श्री सुहास रघुनाथ पंडित
चित्रकाव्य
☆ मी नाही मागत भिक्षा…
☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
अंधार सोबती माझा
पण तमा न त्याची मजला
सजवून तेल,वातीने
घर तुमचे खुशाल उजळा
☆
महाल,माड्या,गाड्या
लखलाभ तुम्हाला तुमचे
हासेल झोपडी माझी
मागते मोल कष्टाचे
☆
मज नकोत उंची वस्त्रे
नकोच आतषबाजी
उदराच्या खळगीपुरती
मज मिळू दे भाकर भाजी
☆
लेकरे घरी,दारात
अन् डोळे वाटेवरती
आणले काय आजीने
काय ठेवू त्यांच्या पुढती
☆
ही विनवणी तुम्ही समजाहो
मी नाही मागत भिक्षा
कष्टाला मोल नसे का ?
का गरिबाला ही शिक्षा?
☆
ही पणती माझ्या घरची
लखलखेल तुमचे घर
जमले तर दूर करा हो
मनी अंधार दाटला फार
☆
चित्र सौजन्य – श्री सुहास रघुनाथ पंडित
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अतिशय मन:स्पर्शी,अस्वस्थ करणारी कविता.आपल्या दिवाळीच्या आनंदात दुसऱ्याच्या दु:खाची जाणिव मनात असायला हवी हे भान जागं केलंत.