श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपलं संपूर्ण जगणंच व्यापून टाकणारा, अपरिमित ऊर्जा ठासून भरलेला असा एक शब्द म्हणजे शक्ति ! हा शब्द स्वतःच शक्तिशाली आहे कारण शक्तिची असंख्य रुपे त्याने स्वतःत सामावून घेतलेली आहेत.

शक्ति या शब्दाच्या अर्थात लपलेले विविध बारकावे लक्षात घेतले तर जगरहाटीतलं शक्तिचं आस्तित्व आणि महत्त्व दोन्हींची कल्पना येईल.

शक्ति म्हणजे सामर्थ्य,बळ,जोर ताकत तसंच कुवत,दम आणि रगही.शक्ति म्हणजे प्राबल्य, क्षमता, मातब्बरी जसं तसंच त्राण, जोश, प्रभाव, पात्रता,अवसान,आवेग आणि आवाका सुध्दा!शक्ति म्हंटलं की हे सगळं सहज सुचणारं पण म्हणून फक्त एवढंच नाही तर यापेक्षाही बरंच कांही विचारप्रवृत्त करणारं आणि जगणं सजग करणारंही.

हिंदू धर्मानुसार जागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेली अतिशय प्राचीन अशी नैनादेवी, अमरनाथ, पुष्कर, अमरकंटक, सोमनाथ, वृंदावन, अंबाजी, मानसरोवर.. अशी एकूण पन्नास शक्तिपीठे आहेत.या आणि अशाच श्रध्देने मनात जपलेल्या इतरही विविध  दैवतांची ही शक्तिशाली देवस्थाने म्हणजे दैवीशक्तीची जनमानसातील प्रतिकेच! या श्रद्धेमुळे मिळणारी मन:शांती वादातीत असली तरी जीवन व्यतित करताना रोजच्या व्यवहारांसाठी अशा परस्वाधिन मन:शांतीकडे अनेकदा प्रश्नांची सोडवणूक करणारा एकमेव मार्ग म्हणून पहाणे उचित ठरणारे नाही.खरंतर त्यासाठी  शक्तिची प्रतिकारशक्ती,सहनशक्ती क्रयशक्ती, प्राणशक्ति, आत्मशक्ति,विचारशक्ति अशी इतर रुपेही प्रयत्नपूर्वक अभ्यासून त्यांची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्नशीलही रहायला हवे.  

इथे दैवी शक्तीला नाकारणे अपेक्षित नाहीय तर तीच दैवी शक्ती कणरुपाने आपल्याठायीही वसते आहे हे लक्षात घेऊन शरीर आणि मनाच्या संदर्भात लिहिण्याच्या ओघात वर उल्लेख केलेली आणि इतरही शक्तिरुपे आपल्या भावनिक, मानसिक, बौध्दीक, शारीरिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी कशी महत्त्वाची ठरतात हे जाणून घ्यायला हवे.हे साध्य होण्यासाठी, हे  शोधण्यासाठी कुठे बाहेर फिरत बसायची गरज नाहीय तर त्यासाठी फक्त स्वतःच्या आंत जाणीवपूर्वक डोकवायला हवे फक्त ! हे फार अवघड नाही आणि मनावर नाही घेतले तर सोपेही नाही !

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे खरेच,पण ते फक्त जन्म न् मृत्यू यापुरतेच.या दोन टोकांमधला प्रवासही जर आपण प्रत्येक क्षणी स्वतःला सर्वच बाबतीत पराधीन समजून ‘असेल माझा हरी…’ म्हणत प्रयत्नांची पराकाष्ठा न करता खाटल्यावर झोपूनच रहाणार असू तर परमेश्वराने जे असं इतकं मोलाचं आपल्याला दिलेय त्याची पुसटशीही जाणीव आपल्याला कधी होणंच शक्य नाही!

 हे मोलाचं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर एका शब्दात द्यायचं तर शक्ति!

 शक्ती म्हणजे सामर्थ्य, कुवत,  क्षमता हे झालंच. पण शक्ति या शब्दात सामावलेलं याही पलिकडचं बरंच कांही शक्ति या शब्दाचे अर्थ व्यक्त करणाऱ्या अशा मोजक्या शब्दांत मावणारं नाहीय.

 शक्ति म्हटलं की चटकन् नजरेसमोर येते ती आपली शारीरिक क्षमता. सहजपणे दृश्य रूप असणारी,अनुभवता येणारी ही शरीरक्षमता शरीराच्या स्वाधीन मात्र नसते.ती पूर्णतःपरस्वाधिनच  असते. आपण आपली शरीरक्षमता शिस्तबद्ध आचार आणि प्रयत्न याद्वारे सक्षम ठेवू शकत असलो तरी ते आपल्या मनाची साथ असेपर्यंतच. मन अस्वस्थ असेल तर  मनातील भावनांच्या कल्लोळामुळे निर्माण होणाऱ्या  अस्थिरतेत ही प्रयत्नपूर्वक मिळवलेली शारीरिक क्षमता जशी वेगाने कमीही होऊ शकते तसेच एरवी स्वस्थ,आनंदी असणारे मनही आपल्या शारीरिक आजार,तक्रारी यामुळे निर्माण होणाऱ्या बेचैनीच्या सावल्यांनी ग्रासूनही जाऊ शकते.

 याचाच अर्थ शारीरिक शक्ति आणि मनोबल याचा विचार करता शरीर आणि मन दोन्हीही याबाबतीत पूर्णतः परस्परावलंबी असतात हे ओघाने आलेच. शरीरमनाचा हा एकोपा अबाधित ठेवणं बऱ्याच प्रमाणात आपल्या हाती असेलही कदाचित पण त्यासाठी आवश्यक असणारी सजगता मात्र खूप कमी जणांकडे असते.त्यासाठी आवश्यक आहे ते आनंदी जगण्याचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करणं.पण सर्रास भौतिक सुखाला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या आजच्या जीवनशैलीत ही रहस्यउकल सहजशक्य होणं कठीणच.कारण त्यांची निकड जाणवण्याइतकी उत्कट भावना व्यवहारी मन आणि विचारांमुळे निर्माण होणे अशक्यप्राय असते.

 जगणं आनंदी करण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक क्षमतांचे यथायोग्य आकलन करून घेऊन त्याचा योग्य वापर करणारे त्यामुळेच हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील.

इथे स्वतःच्या नैसर्गिक क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता किंवा मनाचा कणखरपणा, मनोबल वगैरे शब्दांतून व्यक्त होणाऱ्या मनाच्या क्षमता अभिप्रेत नाहीयेत. इथे अभिप्रेत आहे ते याही पलीकडचं ‘अंत:प्रेरणा’, ‘आतला आवाज’ वगैरे जिथून उमटतं कसं गृहित धरलेलं असतं ते. चराचर व्यापूनही कणभर उरत असणारं जे परमतत्त्व ते आपल्या अंतरातही जिथं वसलेलं असतं ते ! ते प्रत्येकाच्याच अंतरात असतंच !!

आपल्या विचारांमुळे, कृतीमुळे कुणालाही न दुखावता वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य विचार करून आपल्या      सद्सद्विवेकाला साक्षी ठेवून कार्यमग्न असणारी नास्तिक व्यक्ती देवाचं आस्तित्त्व न मानताही सुखी,आनंदी आणि यशस्वी जीवन जशी व्यतीत करु शकते तशीच एखादी आस्तिक व्यक्तीही देवपूजा,व्रतवैकल्ये, शुचिर्भूत विचार यांची कास धरून परमेश्वरावरील अतूट श्रद्धेने वाटचाल करीत जीवन कृतार्थही करू शकते.याचाच अर्थ वैचारीक बैठक वेगळी असली तरी आपल्या निसर्गदत्त क्षमतांचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा पुरेपूर वापर करणेही अवघड नसते.या क्षमता हीच खरी निसर्गदत्त शक्ति! ही शक्ति नेमकी असते कुठे ?आणि ती सहजपणे जाणवत कशी नाही? असे प्रश्न पडले तरच त्यांच्या उत्तरांचा शोध सुरु होईल आणि त्या शोधवाटांवरचा प्रवासही!

या प्रश्नांचं उत्तर म्हंटलं तर अगदी सरळ साधं पण ते प्रथमदर्शनी तरी अनाकलनीय वाटेल असंच.

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी जसा परमेश्वर तशीच ही परमशक्तीही ‘यत्र तत्र सर्वत्र’! त्यामुळेच ती अंशरूपाने आपल्याच अंतरातही वास करीत असतेच. ती सुप्त असल्यामुळे जाणवत नाही. तिला जाणून घेणे, ओळखणे हे जाणिवपूर्वक केले तरच शक्य असते.

आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेल्या असंख्य क्षमतांसारखीच अतिशय मोलाची देन म्हणजे आपलं अंतर्मन! आपलं अंतर्मन म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वाधीन असलेलं एक परमशक्तीकेंद्रच! निसर्गाकडूनच बहाल केलं गेलेलं ज्याचं त्याचं हक्काचं असं एक गूढ शक्तिपीठ! अगदी कलियुगातही थक्क वाटावेत असे चमत्कार घडवण्याची अपारशक्ती या शक्तीपीठातच सामावलेली आहे. वरवर पाहता आपल्या शरीर न् मनाची सूत्रं मेंदूकडे असतात असं आपण समजतो तो मेंदूही खऱ्या अर्थाने अधिकारकक्षेत येतो ते या अंतर्मनरूपी शक्तीपीठाच्याच! सर्वसाधारण दैनंदिन व्यवहार मेंदूच्या स्वाधीन करून अंतर्मन सुप्तावस्थेत रहाते खरे पण अचानक उद्भवलेल्या कसोटीच्या,आकस्मिक आणीबाणीच्या क्षणी आपल्याही नकळत तत्परतेने घडणाऱ्या आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया घडवल्या जातात ते अंतर्मनाने समयसूचकतेने मेंदूला दिलेल्या तत्क्षणीच्या सूचनांमुळेच. अंत: प्रेरणा म्हणतात ती हीच! आपलं शरीर,मन,बुद्धी या  त्रिशक्तींचं भान सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित आचार यामुळे जाणिवपूर्वक प्रदूषणरहित ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण असेल तर अशा कसोटीच्या,आणीबाणीच्या, आकस्मिक संकटाच्या क्षणी कार्यरत होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया एखादा चमत्कार घडावा तशी आपलं सुरक्षाकवच बनून आपल्याला सावरतात.आपलं रक्षण करतात. आणि त्या मागचं रहस्य माहित नसलेले आपण ‘माझी वेळ चांगली होती’, किंवा ‘ही परमेश्वराचीच कृपा’ असे म्हणून आपले समाधान करुन घेतो. पण ती खरंतर आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचीच किमया असते!ही परमशक्ती हाच आपला अंतरात्मा..! पण हे कार्यकारणभाव आपण कधी जाणीवपूर्वक समजून मात्र घेतलेले नसतात.

हे समजून न घेतल्यामुळेच आपल्या आयुष्यभराच्या या जगातल्या वास्तव्यात आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचा वापर फार फार तर एखादाच टक्का केला जात असतो आणि एवढी मोलाची बाकी राहिलेली 99% परमशक्ती मात्र कधी वापरलीच न गेल्याने सुप्तावस्थेतच नाहीशी होत असते!

एरवीची आपली इच्छा कितीही प्रबळ असली तरी ती इच्छाशक्ति आपल्या अपेक्षेनुसार म्हणावी तशी सक्षम असूच शकत नाही. ती जेव्हा आपल्या अंतर्मनातून तिथल्या आंतरिक सशक्ततेने  वर झेपावते तेव्हाच ती इच्छाशक्ति ‘उत्कट’ असते आणि अशी उत्कट इच्छाशक्तिच आश्चर्यकारकरित्या फलद्रूप होऊ शकते!

‘कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी….

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..’ अशी आपली अवस्था आहे ते हे अंतर्मनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आपण कधीच न केल्याने. ते गूढ उकलण्याच्या असंख्य सहजसोप्या वाटा शोधण्यासाठी निखळ श्रध्देचं बोट धरुन अध्यात्माच्या वाटेवर पडणारं आपलं पहिलं पाऊलच महत्त्वाचं. पुढची वाटचाल अंत:प्रेरणेनेच आपसूक सुकर होईल हे निर्विवाद!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments