वाचताना वेचलेले
☆ महाश्वेता… सुश्री सुधा मुर्ती ☆ प्रस्तुती – सुश्री भावना राजेंद्र मेथा ☆
इन्फोसिस फौंडेशनची विश्वस्त या नात्याने मला रोज ढिगाने पत्रे येतात. येथे आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना आर्थिक मदत देत असतो. स्वाभाविकच गरजू आणि मदतीची फारशी गरज नसलेले, असे दोन्ही प्रकारचे लोक आम्हांला पत्रे लिहितात. या दोन्ही प्रकारच्या लोकांमधून नेमके खरे गरजवंत ओळखून काढणं, हे खरं तर फार कठीण काम आहे.
अशीच एक सोमवारची सकाळ. त्या दिवशी पत्रांचा नुसता पाऊस पडला होता. मी एकेक पत्र वाचत होते. माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं, “मॅडम एक लग्नपत्रिका आली आहे व त्यासोबत एक हस्तलिखित खाजगी चिठ्ठी पण जोडली आहे. तुम्ही त्या लग्नाला जाणार आहात ?”
मी कॉलेजात अध्यापनाचं काम करत असल्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून नेहमीच लग्नाची बोलावणी येत असतात. त्यामुळे ही पत्रिका माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांचीच असेल असं मला वाटलं. पण पत्रिका उघडून वाचल्यावर मात्र वधू-वरांच्या नावांवरूनही काहीच बोध होईना.
सोबतच्या चिठ्ठीत हस्ताक्षरात लिहिलं होतं, “मॅडम, तुम्ही जर लग्नाला आला नाहीत, तर ते आम्ही आमचं दुर्भाग्य समजू.”
मुलाचं वा मुलीचं नाव काही केल्या मला आठवत नव्हतं. पण उत्सुकतेपोटी मी त्या लग्नाला जायचं ठरवलं.
पावसाळ्याचे दिवस होते. लग्नस्थळ शहराच्या पार दुसऱ्या टोकाला होतं. एकदा क्षणभर तर असंही वाटलं, “कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीच्या लग्नाला इतक्या दूर जाण्यात काही अर्थ आहे का ?”
लग्नसमारंभाच्या जागी पोचले, तर ते अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न दिसत होतं. स्टेजवर फुलांची भरगच्च आरास केली होती. सिनेसंगीत मोठ्यांदा वाजत होतं. त्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. पावसामुळे मुलांना बाहेर अंगणात खेळता येत नव्हतं. त्यामुळे बरीच मुलं हॉलच्या आतच लपंडाव खेळून धुमाकूळ घालत होती. स्त्रियांच्या अंगावर बंगलोर सिल्क, म्हैसूर क्रेप सिल्क अशा साड्या होत्या.
व्यासपीठावर उभ्या असलेल्या वधू-वरांकडे मी निरखून पाहिलं. कदाचित त्यांच्यातील कोणी माझा विद्यार्थी असेल, नाही तर एखादे वेळी दोघेसुद्धा असतील. तिथे त्या गर्दीत मी उभी होते. कुणाची ओळख नाही, पाळख नाही. काय करावं ते मला समजेना.
इतक्यात एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्हाला वधू-वरांना भेटायचंय का ?”
मग मी त्यांच्यापाठोपाठ स्टेजवर गेले, स्वत:ची ओळख करून दिली आणि त्यांना ‘वैवाहिक जीवन सुखाचे जावो’, अशा शुभेच्छा दिल्या. ते दोघे खूप आनंदात होते. ‘यांची नीट विचारपूस करा’, असं नवऱ्यामुलाने त्या वृद्ध गृहस्थांना सांगितलं. तरीही माझ्या मनात तो प्रश्न वारंवार डोके काढतच होता. ‘हे लोक कोण आहेत ? त्यांनी ही अशी चिठ्ठी मला का पाठवली असेल ?’
ते गृहस्थ मला जेवणाच्या हॉलमधे घेऊन गेले व त्यांनी मला खाण्यासाठी फराळाचे आणले. आता मात्र फार झालं. हे लोक नक्की कोण, हे जाणून घेतल्याशिवाय मी काहीही खाणार नाही, असं मी ठरवलं.
माझ्या मनाची चलबिचल पाहून ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, “मॅडम,मी नवऱ्यामुलाचा पिता. ही जी मुलगी आहे ना मालती, हिच्या प्रेमात माझा मुलगा पडला. आम्ही दोघांचं लग्न ठरवलं. साखरपुडा झाल्यानंतर मालतीच्या अंगावर कोड उठलं. माझ्या मुलानं लग्न करण्यास नकार दिला. आम्हांला सर्वांनाच खूप वाईट वाटलं. तिच्या घरच्या लोकांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली. कुटुंबातील वातावरणच सगळं बिघडून गेलं. घरातील ताणतणाव सहन होईना, म्हणून माझा मुलगा वारंवार लायब्ररीत जाऊन बसे. एक महिन्याने तो माझ्यापाशी आला, आणि म्हणाला, मी मालतीशी लग्न करण्यास तयार आहे. आम्हांला सर्वांनाच आश्चर्य वाटलं व आनंदही झाला. आज आता लग्न आहे.”
पण तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नव्हतं. या सगळ्यात माझा संबंध कुठे आला ? पण त्या प्रश्नाचं उत्तर वरपित्याने लगेच दिलं.
“मॅडम, या काळात त्यानं तुमची ‘महाश्वेता’ ही कादंबरी वाचली होती, असं आम्हांला मागाहून समजलं.” ते म्हणाले, “माझ्या मुलाची परिस्थिती पण अगदी त्या पुस्तकातल्या गोष्टीसारखीच होती. त्याने ती कादंबरी किमान दहा वेळा वाचली व त्यातील मुलीचं दुःख त्याला जाणवलं. त्याने एक महिनाभर विचार केला आणि ठरवलं- आपण त्या कादंबरीतल्या माणसाप्रमाणे आता आपली जबाबदारी झटकून टाकून नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करत बसायचं नाही. तुमच्या कादंबरीनं त्याच्या विचारांमधे परिवर्तन घडवून आणलं. “
आता काय घडलं ते माझ्या लक्षात आलं.
त्यानंतर मुलाच्या वडिलांनी एक पार्सल आणलं व अत्यंत आग्रहाने मला या भेटीचा स्वीकार करायला लावला. मी जरा घुटमळले. पण त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले, “ही साडी मालतीने खास तुमच्यासाठी आणली आहे. ती तुमच्याशी नंतर बोलणार आहे.”
पाऊस जोराने कोसळू लागला. हॉलमधे पाणीच पाणी झालं. माझी सिल्कची साडी भिजत होती. पण मला त्याचं काही वाटलं नाही. मला खूप खूप आनंद झाला होता. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीच्या योगाने कोणाचं आयुष्यच बदलून जाईल, असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं.
मी जेव्हा कधी ती साडी नेसते, तेव्हा मला मालतीचा आनंदाने उत्फुल्लित झालेला चेहरा आणि महाश्वेता पुस्तकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळतं. माझ्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान साडी आहे.
लेखिका :सुधा मूर्ती.
अनुवाद :लीना सोहनी
संग्राहिका :भावना राजेंद्र मेथा, महाड, रायगड.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈