सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकावर बोलू काही
☆ नाते लडाखशी… सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तकाचे नाव – नाते लडाखशी
लेखिका – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित
प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा. ली.
मूल्य – १६० रु.
अमेज़न लिंक >> नाते लडाखशी – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित
नाते लडाखशी (एक आस्वादन)
अरुंधती दीक्षित या लडाख इथे दोन वर्षं वास्तव्यास होत्या. तिथली वेगळी भौगोलिक परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली वेगळी जीवनशैली , तिथले वेगळे अनुभव, याचं यथातथ्य मनोज्ञ दर्शन म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक नाते लडाखशी.
प्रवीण दीक्षित हे भारतीय पोलीस सेवेत ऑफिसर आहेत. लडाखला निवडणुका घ्यायचे निष्चित झाल्यावर त्यांची लडाखला बदली झाली आणि ते सपरिवार लडाखला दाखल झाले.
हा काळ ८९- ९० च. त्या काळात, इंटरनेट, गुगल सर्च, सेल फोन, मोबाईल, कॉम्प्युटर, इ मेल हे शब्दही ऐकिवात नव्हते. त्यांचं आधीचं वास्तव्य मुंबईतलं. अरुंधती म्हणते, ‘मुंबई आणि लडाख यात जमीन आस्मानाचं अंतर आहे, हे अनुभवायला मिळालं.’ ( यापुढे लेखामधे लेखिका असा शब्द न वापरता, अरुंधती हे तिचे नावच वापरेन. )
चंदिगडहून विमान लेहला पोचलं. विमानाची चाके जमिनीला टेकली आणि आतील प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा करत टाळ्या वाजवल्या. यात एवढं आनंदीत होण्यासारखं काय आहे, अरुंधतीला प्रश्न पडला. शेजारचा म्हणाला, ‘मॅडम, ले (लेह) का मोसम बंबईकी फॅशन . सुबह एक शाम को चेंज!’ नंतर कळलं, गेले पंध्रा दिवस वाईट हवामानामुळे इथे विमान उतरूच शकले नाही. स्वत:ला नशीबवान समजत सगळे बाहेर आले. बाहेर येताक्षणी अरुंधतीला लडाखचं पहिलं दर्शन झालं, ते असं – ‘विस्तीर्ण पिवळं पठार…. वर निळं… निळंशार आकाश… आभाळाशी स्पर्धा करणारे, बर्फामधे डोकी बुचकाळून आलेले अती अती उंच उंच डोंगर!… चमचमणारा सोन्याचा सूर्य. अंगाला जाणवणारा सुखद गारवा.’
लडाख हे ९८००० स्क्वे. कि. मी. क्षेत्र असलेले विस्तीर्ण पठार आहे. याचे दोन जिल्हे. कारागील आणि लेह. लेह जिल्ह्यातील लेह गावात त्यांचे वास्तव्य असणार होतं. हे अतिशय उंचीवरचं थंड गाव. पण तिथे लेह न म्हणता त्याला ‘ले’ म्हणतात. ले म्हणजे लडाखी भाषेत खिंडींनीयुक्त. तिथे खरडुंगला , झोजीला, तगलाकला, चांगला अशा अनेक खिंडी आहेत. पुढे लडाखचं सौंदर्य, भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण याचे वर्णन करणारे, ‘लडाख: मुगुटातील हिरकणी’ असं एक स्वतंत्र प्रकरणही आहे.
हळू हळू मंडळी ‘ले’ला रुळू लागली आणि बघता बघता त्यांची ‘ले’ शी दोस्तीही झाली. सकाळी सकाळी पाणीतुकडा बाहेरून आत आणायचा. पाणीतुकडा म्हणजे बाहेरच्या हौदातला बर्फाचा खडा आत आणायचा. तो स्टोवर वितळवून पाणी तयार करायचं, मग स्वैपाकाला सुरुवात. मिळणार्या आर्मी रेशनमधून चविष्ट जेवण बनवण्याची कला अरुंधतीला त्यांच्या कुकनेच शिकवली. बहुतेक भाज्या डबाबंद यायच्या. गजराच्या भाजीचं तिखट, मीठ, मसाला पाण्यानं धुवून त्यात साखर आणि मिल्क पावडर मिसळली, वर सुकामेवा पसरला की झाला गाजर हलवा तयार. अंड्याच्या पांढर्याा भागात मिल्कपावडर मिसळून त्याचे छोटे, छोटे, गोळे तयार करून वाफवले आणि मिल्कमेडमध्ये घातले की झाली तयार रसमलाई. आशा किती तरी युक्त्या ती कुककडून शिकली. जेवणानंतर बडीशेपेसह सी व्हिटॅमीन आणि मल्टी व्हीटॅमीनच्या गोळ्या आवश्यकच. सार्याक व्हिटॅमीनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या घ्याव्या लागतातच. इथला प्रसिद्ध गुरगुर नमकीन चहा भरपूर अमूल बटर घालून पण साखर आणि दुधाशिवाय केला जातो.
लडाखमध्ये पेपर नाही पण रेडिओ केंद्र आहे. त्यावरच्या बातम्या, एवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क. फौजी जवानांसासाठी यावरून गाणी सादर केली जात. इथे भिकारी नाही, याचीही आवर्जून नोंद केलेली आहे. इथे ‘जुले जुले’ म्हणत अभिवादन करायची पद्धत आहे. ‘जुले’ म्हणजे नमस्कार.
मिल्ट्री ऑफिसरपैकी अनेकांची कुटुंबे त्यांच्या त्यांच्या गावी होती. ते सगळे ऑफिसर हळू हळू यांच्या परिवारात सामील झाले आणि यांचा परिवार वाढला.
लेहयेथील थंडीत आलेल्या अनुभवाचे मोठे खुमासदार वर्णन अरुंधतीने केले आहे. पुस्तकांची बाईंडिंग निघून ती खिळखिळी होतात. टिच् आवाज करत ग्लास, बोनचायनाच्या प्लेट्स तडकतात. दुधाच्या पातेल्याला स्कार्फ गुंडाळून ठेवला नाही, तर सकाळी त्यात शंकराची पिंड तयार होते. एक दिवस कपडे आत आणायचे राहिले, तर सूर्यास्त झाल्यावर त्यांची पाठ आणि पोट चिकटून त्याचं बर्फ तयार झालं होतं. अशीच एक भाकरीची गमतीदार आठवण दिली आहे. त्यांच्या दोस्ताच्या फर्माईशीवरून भाकरी-भाजीचा बेत ठरला. भाकरीचं पीठ आणि वांगी येऊन पडली. १५-२० जण तरी जेवायला येणार. ४० भाकरी तरी हव्या होत्या. मग लक्षात आलं, तूप लोणी काहीच सांगितलं नाही. तशी तिने ठरवलं, अमूल बटर वितळवून भाकरी झाली की लगेच लावून ठेवायचं. त्याप्रमाणे ४० भाकर्यां ची अमूल बटर लावून थप्पी रचली. जेवताना डबा उघडला, तर काय भाकरीच्या थप्पीचा दगड झालेला. भाकरीला लावलेलं बटर घट्ट झालेलं होतं. छिन्नी-पटाशीच्या मदतीने जमतील तसे भाकर्यां चे तुकडे करून ते मग ओव्हनमध्ये गरम केले. तर असा तिथला हिवाळा.
‘ले’च्या थंडीप्रमाणेच इथल्या वसंत ऋतूचेही मोठे मोहक वर्णन अरुंधतीने केले आहे. हिवाळ्यात गोठलेल्या मृतप्राय जीवनावर, वसंत ऋतू चैतन्याची फुंकर घालतो आणि आळोखे पिळोखे देत सृष्टी जागी होऊ लागते. अरुंधती लिहिते, ‘ ‘ले’च्या ध्यानस्थ बसलेल्या, निसर्गगरूप शंकराला महापराक्रमी मदनानं फुलांचा सुवासिक बाण मारून ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’ म्हणत खडबडून जागं केलं. इथली पानं, फुलं, जर्दाळू, सफरचंदसारखी फळं या सार्यानचंच मोठं समरसून वर्णन केलय. हाच सीझन पाहुण्यांनी ‘ले’ल भेट देण्याचा. आपल्या ५० पाहुण्यांची व्यवस्था आपण कशी केली, याचीही गमतीदार हकीकत ती सांगते.
अरुंधती ‘ले’ला आल्यावर तिथल्या लॅमडॉनयेथील शाळेत शिकवायला जायला लागली. ‘मॅडमले जुले’ म्हणत नमस्कार करणारी तिथली, लाल, गुलाबी गालाची, गुलाबाचे ताटवेच आहेत, असे वाटणारी मुले, त्यांचा उत्साह, त्यांचं वागणं, शाळेची ट्रीप, ट्रीपमधील गमती-जमती, यांचं मोठं मनोज्ञ वर्णन तिने केलं आहे. त्याचबरोबर तिथं शिकवताना येणार्याा अडचणींचंही वर्णन केलं आहे. कधीच न पाहिलेल्या, समुद्र आणि जहाज याबद्दल मुलांना कसं सांगायचं? न पाहिलेल्या, झुरळ, बेडूक, साप यांची शरीर रचना कशी समजून द्यायची? असे अनेक प्रश्न तिला पडत. आपल्याला वाचतानाही प्रश्न पडतो, तिने हे आव्हान कसे पेलले असेल?
सियाचीनयेथील सर्वात उंचीवरचे ‘कैद’ हे ठाणे जिंकून ‘गड आला आणि सिंहही परत आला’, असा हा सिंह, परमवीरचक्राचा मानकरी बाणासिंह, याची स्फूर्तिप्रद, प्रेरणादायी कहाणी यात येते. तशीच मेजर सैतानसिंहाचीही येते. खबीर नेतृत्वगुण असलेला आणि रिझांगलाच्या कुशीत आपला देह ठेवणार्याा, मरणोत्तर परमवीरचक्र लाभलेल्या मेजर सैतानसिंहाच्या पराक्रमाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन तिने केले आहे.
‘लडाखच्या अंतरंगात’मध्ये तिथली भौगोलिक स्थिती, जमीन, वातावरण, पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगरवाटा, खिंडी, घळया, वन्यजीवन, पशू- पक्षी इ. चं सविस्तर वर्णन येतं. एके ठिकाणी तिने एक लक्षणीय अनुभव दिलाय. तलावाच्या, पाण्याच्या बिलोरी आरशात, मागच्या पिवळट, मातकट पर्वतांचं असं काही प्रतिबिंब पडलं होतं की तो तलाव न वाटता जमीनच वाटत होती. पर्यटकांना दाखवल्या जाणार्याह ठिकाणांचंही वर्णन इथे येतं. हेमीस, आल्या, मूनलॅंड आणी लामायूरू, हे गोंपा (मठ), ‘शे’चा राजवाडा इ च्या वर्णनाबरोबरच हॉल ऑफ फेम ( जिथे तेथील युद्धासंबंधीची माहिती व फोटो जतन केलेले आहेत त्याबद्दल), तसेच सुप्रसिद्ध बोफोर्स तोफ पाहून कसं धन्य झालं, तेही तिने संगीतलय.
होता होता ‘ले’चं वास्तव्य संपलं. शाळेचे मुख्याध्यापक, सहाशिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी केलेल्या निरोप समारंभाचे आतिषय हृद्य आणि काव्यमय वर्णन अरुंधतीने केले आहे. ती म्हणते की आता मनाच्या पुस्तकात इथल्या आठवणींचे मोरपीस ती ठेवेल आणि अधून मधून ते उघडून ती तिथल्या आठवणीत रमून जाईल.
लडाखशी नाते जोडत, त्या उंचीवर, थंड हवेत, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत, विरळ, प्राणवायू असलेल्या जागी लोक राहातात, कसे रहातात, आनंदाने कसे राहतात, हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे, ‘नाते लडाखशी’ आणि आपणही शब्दातून जोडायला हवे, ‘नाते लडाखशी’
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈