सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ अनपेक्षित  –  भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(त्या बाईचे फक्त गर्भाशयच नाही,  तर तिचे आईपणच आपण भाड्याने घेतलंय असा एक नकोसा विचित्र विचार तिच्या मनात झर्र्कन येऊन गेला —) इथून पुढे —-

आधी कायदेशीर आणि मग सगळ्या वैद्यकीय प्रक्रिया एकदाच्या पार पडल्या, आणि ते दोघे जरासे निश्चिन्त झाले. पण काहीच दिवसांनी त्या बाईच्या पोटात एक नाही, तर तीन गर्भ अगदी व्यवस्थित वाढत आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आणि या दोघांच्या पोटात गोळाच आला. पण डॉक्टरांची चिंता वेगळीच होती. कारण त्यांना या प्रसूतीत मेडिकल complications होण्याची दाट शक्यता वाटत होती. डॉक्टरांनी तिनातला एक गर्भ ऍबॉर्ट करावा असा प्रामाणिक सल्ला दिला. पण तो सल्ला त्या बाईतल्या आईला अजिबात मान्य नव्हता, आणि तिचा नकार एक आई म्हणून स्वाभाविक आहे हे त्या दोघांनाही पटत होतं. डॉक्टरांचा सल्ला ऐकून ती बाई एकदम खूप चिडली होती, आणि तिने डॉक्टरांनाच जाब विचारला होता –” डॉक्टर काय बोलताय तुम्ही ? अहो मला मान्य आहे की मला पैशांची खूप गरज आहे म्हणून मी माझे गर्भाशय भाड्याने द्यायला तयार झाले आहे– असं करतांना माझा जीवही जाऊ शकतो याचीही कल्पना आहे मला. पण म्हणून मी चक्क माझ्याच एका बाळाची यात आहुति द्यावी असं सांगताय तुम्ही मला ? डॉक्टर मी गर्भाशय भाड्याने दिलंय ते एक नवा जीव जन्माला घालण्यासाठी — तिथे उमलू पाहणाऱ्या एका जीवाला निर्दयीपणाने जागच्याजागी पुरण्यासाठी नाही — तुम्हाला काय हो— तुमच्यासाठी सगळ्या नोटांचा रंग सारखाच असतो आणि पैसा हे त्याचं एकच नाव असतं. – पण माझ्यासाठी माझं  प्रत्येक  बाळ महत्वाचं आहे हे ध्यानात ठेवा. एक सुई टोचली की काम झालं इतकं सगळं सोप्पं वाटत असेलही तुम्हाला. पण यासाठी कोणता गर्भ निवडायचा– पहिला – शेवटचा–की मधला ? आणि हे ठरवणारा एखादा कायदेशीर निकष आहे तुमच्याकडे ? नाही ना ?  तुमचा हा सल्ला अजिबात ऐकणार नाही मी…. मग माझा जीव गेला तरी चालेल. “ 

हे सगळं बोलतांना- तिची हतबलता- मनात चाललेली घालमेल– परिस्थितीवरचा राग–आणि केवळ पैशासाठी मनाविरुद्ध करावी लागत असलेली ही क्लेशदायक तडजोड –असे कितीतरी संमिश्र भाव तिच्या चेहेऱ्यावर तीव्रतेने उमटले होते– तो फक्त राग नव्हता– तर एका असहाय्य मनाचा आक्रोश होता. आणि त्याक्षणी त्या दोघांनाही प्रकर्षाने हे जाणवलं होतं, की ती तिच्या बोलण्यातून फक्त डॉक्टरांनाच नाही, तर कायद्याला– सगळ्या सिस्टिमला–सगळ्या समाजाच्याच बदललेल्या मानसिकतेला धिटाईने जाब विचारत होती– खडसावून सांगत होती की प्रत्येक गोष्ट पैशात तोलता येत नाही म्हणून. ‘– त्या दोघांचं मनही पार हेलावून गेलं होतं त्याक्षणी. पण आता त्यांना त्यांचा निर्णय बदलता येणं शक्य नव्हतं.—- आता आपल्याला एक नाही, तर तीन बाळं असणार हे सत्य  त्यांनी मनापासून स्वीकारलं. पुन्हा नव्याने करार- कायद्याची आणखी जास्त प्रक्रिया, आणि अर्थातच त्या साखळीतल्या सगळ्यांच्याच मनातली तिप्पट वाढलेली हाव— म्हणजे एकूण तिप्पट खर्च – हे सगळं मान्य करणं आता भागच होतं. हे बाळंतपण सुखरूप पार पडलं तर सरोगसीच्या मार्गाने तिळं जन्माला येणं ही त्या शहरातली पहिलीच केस असणार होती,आणि त्यामुळे डॉक्टरांचं आणि हॉस्पिटलचंही  नाव खूपच प्रसिद्ध होणार हा सुप्त हेतू डॉक्टरांना लपवता आला नव्हता हेही दोघांच्या लक्षात आलं होतं. पण त्याकडे दुर्लक्ष करत, सगळ्या फॉर्मॅलिटीज त्यांनी नव्याने पूर्ण केल्या….. आणि आता त्यांना फक्त वाट बघत राहायची होती. 

 

आणि आज दिलेल्या डेटच्या जरासं आधीच त्यांना हॉस्पिटलमध्ये यावं लागलं होतं — त्यांच्या तीन बाळांची आतुरतेने वाट पाहत थांबले होते ते .—-

 

एकदाचं दार उघडलं. नर्स बाळांना घेऊन आली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला. त्या बाईला तिळं होणार हे आधीच माहिती असलं तरी तीनही बाळं सुखरूप असणं, ही त्या दोघांसाठी फार मोठी गोष्ट होती. कारण त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय त्यामुळे योग्य ठरणार होता. 

दोघे खूपच खूश झाले होते– तिचा आनंद तर आगळाच  – बाळाला जन्म न देताही स्वतःच ‘आई’ झाल्यासारखा आनंद,  जो तिच्या डोळ्यातून नकळतच पाझरायला लागला होता. 

इतक्यात डॉक्टर गंभीर चेह-याने बाहेर आले. स्वतःचं गर्भाशय भाड्याने दिलेली ती आई या प्रसूतीमध्ये स्वतःचा जीव मात्र गमावून बसली होती. दोघेही एकदम सुन्न झाले. त्यांना मूल देण्याच्या बदल्यात, तिची स्वतःची तीन मुलं पोरकी होऊन गेली होती. आणि हे वास्तव पैसे देऊनही बदलणार नव्हतं. असह्य अस्वस्थता, दुःख, आणि अपराधीपणाची, मनाला घायाळ करणारी तीव्र वेदना…. दोघांनाही काहीच सुचत नव्हतं….मनाला आणि मेंदूलाही नकोसा सुन्नपणा जाणवत होता . 

 शेवटी तिनेच कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला….

 “ हे बघ, जरा शांत हो . ऐक… अरे न सांगताच देवाने किती जास्त कृपा केली आहे आपल्यावर.  मला काय वाटतं –आपल्याला स्वतःचं एक बाळ हवं होतं, तर तीन मिळाली. आणि जरा शांतपणाने विचार केलास ना तर नक्की पटेल तुला की तिची पोरकी झालेली तिन्ही मुलंही ……… “ दत्तक….. “ दोघं एकदमच म्हणाले ….. मग …. मग फक्त ओलावलेले डोळेच बोलत राहिले…. आणि …….  

…… आणि अमेरिकेला परत जाण्यासाठी आता एकूण आठ तिकिटं काढली गेली… 

— समाप्त —

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments