण्यासाठी जशा सुलेखन वह्या तशीच रेखाटनांच्या सरावासाठीच्या सराव चित्रमाला!

हीच चित्रं जमिनीवर रेखाटली जातात ती रांगोळीच्या रुपात.या रांगोळ्यांच्याही कितीक त-हा.ठिपक्यांची रांगोळी,गालीचे, देवापुढे काढायची गोपद्म, शंख, स्वस्तिकांची रांगोळी,उंबऱ्यावरची रांगोळी,जेवणाच्या ताटाभोवतीची,औक्षण करण्यासाठीच्या पाटाखाली काढली जाणारी रांगोळी, आणि मग पाटाभोवती काढलेली सुबक महिरप, तसेच चैत्रागौर, ज्ञानकमळ  यासारखी वैशिष्ट्यपूर्ण रेखाटने ही सगळी चित्राचीच तर रुपे!

चित्रं मातीच्या झोपडीवजा घरांच्या भिंती सारवून त्या भिंतीवरही काढली जात.आदिवासी संस्कृतीतली वारली पेंटींगची कला ही तर आपला अमूल्य असा सांस्कृतिक ठेवाच आहेत!

चित्रं कागदावरच नाही तर कापडावरही काढली जातात.ती ‘फॅब्रिक पेंटींग’च्या विविध रुपात आविष्कृत होतात आणि वस्रप्रावरणांचं रुप खुलवतात.

चित्रकलेचं अनोखं असं एक वैशिष्ट्य म्हणजे ती एक स्वतंत्र कला जशी आहे तशीच इतर अनेक कलांचा अविभाज्य भागही बनलेली आहे. चलतचित्रांच्या सलग एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही रंगसंगती जपलेली आणि क्षणकाळात विरुन जाणारी  चित्रचौकटच असते.पूर्वीच्या काळात रंगभूमीवर वापरले जाणारे प्रसंगानुरुप स्थळं सूचित करणारे रंगीत पडदे,आणि आधुनिक रंगभूमीवरील नेपथ्य,रंग-वेशभूषेमधेही चित्रसौंदर्य अभिप्रेत आहेच. भरतनाट्य, कथ्थक यासारख्या शास्त्रीय-नृत्यप्रकारातल्या रंग-वेशभूषेने अधिकच खुलवलेल्या प्रत्येक मुद्रा या जिवंत चित्रेच म्हणता येतील.नृत्य सादरीकरण करता करता  नृत्याविष्कार करीत असतानाच क्षणात कॅनव्हासवर कुंचल्याच्या अलगद फटकाऱ्याने चित्रं रेखाटण्याची अचंबित करणारी कला नृत्य-चित्रकलेचा अनोखा मिलाफच म्हणावी लागेल.

नुकतीच समज आलेले लहान मूल प्रत्येक गोष्ट हाताळून बघण्याच्या औत्सुक्यापोटी एखादं पेन किंवा पेन्सिल असं कांही हाती लागलं की दिसेल तिथं रेघोट्या मारुन गिरगटा करीत बसते.हे करत असतानाची त्याची तल्लीनता भान हरपून चित्रात दंग होणाऱ्या कसलेल्या चित्रकाराच्या तल्लीनतेपेक्षा कणभरही कमी नसते.लहान मुलांचं हे गिरगटणं नेहमीच वेळ जायचं साधन असतं  असं नाही.अनेकदा मनातल्या सुप्त भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यमही असतं.म्हणूनच  अजाण मुलांनी भिंतीवर किंवा कागदांवर रेखाटलेल्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या चित्रातही त्यांच्या त्या त्या वेळच्या मनोवस्थांचे ठसे लपलेले असतात.ते शोधून काढण्याचे तंत्रही आता विकसित झालेले आहे जे वैद्यकीय क्षेत्रात मानसिक बालरुग्णांच्या बाबतीत योग्य निदान आणि उपचारांसाठी पूरक ठरते आहे.

व्यक्तिचित्र काढताना प्रत्यक्ष ती व्यक्ती किंवा  तिचं छायाचित्र पुढे ठेवून रेखाटन केलं जातं.अशी प्रत्यक्ष व्यक्तिप्रतिमा उपलब्ध नसेल तेव्हा त्या व्यक्तीचं वर्णन ऐकूनही त्याबरहुकूम हुबेहूब चित्र काढण्याची कलाही कांहीना अवगत असते.एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराच्या वर्णनाबरहुकूम काढलेली अशी रेखाटने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत ठरतात.

चित्र हा शब्द चित्रकलेचा अविभाज्य भाग जसा आहे तसाच अनेक अर्थपूर्ण शब्दांचा जन्मदाताही. चित्रकार,चित्रपट, चित्रकाव्य, चित्रदर्शी, चित्रमय, चित्ररथ, चित्रविचित्र, चित्रशाळा, चित्रीकरण,चित्रमाला,चित्रतारका असे कितीतरी शब्द !प्रत्येकाचे अर्थ,भाव,रंग,संदर्भ वेगवेगळे तरीही त्यात चित्र या शब्दातली एक रंगछटा अंतर्भूत आहेच.

असा चित्र हा शब्द!अल्पाक्षरी तरीही बहुआयामी !अनेक कंगोरे असणारा.म्हणूनच सुरुवातीला मी म्हंटलं तसं चित्र या शब्दाचा हा एवढा पैस सामावून घेणारा पर्यायी शब्द शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच चित्र या शब्दाला या सम हा असेच म्हणणे उचित ठरेल !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments