सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५३.
अगणित रंगाच्या रत्नांनी कौशल्यानं घडलेलं,
नक्षत्रांनी जडवलेलं हे कंगन सुरेख आहे.
पण भगवान विष्णूंच्या गरुडाच्या आरक्त सूर्यप्रकाशात पूर्णपणे तळपणाऱ्या पंखांच्या
विजेच्या आकाराची ही तू दिलेली तलवार
अधिक सुंदर आहे.
मृत्यूचा अखेरचा घाव बसल्यानंतरच्या दु:खाची
अखेरची धडपड व्हावी तशी ती चमचम करते.
एकाच भीषण आघातानं जाणीव होतानाच्या
शुध्द ज्वालेप्रमाणं ती तळपत राहते.
तू दिलेलं कंगन सुरेख आहे.
त्यावरील नक्षत्रासारखे मोती छान आहेत.
पण तू दिलेली तलवार हे स्वामी, किती सुंदर बनवली आहे!
ती पाहताना तिचा विचार मनात आला तरी भीती वाटते.
५४.
तुझ्याकडं मी काहीच मागितलं नाही की
माझं नावही तुला सांगितलं नाही.
तू परतून गेलास तेव्हा मी स्तब्ध राहिलो.
झाडांच्या सावल्या
वेड्यावाकड्या पसरलेल्या होत्या.
आपल्या तांबड्या घागरी काठोकाठ भरून
बायका गावाकडे परतत असताना
त्या मला पालवीत होत्या.
“घराकडे चल. सकाळ संपून दुपार होत आलीय.”
पण. . .
एकटाच विहिरीच्या आसपास भटकत राहिलो.
धूसर चिंतनात मी हरवून गेलो.
तू माझ्याकडे येत असताना
तुझ्या पावलांचा आवाज मला ऐकू आला नाही.
दु:खभरल्या नजरेनं माझ्याकडे पाहून
दमलेल्या आवाजात म्हणालास,
“अरे! मी तहानलेला प्रवासी आहे.”
मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो आणि
तुझ्या जुळलेल्या ओंजळीत पाण्याची धार धरली.
माझ्या माथ्यावरची पानं सळसळली.
दूरच्या काळोखात कोकीळ गाऊ लागला.
रस्त्यावरच्या वळणावरून ‘बाबला’ फुलांचा वास
दरवळला.
तू माझं नाव विचारलंस तेव्हा
शरमेनं मी उगी राहिलो.
माझं नाव लक्षात ठेवण्यासारखं
मी तुझ्यासाठी काय केलंय?
तुझ्या तहानवेळी मी तुला पाणी देऊ शकलो
याची जाण मी मनात जपून ठेवीन आणि
तिची गोडी माझ्या ऱ्हदयात फुलत ठेवीन.
सकाळ संपली, पक्षी उंच स्वरात गाताहेत.
निंबाच्या झाडावरची पानं सळसळताहेत आणि
मी विचार करतो आहे…
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈