जीवनरंग
☆ भूक….भाग ५ ☆ मेहबूब जमादार ☆
(त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली.कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या.त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.) इथून पुढे वाचा….
आज गावक-यांत विश्वास निर्माण झाला होता. दोनवेळचं पोटभर मिळू लागलं होतं. ही सारी दुशाआजीची करामत होती.
दुशाआजीच्या कामाची दखल वरपर्यंत जावू लागली.नर्स दोन-तीनदा हे पाहून गेली.तिनं तिथल्या प्रमुख डॅाक्टर नां सांगितलं.डॅाक्टर हे ऐकून अचंबित झाले.
दुस-या च आठवड्यात ते गावांत आले.त्यानीं सारं गांव फिरून पाहीलं.त्यानां आश्चर्याचा धक्का बसला.त्यानीं गावच्या प्रमुखानां व दुशाआजीला बोलावलं.पुढच्या आठवड्यात गावांत कॅम्प घेवूया असं त्यानीं सांगितलं.
पुढच्या आठवड्यातच गावातील शाळेत कॅम्प घेतला.लहान मुलानां डॅाक्टरानीं टॅानिकच्या गोळ्या,दुधपावडरचं वाटप केलं.फार मोठा साठा नव्हता,परंतू त्यानीं बाजूच्या केंद्राकडीलही थोडाफार साठा जमा करून आणला होता.गावक-यानां त्यानीं तपासलं.गरजेपुरती औषध दिली.त्यानीं बायकांत बसलेल्या दुशाआजीला जवळ बोलवाय सांगितलं.
दुशाआजी आली.त्यानीं डॅाक्टरनां नमस्कार केला.
“आजी कशी आहे तब्ब्येत?”
“मला रं बाबा काय होतयं? मला नकोत तुझी औषध.या माझ्या बायानां पोरानां दे”
डॅाक्टर हसतच ऊटले. त्यानीं दुशा आजीचा हात धरला.एका खुर्चीवर बसवलं.
सूर्य डोंगराकडे चालला होता.आख्खा गांव शाळेत जमा झाला होता.डॅाक्टरनीं आणलेला हार दुशाआजीच्या गळ्यात घातला.सर्व गावक-यानीं टाळ्यांचा गजर केला.डॅाक्टर खुर्चीवरून ऊटले.गावक-यानां उद्देशून ते म्हणाले,
“माझ्या सर्व बांधवानो व भगिनीनों,या आजीनं जी गावाला जगण्याची उमेद दिली,दिशा दिली ती एक प्रकारची करामतच आहे असे मला वाटते.खरं तर यातलं कांहीच मला माहित नव्हतं.पण तूमच्या गावांत काम करणा-या नर्सनं मला हे सारं सांगितलं.त्यामूळे मला तुमचं गांव पहाण्याची इच्छा झाली.दुशाआजीच्या कामानं खरंच मला ओढत आणलं,असं म्हंटलं तरी काय वावगं होणार नाही.त्याचबरोबर दुशाआजीनं सांगितलेल्या स्वावलंबनाची कामे प्रामाणिकपणे व कष्ट करून तुंम्ही सर्वानीं ऊभी केलीत.ज्यामूळे तुंम्हाला दोन वेळची भाकर खायला मिळाली.त्यामूळे तुंम्हा सर्वानां धन्यवाद दिले पाहिजेत.अशी काम करणारी दुशाआजी जर प्रत्येक गावाला मिळाली तर निश्चितच त्या त्या गांवचा दोनवेळचा भूकेचा प्रश्न मिटेल.तुंम्ही सर्व लोकानीं दुशाआजीनं सांगितलेल्या बाबी आचरणांत आणून सलोख्यानं रहाव.तसेच वैयक्तिक माझ्याकडून जे काय सहकार्य करता येईल ते मी करेन.खरं तर गावाला दुशाआजीच्या रूपानं एक देवच मदत करतो आहे.त्यामूळे दूशाआजीला उदंड आयुष्य लाभो,त्यानां या कामात भरपूर यश मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थनां करून मी थांबतो.”
त्यानीं वाकून दुशाआजीच्या पायानां स्पर्श केला व खुर्चीवर बसले.
बराचवेळ टाळ्यांचा गजर चालू होता.सारं गांव आनंदात व ऊत्साहात टाळ्या पिटत होतं.
हे सारं पाहून दुशाआजीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.तिचं काळीज भरून आलं.
देशात काय चाललय याची जराशीही कल्पनां गावाला नव्हती. ती करण्याची त्यानां गरजच ऊरलेली नव्हती.
मात्र गावातल्या लोकांच्या भूकेला समर्थ पर्याय दुशाआजीनं शोधला होता हे ही तेव्हढंच खरं होतं….!!!
– समाप्त –
© मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈