सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५२.
तुझ्या गळ्यातला गुलाबांचा हार
मागून घ्यावा असं वाटलं पण
मागायचं धाडस झालं नाही. सकाळ झाली.
तू निघून गेलास. बिछान्यावर काही पाकळ्या
राहिल्या होत्या आणि भिकाऱ्यासारखी मी
सकाळी एखाद- दुसरी पाकळी शोधीत राहिले.
अरे देवा! मला काय मिळालं?
तुझ्या प्रेमाची कोणती खूण?
फूल नाही, सुगंध नाही की गुलाबदाणी नाही.
विजेच्या आघातासारखी चमचमणारी
जडशीळ अशी तुझी तलवार!
चिवचिवाट करून पहाटपक्षी विचारत होता,
‘ बाई गं! तुला काय मिळालं?’
‘ नाही फूल, नाही अत्तराचा सुगंध,
नाही गुलाबदाणी.फक्त तुझी भयानक तलवार!
मी विचार करीत बसले ‘ ही कसली तुझी भेट!’
ती मी कुठं लपवू? मी ती पेलू शकत नाही
याची शरम वाटते. कारण मी इतकी नाजूक!
मी ती पोटाशी धरते तेव्हा ती मला खुपते.
तरीसुद्धा तू दिलेल्या दु:खाच्या ओझ्याचा हा मान,
तुझी भेटवस्तू मी ऱ्हदयाशी धरते.
या जगात मला कसलीच भीती आता नाही.
माझ्या लढाईत तुझाच विजय होत राहील.
तू माझ्या सोबत्यासाठी मरण ठेवलंस.
मी त्याला आयुष्याचा शिरपेच चढवीन.
मला बंधनातून मोकळं करायला
तुझी ही तलवार आहे.
मला या जगात आता कशाचीच भीती नाही.
माझ्या ऱ्हदयस्वामी! क्षुद्र साजशृंगार मी
व्यर्ज केले आहेत.
आता कोपऱ्यात बसून मी रडणार नाही;
अवनत होणार नाही, उन्नत होईन व राहीन.
या तलवारीचा अलंकार तू मला बहाल केलास.
बाहुल्यांचा खेळ आता कशाला?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈