सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 32 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
४९.
तुझ्या सिंहासनावरून उतरून
तू माझ्या झोपडीच्या दाराशी येऊन उभा राहिलास
एका कोपऱ्यात मी गात होतो
ती धून तुझ्या कानी पडली
तू खाली आलास आणि
माझ्या झोपडीच्या दाराशी उभा राहिलास
अनेक महान गायक
तुझ्या महालात सतत गात असतात
पण या नवख्या गायकाचं
भक्तिगीत तुझ्या कानी पडलं
हा साधा छोटा स्वर
विश्वाच्या अफाट संगीतात मिसळला
आणि फुलाची भेट घेऊन
तू खाली माझ्या झोपडीच्या दाराशी आलास.
५०.
गावाच्या गल्लीतून दारोदारी
मी भीक मागत जात होतो
दूरवरून भव्य स्वप्नासारखा
सोनेरी रथ माझ्या दृष्टीस पडला
तो तुझा रथ होता. वाटलं. . . .
कोण हा राजाधिराज येतो आहे!
माझ्या आशा उंचावल्या.
वाटलं. . . आपले दरिद्री दिवस आता संपले.
न मागता,न विनविता सर्व बाजूंनी
विखुरलेली धुळीतली संपत्ती
माझ्या पदरी भिक्षा म्हणून पडेल
असं मनात धरून मी थांबलो होतो.
तुझा रथ माझ्याजवळ येऊन थांबला
आणि तुझी नजर माझ्यावर पडली.
हसतमुखाने तू माझ्याकडं आलास.
शेवटी आयुष्यातलं नशीब उजाडलं
असं मला वाटलं.
तू आपला उजवा हात माझ्यापुढं पसरलास
म्हणालास. . . काय देणार मला?
एका भिकाऱ्याकडं भिक्षा मागायची
ही कसली राजयोगी चेष्टा?
काय करावं हे न समजून, गोंधळून
मी स्तब्ध राहिलो.
नंतर माझ्या पिशवीतून
अगदी बारीक कण काढून तुझ्या हातावर ठेवला
काय आश्चर्य!
सायंकाळी मी माझी पिशवी
जमिनीवर रिकामी केली
तेव्हा माझ्या दरिद्री ढिगात सोन्याचा
एक बारीक कण मला आढळला.
मी रडलो. वाटलं. . . माझ्याकडं असलेलं सारं
द्यायची इच्छा मला का नाही झाली?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈