प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.
…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.
गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.
चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.
खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.
ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.
कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.
मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.
पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे
‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.
…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!
आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!
(आगामी संग्रहातून..)
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈