जीवनरंग
☆ भूक….भाग २ ☆ मेहबूब जमादार ☆
(“हे बघा पप्पां,रात्री तुमच्या दोन्ही भावानां बोलवा.बसू सगळी.बिनपैशानं कसं जगता येईल असा कांहीतरी मार्ग शोधला पाहिजे”). इथून पुढे……
पप्पां कांहीच बोललं नाहीत.मूळात बोलण्यासारखं काय राहिलंच नव्हतं.पुढं कसं जगायचं हा प्रश्न आ वासून पुढं होता.तो सोडविण्याची हिंम्मत कुणाकडंही नव्हती.ना सरकारकडे ना जनतेकडे.
मात्र जसं अंधारलं तशी सगळी गोळा झाली.घरांत अजून वीज होती.ती केंव्हा गायब होईल याचा नेम नव्हता.
त्याचे दोन भाऊ दुसंता व सुमंता गुडघ्यात मान घालून बसलेवते.असं वाटावं कि दोघं आठवडाभर जेवली नसावी.दोघांचे चेहरे पडलेले.चेह-यावरची रया गेलेली.जणू काय जागतिक बॅंकेच कर्ज या दोघानांच भागवायचं होतं.दोघं कांही बोलत नव्हते तसा अर्जुनाही कांही बोलत नव्हता.हे सगळं बघून शेवटी दूशाआजी पुढं आली.
“कारं?कोण गेल्यावानी बसलायसा!”
“आज भात अन मिरच्या ठेचून केलेली चटणी खाल्ली.अजून कसबस दोन दिस जातील.पण पुढं काय करायचं आई!काय सूचनां झालय बघ?”
आजीनं बरंच पावसाळं पाहिल्यालं.तिच्या चेह-यावरच्या रेषा तिचं वय सांगत होत्या.ती जरूर खंगली होती पण मनांन तरूण होती. तिन्ह तिन्हीं सूनानां बोलावलं.ती त्यानां म्हणाली,
“हे बघा काळ फारच वाईट आलाय त्यो समोर दिसतूय.घरांत तुमच्याकडं खाण्यासारखं काय काय हाय ते सांगा”
“माझ्या कडं आर्धी कणगी भात हायत” थोरली सून बोलली.
“माझ्या कडं दोन पाट्या मिरच्या हायत” मधली म्हणाली.
“माझ्या कडं चहा हाय पण त्येला साकार नाय”
“ये बाय तुझा चहा जावूंदे चूलीत.पहिल्यांदा जेवणांच बघूया.”
“पण आत्या गॅसचा हंडा कूठाय जेवान शिजवायला”
“कशाला गं हंडा पाहिजे.अंगणात मांडा चूल.जळाण सगळीकडे पसरलय ते पहिलं गोळा करा”
ती धाकट्या अनसांकडं बघून म्हणाली,
“ये आनसा तुझ्या म्हशीचं दुध काढं.गरम करून देवू सगळ्यानां.”
“आवं आत्या पोरांस्नी पाजायला असूं दे की!”
“अगं तांब्याभर ठेव घरांत.बाय दिस फिरतील तसं आपण भी फिरलं पाहिजे”
“बरं”
ती ऊटली.कासांडी घेवून गोट्यात धारंला गेली.
तिनं त्याच राती मुलानां, सूनांना तसेच नातवंडाना सांगितलं,
“आता एक लक्षात ठेवायचं.बाहेरून ईकतचं काय आणायचं नाय. उद्या रानांत जावून जळाण आणा.आपल्या रानांत काय भाजीपाला असंल ते तोडून आणा.दुसरं बघा आपल्या वरच्या रानांशेजारुन एक ओहोळ वाहत्या. त्यांत मासं मिळत्यात. ते भी धरून आणा.भाजून खाऊ.पण असं रडत बसू नका.”
दुशा आजीनं बरीच वर्ष घासलेटचा दिवा लावून काढलीवती.वीज नसली तरी तिला त्याचं कांहीच वाटत नव्हत.त्यामूळे निसर्गात कसं जगायचं तिला माहित होतं.तिची अक्कल याकामी उपयोगात आली होती.
दिवस नेहमीसारखाच उगवत होता.पण ब-याच दु:खद घटनानां,आठवणीनां व प्रसंगांनां मागे ठेवून मावळत होता.
जनतेची कांहीच चूक नसतानां ती महागाईने त्रस्त झाली होती.चूक एकच होती की ती या देशांत जन्माला आली होती. प्राणापलीकडं प्रेम करणा-या देशावर राजकर्त्यानीं राबविलेल्या चूकीच्या धोरणांमूळे ही वेळ आली होती. प्रत्येकाच्या डूईवर न फिटावं असं कर्ज करून ठेवलं होतं. एरव्ही मंत्री होण्याकरिता हपापणारी राजकारणी मंत्री व्हायला तयार नव्हती.एवढा मोठा रोष जनतेचा त्यांच्यावर होता.
क्रमशः…
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈