सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ जानकीसाठी… अनुवादक : समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
(राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.)
देह गतप्राण झालाय रावणाचा
स्तब्ध झालीय लंका सारी
सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी
कुठे कसला उत्साह नाही
नाही तेवला दिवा कुणाच्या घरी
घर बिभिषणाचे वगळता!
समुद्र किनारी बसलेले विजयी राम
बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत
जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक
सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत
आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत
चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!
धुमसताहेत लक्ष्मण मनातूनच
की, सीतेला आणण्यास का जात नाहीत राम
अशोक वाटिकेत?
पण बोलू काही शकत नाहीत.
हळू-हळू सारी कामं निपटतात
संपन्न होतो राज्याभिषेक बिभिषणाचा
आणि राम प्रवेश करतात लंकेमध्ये
मुक्कामी एका विशाल भुवनात.
अशोक वाटिकेस धाडतात हनुमाना
देण्यास ही खबर
की, मारला गेला आहे रावण
आता लंकाधिपती आहे बिभिषण.
बातमी ती ऐकताच सीता
होऊन जाते दिग्मूढ
बोलत काहीच नाही
बसते वाटेकडे लावूनि डोळे
रावणाचा वध करताच
वनवासी राम झालेत का सम्राट?
लंकेत पोहोचून देखील दूत आपला पाठवताहेत
जाणू इच्छित नाहीत की, वर्षेक कुठे राहिली सीता
कशी राहिली सीता?
डोळ्यांना तिच्या अश्रुंच्या धारा लागतात
जयांना समजू शकत नाहीत हनुमान
बोलू शकत नाहीत वाल्मिकी.
राम आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना
त्या परिचारिकांशी
ज्यांनी भयभीत करून देखील मला
स्त्रीचा सन्मान सारा प्रदान केला
रावणाच्या त्या अनुयायी तर होत्याच
परंतु माझ्यासाठी मातेसमान होत्या.
राम जर आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना
या अशोकाच्या वृक्षांशी
या माधवीच्या वेलींशी
ज्यांनी माझ्या अश्रुंना
जपलंय दवबिंदूसम आपल्या देहावर
पण राम तर राजा आहेत
ते कसे येतील सीतेला नेण्यास?
बिभिषण करवतात सीतेचा शृंगार
आणि पाठवतात पालखीत बसवूनी रामांच्या भुवनी.
पालखीत बसलेली सीता करते विचार,
जनकानेही तिला असाच तर निरोप दिला होता!
‘तिथेच थांबवा पालखी’,
गुंजती रामांचे स्वर
येऊ द्या पायी चालत सीतेला, मज समीप
जमिनीवरून चालताना थरकापते वैदेही
काय पाहू इच्छित होते
मर्यादा पुरुषोत्तम, कारावासात राहून देखील
चालणं विसरतात का स्त्रिया?
अपमान आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली सीता
विसरून जाते पतीमिलनाचा उत्साह
उभी राहते एखाद्या युद्धबंद्यासम!
कुठाराघात करतात राम – सीते, कोण असेल तो पुरुष
जो वर्षभर परपुरुषाच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा
स्वीकार करेल?
मी तुला मुक्त करतोय, जिथे जायचेय तिथे तू जाऊ शकतेस.
त्याने तुला कवेत घेऊन उचललं
आणि मृत्यूपर्यंत तुला पाहत जगला.
माझं दायित्व होतं तुला मुक्त करण्याचं
मात्र आता स्वीकारु शकत नाही तुला पत्नीसारखं!
वाल्मिकींचे नायक तर राम होते
ते का बरे लिहितील, सीतेचे रुदन
आणि तिची मनोवस्था?
त्या क्षणांत सीतेने काय नि किती विचार केले असतील
की, हे तेच पुरुष आहेत का
ज्यांना मी वरले होते स्वयंवरी,
हे तेच पुरुष आहेत का ज्यांच्या प्रेमाखातर
महाल अयोध्येचा त्यागला होता मी
आणि भटकले होते वनोवनी!
होय, रावणाने मला बाहूंत घेतलेले
होय, रावणाने मला प्रेमाचा प्रस्ताव दिलेला
तो राजा होता, इच्छा असती तर बलपूर्वक नेलं असतं आपल्या घरी
पण रावण पुरुष होता
त्याने केला नाही माझ्या स्त्रीत्वाचा अपमान कधी
भलेही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवलं नसेल त्याला इतिहासात!
हे सर्व वाल्मिकी सांगू शकले नसते
कारण त्यांना तर रामकथा सांगायची होती!
पुढची कथा तुम्ही जाणताच,
सीतेने दिली अग्निपरीक्षा.
कवीला होती घाई लवकर कथा संपवण्याची
परतले अयोध्येस राम, सीता आणि लक्ष्मण
नगरवासियांनी केली साजरी दीपावली
ज्यात सामील झाले नाहीत नगरातले धोबी.
आज दसऱ्याच्या या रात्रीस
मी उदास आहे त्या रावणासाठी,
ज्याची मर्यादा
कुण्या मर्यादापुरुषोत्तमाहून कमी नव्हती
मी उदास आहे कवी वाल्मिकींसाठी,
जे रामाच्या जोडीने सीतेचे मनोभाव लिहू शकले नाहीत
आज या दसऱ्याच्या रात्रीस
मी उदास आहे स्त्रीच्या अस्मितेसाठी
त्याचं शाश्वत प्रतीक असणाऱ्या जानकीसाठी!…
– राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.
अनुवादक : समीर गायकवाड
संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈