श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 159
शब्दांच्या फटक्याने
भावनेच्या पाठीवर उमटलेले वळ
तू कोर्टात कसे सिद्ध करणार ?
त्यांनं तुला दिलेल्या वेदना
हे कोर्ट मान्य करू शकत नाही
डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेला
लागतात कागदी पुरावे,
काळजावरच्या जखमा
कोर्ट कधीच ग्राह्य धरत नाही
आणि काळजावरील
शब्दांचे वार टिपणारा कॕमेरा
अजून तरी अस्तित्वात आलेला नाही
मग कसा सादर करणार पुरावा
आणि कशी होणार त्याला शिक्षा
केस मागं घे म्हणणाऱ्यांना शरण जाणं
किंवा
पुराव्याअभावी
होणारी हार स्विकारणं
या शिवाय दुसरा पर्याय नाही
जर त्याला तुला शिक्षाच द्यायची असेल
तर स्वतःला सक्षम करून
त्याच्याशी कुठेही दोन हात करण्याची ताकद
तुला निर्माण करावी लागेल…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈