सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
हेमलकशाचे देव… श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
देवा, या हेमलकशाच्या देवाला, आदिवासींच्या आधारवडाला, उदंड आयुरारोग्य दे!
बाबांचे चिरंजीव,डॉक्टर प्रकाश आमटे दुर्धर आजारावर उपचार घेऊन परतलेत, हे ऐकून त्यांच्या कार्याविषयी केवळ जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या मराठी माणसाचा देवावरचा विश्वास दृढ झालाय. हेमलकशाचा माडिया आदिवासी तर अत्यंत सुखावला असेल, यात शंकाच नाही.
डॉक्टर आणि मंदाताई यांचा पर्लकोटा नदीच्या पुलावर फिरायला गेल्याचा फोटो वायरल झालेला पाहिला आणि देवाचे आभार मानण्यासाठी हात आपोआप जोडले गेले.
मित्रांनो, माडिया आदिवासी,डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे या दाम्पत्याला देव मानतात आणि म्हणून देवाने या वंचित, गरीब आदिवासींच्या देवाचे आयुरारोग्य सांभाळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.
बाबा आमटेंच्या या सुपुत्राने, अत्यंत हलाखीत जगणाऱ्या माडिया आदिवासींचे जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी केलेली अतिशय खडतर आणि जीवन झोकून देणारी धडपड ‘प्रकाशवाटा’ हे त्यांचं पुस्तक वाचून कळते.
धड कपडेही अंगावर न घालणाऱ्या या माडिया आदिवासींना कपडे घालायला, अन्न म्हणून फक्त आंबिलावर विसंबून जीवन कंठणाऱ्या वा केवळ जनावर मारून खाणाऱ्या आदिवासींना भाज्या कशा बनवतात, कशा खातात आणि कशासाठी खातात हे माहीत नसणाऱ्या माडियांना त्या पिकवायला व खायला त्यांनी शिकवलं. माडिया भाषेशिवाय कोणत्याही भाषेचा गंध नसलेल्या या अतिमागास जमातीला शिक्षण, आरोग्य या सुविधा त्यांच्या हेमलकशात अहोरात्र उपलब्ध करून देणाऱ्या या सिद्धहस्त डॉक्टर, इंजिनियर, आणि इतर व्यावसायिक एकाच ठिकाणी एकवटलेल्या अवलियाला,देवा,उदंड आयुरारोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
समाजसेवेचे भांडवल करून, छोट्या- मोठया कार्याचा सोस पुरा करतांना, सोशल मीडियामध्ये फोटो टाकून आपला उदोउदो करून घेणाऱ्या आजच्या तथाकथित समाजधुरीणांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे छोटेखानी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे काम हे दीपस्तंभ बनून समाजाचे मार्गदर्शन करतेय याची त्यांना ना जाणीव असेल, ना खंत.
आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल टाकून, किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन, वंचित आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे आणि मंदाताईंचे हात असेच कार्यरत राहून, आपणा सर्वांना प्रेरणा देत राहोत ही श्रीचरणी प्रार्थना!
असंख्य पुरस्कारांनी गौरविलेले डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या या पुस्तकात एका ठिकाणी लिहितात, “शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं, हा शाळा सुरु करण्यामागचा आमचा हेतू होता. आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात, तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरु केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो.” केवढा मोठा पुरस्कार!इतर कोणत्याही पुरस्कारांच्या पेक्षा मोठा!
असो. बाबा आमटेंच्या या सुपुत्राला उदंड आयुरारोग्य मिळो ही पुन्हा एकदा विधात्या चरणी प्रार्थना.
लेखक :श्री.विजय लक्ष्मण गावडे
संग्राहिका : सौ. शशी नाडकर्णी- नाईक.
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈