सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ जमापूंजी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
माणूस म्हंटला की त्याला “संचय करणं” ह्याची आवड असते,सवय असते आणि त्याचं खूप महत्वही असतं. थोड्याफार जबाबदा-या उरकल्या की आपणच आपला सगळा हिशोब घेऊन बसतो. ह्या सगळ्या उलाढालीतून आपल्या जवळ काय उरलयं ह्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देतो.
आपल्याजवळ किती उरलयं वा आपल्याजवळ शिल्लक किती ह्याकडे वळून बघतांना प्रथम आर्थिक बाबीकडे लक्ष जातं, नव्हे जवळपास त्याच निकषावर आपलं लक्ष केंद्रीत असतं. पण आपण जमा किती केलयं हे माणसं जोडणं, माणसं जपणं ह्या बाबीशी सुद्धा पडताळणं तेवढचं महत्त्वाचं असतं पण दुर्दैवाने तरुणाईच्या, यशाच्या धुंदीत बरेचवेळा ह्याचा विचार देखील आपल्याकडून होत नाही ही खेदाचीच बाब आहे.
माणसं, जोडणं, जपणं ह्याला पण आपण “जमापूँजी” म्हणूच शकतो. काल एक “जमापूँजी “नावाची खूप मस्त शाँर्टफिल्म बघण्यात आलीयं. अर्थातच ती प्रत्यक्ष बघण्यातच खरी मजा आहे.कथानक तसं नेहमीचचं.बापलेकाच्या जनरेशन गँप मुळे गमावलेल्या खूप काहीबद्दल ही शाँर्टफिल्म सांगून जाते.नेहमीप्रमाणे “आई” नावाचा हा दोघांना जोडणारा दुवा आपल्या परीने शक्यतोवर समेटाचा प्रयत्न करीतच असतो.
ही शाँर्टफिल्म बघतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, संवाद न साधणं, आणि त्यामुळे निर्माण झालेले गैरसमज ह्यामुळे आपण खूप काही गमावून बसतो आणि हे कळतं ते ही वेळ निघून गेल्यावरच ही आणखीनच दुर्दैवाची बाब. परस्परांशी घडघड मनमोकळं न बोलण्याने खरोखरच न भरून निघणारं नुकसान होतं हे ही शाँर्टफिल्म बघून जाणवलं.
मनमोकळे संवाद साधणे ही बाब खास करून पुरुषांनी आवर्जून शिकून अंमलात आणण्याची बाब आहे कारण घडाघडा न बोलणा-या स्त्रिया ह्या अभावानेच आढळतील.
ह्या शाँर्टफिल्म मध्ये वडिलांबद्दल ओलावा, प्रेम नसलेल्या मुलाच्या डोळ्यातून त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मृत्यू नंतर एकही अश्रुचा टिपूसही येत नाही अर्थातच टाळी एका हाताने कधीच वाजत नसते म्हणा. ही परिस्थिती उद्भवायला वडिलांचे सारखे तुलना करणे, संवाद न साधणे, आतून खूप असलेलं प्रेम मुलासोर अजिबात प्रदर्शित न करणं ह्या बाबी सुद्धा तेवढ्याच कारणीभूत असतात. वडीलांच्या मृत्यूनंतर आई काही प्रमाणात मुलाला वास्तविकतेची जाण देऊन मनातील किल्मीष दूर करण्यास सांगते.परंतु मुलाला ही एक प्रकारची रदबदली वाटते.
परंतु सामान आवरतांना मुलाला जेव्हा वडीलांना त्याच्याबद्दल वाटणा-या प्रेमाचा दाखला जेव्हा नजरेस पडतो तेव्हा मात्र मुलाच्या मनातील कटूता गळून पडते. मुलाने लहानपणी काढलेलं चित्र, मुलाने वडीलांना गिफ्ट म्हणून पाठवलेलं रिस्टवाँच वडीलांनी जपून ठेवलेलं असतं ही बाब मुलाला एखाद्या इस्टेटीपेक्षाही भारी आणि महत्वपूर्ण वाटते. आणि वर्षानुवर्षे न साधलेली किमया हे चित्र, ते घड्याळ करतं आणि मुलाच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत टपटप अश्रू ओघळायला लागतात.
कदाचित ह्या गोष्टींचे महत्त्व तरुणाईच्या जोषात लक्षात येत नाही परंतु आपल्या सगळ्यांनाच उत्तरायणाच्या दिशेने केव्हा ना केव्हा वाटचाल ही करावीच लागते. तेव्हा ह्या “जमापूँजी”च्या संकल्पनेत आर्थिक या बाबी बरोबर माणसं जोडणं, ती कायम जपणं ह्या संकल्पनेचा पण समावेश असतो हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे कारण पुढे मिळणाऱ्या सुख, समाधान, संतोष ह्याची ती जणू गुरुकिल्लीच आहे. सोबत शाँर्टफिल्म ची लिंक देते आहे.
👉 https://youtu.be/JgvrQCxGepU
© सौ.कल्याणी केळकर बापट
06/09/2022
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈