सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 155
☆ गझल …वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
इथे कधी दरवळले नाही वसंत वैभव
उदास हृदयी रुळले नाही वसंत वैभव
निशीदिनी मी राखण केली रक्त सांडले
सभोवती सळसळले नाही वसंत वैभव
अता मलाही जगता येते तुझ्याविना रे
ऋतुबहरांशी वळले नाही वसंत वैभव
सख्या नको मज केविलवाणे तुझे समर्थन
मनात का वादळले नाही वसंत वैभव
कुहू कुहू कोकिळ गातो आर्त पंचम जरी
मधुर स्वरांशी जुळले नाही वसंत वैभव
किती दिसांनी जल हे सजले कमल फुलांनी
मृणाल ओठा कळले नाही वसंत वैभव
मला किती ते उपरोधाने उदंड हसले
“कसे तुझ्यावर खिळले नाही वसंत वैभव “
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद भाईसाब आणि संपादक मंडळ🙏🙏