सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ सावधानता… भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
डार्विनचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत, “Survival of the fittest “(जगण्यास जे लायक असतील तेच जगतील .) याचा विचार करता माणूस हा पथ्वितलावर उत्क्रांत झालेला शेवटचा प्राणी. निसर्गाने मानवाला बुद्धीचा नजराणा बहाल केला आहे. आणि त्याच्या जिवावर तो जमिनी पासून आकाशातच काय, अवकाशापर्यंतचे क्षेत्र आपल्या कवेत घ्यायला लागला आहे. तरीसुद्धा जिद्न्यासा आणि कुतूहलाने प्राणी, पक्षी त्यांचे वर्तन याचा अभ्यास व संशोधन करावेसे वाटायला लागले आहे. कारण त्यांच्या संवेदना माणसापेक्षा कितीतरी पटीनी अधिक असल्याचे लक्षात आले आहे.
‘सावधपणा’ म्हणजे दक्ष असणे, सावध असणे वगैरे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दक्ष व सावध रहावे लागते. सजीव कसे सावध असतात ,याचा विचार करायचा तर अगदी झाडे, वेली, एकपेशीय जीवापासून कीटक, माशा, मुंग्या,जलचर, पक्षी, प्राणी, जंगली प्राणी यांचा विचार करावा लागेल.
अँमिबासारख्या एकपेशीय प्राण्याला स्पर्शेंद्रिय नसते. पण त्याला स्पर्श केल्यास सावध होऊन तो आपले अंग आक्रसून घेतो. युग्लिना या एककोषिक प्राण्यालाही स्पर्शेंद्रिय नसते. पण प्रकाशाची जाणीव करुन देणारे अतिसूक्ष्म इंद्रिय असते.त्यानुसार त्याला सजगता येते.व तो सावध होतो.
अगदी लहान कीटक वाळवी, मुंग्या, झुरळ, यांच्यामध्येसुद्धा सावधपणा असतो.त्यांचे वर्तन वेगवेगळे असते.त्यांची एक भाषा असते. कामकरी वाळवी किंवा मुंग्या रांगेतून जाताना येताना आपल्या भूमिकांशी स्पर्श करीत चालतात. चालताना त्यांच्या अंगातून एक प्रकारच्या वासाचा द्रव पाझरतो.त्या वासामुळे त्या न चुकता आपापल्या वारुळात परततात. मुंग्या जर चुकून दुसऱ्या समुहात गेल्या दुसऱ्या मुंग्या त्यांना सामावून घेत नाहीत. हुसकावून लावतात. किंवा मारतात. कित्येकदा हवेच्या बदलातला धोका कळल्याने मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना आपण पहातो.हा सावधपणाच ना?नाकतोडा, टोळासारख्या कीटकांच्या पोटावर पातळ असलेले द्न्यानेंद्रिय ध्वनी ग्रहण करतो. व त्याद्वारे तो सावध राहू शकतो.काही कीटकात कामकरी असतात ते घरे बांधतात.अन्न गोळा करून संततीची काळजी घेतात.सैनिक असतात ते घर आणि संततीचे रक्षण करतात.मादी कीटक प्रजोत्पादन करते.प्रत्येक जण आपापले काम दक्ष राहून करत असतो. मधमाश्यांबद्दल सांगायचे तर कामकरी माशा मधाचे ठिकाण सापडल्यावर मोहोळावर येऊन विशिष्ट तर्हेने गोलाकार 8 आकड्याप्रमाणे फिरुन दोन्ही बाजूला हालचाल करतात. आणि मध मिळविण्याची माहिती इतरांना देतात. निरिक्षणाने सिद्ध झालेले आहे की मधमाशीला उत्तम स्मरणशक्ती , हुशारी व वेळेचेही भान असते. कुंभारीण तोंडाने मातीचा चिखल करुन सुंदर घर बनवते. व त्यामध्ये अंडी घालते.त्यांच्या वर्तनाबद्दल खरोखरच आश्चर्य वाटते.
क्रमशः…
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈