सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २८ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची ✈️
मध्यप्रदेश म्हणजे भारताचे हृदयस्थान! विविधतेने नटलेला आपला भारत हा एक संपन्न देश आहे. नद्या, पर्वत, जंगले, समुद्र यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि शिल्पकला, चित्रकला, लोककला, हस्तकला यांचा प्राचीन, संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. मध्यप्रदेशमध्ये नर्मदा, शोण, चंबळ यासारख्या महानद्या, सातपुडा, विंध्य यांच्या पर्वतरांगा, हिरवीगार जंगले आणि भरपूर खनिज संपत्ती आहे.इथे आदिमानवाच्या काळातील गुहेतील चित्रकलेपासून खजुराहो, बेतवापर्यंतची अप्रतिम शिल्पकला अशा साऱ्यांचा संगम अनुभवता येतो.
सातपुडा पर्वतरांगांच्या कणखर सिंहासनावर राणीप्रमाणे आरुढ झालेले ठिकाण म्हणजे पंचमढी! भोपाळपासून पंचमढी साधारण दोनशे किलोमीटरवर आहे. तर पिपारीया रेल्वे स्टेशनला उतरून पंचमढीला जाण्यासाठी पन्नास किलोमीटरचा वळणावळणांचा सुंदर घाटरस्ता आहे. दुतर्फा असलेल्या साग,साल,महुआ, आवळा, जांभूळ अशा घनदाट वृक्षराजीतून जाणारी ही वाट आपल्याला अलगद पंचमढीला पोचवते.
ब्रिटिश कॅप्टन फॉरसिथ यांना १८५७ साली पंचमढीचा शोध लागला. कोरकू नावाची आदिवासी जमात हे इथले मूळ रहिवासी होते. ब्रिटिशांनी या थंड हवेच्या ठिकाणाचा काही काळ उन्हाळी राजधानी म्हणूनही उपयोग केला. त्यामुळे इथल्या इमारती, चर्चेस यावर तत्कालीन ब्रिटिश स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. सुंदर, स्वच्छ रस्त्यांवरून, स्थानिक छोट्या टुरिस्ट गाडीने आपल्याला तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. मुख्य रस्त्यापासून ‘जमुना प्रपात’कडे जाणारा रस्ता उतरणीचा, खडबडीत दगड- गोट्यांचा आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळेच्या सहली व इतर अनेक प्रवासी तिथे होते. पाण्याच्या एका वाहत्या प्रवाहात काहीजण डुंबण्याचा आनंद घेत होते . एक अगदी छोटा मुलगा प्रवाहाच्या काठावर बसून एकाग्रतेने हाताच्या ओंजळीत तिथले छोटे मासे येतात का ते पहात होता. प्रवाहावरील लाकडी साकव ओलांडून गेल्यावर पुढ्यात उंच डोंगरकडे व खोल दरी आली. तिथल्या प्रेक्षक गॅलरीतून एक हजार फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्याच्या, उन्हात चमकणाऱ्या रुपेरी धारा नजर खिळवून ठेवतात. अनेक उत्साही तरुण-तरुणी दुसऱ्या छोट्या अवघड वाटेने उतरून, धबधब्याच्या तळाशी पोचून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत होते. उन्हाळ्यामध्ये इथल्या दगडी कपारीत मधमाशा मोठमोठी पोळी बांधतात म्हणून या धबधब्याला ‘बी फॉल (Bee Fall)’ असेही म्हणतात.
तिथून पांडव उद्यान बघायला गेलो. एका छोट्याशा टेकडीवर सॅ॑डस्टोनमधील बौद्धकालीन गुंफा आहेत. वनवासाच्या काळात पाच पांडवांनी इथे वस्ती केली होती व त्यावरून या ठिकाणाचे नाव पंचमढी असे पडल्याचे सांगतात. टेकडीभोवतीचे उद्यान विस्तीर्ण आणि अतिशय सुरेख ठेवले आहे. नाना रंगगंधांची गुलाबाची बाग नजरेत भरत होती. हिरवळीवर निळ्या, केशरी, लाल, पिवळ्या फुलांचे ताटवे फुलले होते. कडेचे वृक्ष त्यांच्यावर चढविलेल्या रंगीत बोगन वेली, पिवळी कर्णफुले यांनी शोभत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ‘हंडी खो’ येथे गेलो. हे ठिकाण म्हणजे सरळसोट कातळांची खोलवर उतरलेली निबीड दरी आहे. नुसते वरून पाहूनच दरीचे रौद्रभीषण सौंदर्य डोळे फिरवीत होते. या ठिकाणी ‘हंडी’ नावाचा ब्रिटिश रेंजर दरीच्या तळाचा ठाव घ्यायला म्हणून गेला तो परतलाच नाही म्हणून या ठिकाणाला ‘हंडी खो’ म्हणजे हंडी साहेब खो गये असे नाव पडले आहे.
तिथून गुप्त महादेव बघायला गेलो. तिथल्या एका सरळसोट उंच वृक्षावरून तशाच दुसऱ्या उंच वृक्षावर शेकरू खारी उड्या मारत होत्या. शेकरू खारी आपल्या नेहमीच्या खारींपेक्षा आकाराने खूप मोठ्या व लांब झुबकेदार शेपूट असलेल्या असतात. आपल्याकडे भीमाशंकरला अशा शेकरू बघायला मिळतात. शेकरू खार महाराष्ट्राचा ‘राज्य प्राणी’ आहे. एका दगडी लांबट गुहेत एका वेळी जेमतेम दोन-तीन माणसे जाऊ शकतील एवढीच जागा त्या गुप्त महादेव मंदिरात होती. खोलवर शंकराची पिंडी होती. आणि डोंगरातील झऱ्यांचे पाणी त्यावर झिरपून वाहत होते. तिथून जवळ असलेले दुसरे महादेवाचे मंदिरही असेच होते पण ही गुंफा खूप मोठी लांबरुंद होती. मध्ये वाहता झरा होता. दोन्हीकडे खूप मोठमोठी माकडे आपल्या हातातील काहीही खेचून घ्यायला टपलेली होती. या गुंफेच्या एका कडेला दुसरी गुंफा आहे. या गुहेच्या भिंतीवर आदिमानवाच्या काळातली पशुपक्षी, बिनसारखे वाद्य वाजविणारा माणूस अशी चित्रे कोरलेली आहेत.
४५०० फूट उंच असलेले धूपगड हे सातपुडा पर्वतश्रेणीतील सर्वात उंच शिखर आहे. वळणावळणाच्या रस्त्याने दोन्ही बाजूंच्या उंच सुळक्यांमधून जीप वर चढत होती. मधल्या ‘नागफणी’ नावाच्या कड्यावर धाडसी तरूण ट्रेकिंगसाठी जात होते. शिखरमाथ्यावर पोहोचलो तर सूर्यास्त पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. लांबरुंद दरीकडेच्या पर्वतश्रेणीवरील तरंगत्या ढगांच्या कडा सोनेरी तांबूस झाल्या होत्या. सूर्यदेव डोंगराआड अस्ताला जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात एका दाट राखाडी रंगाच्या मोठ्या ढगाने सूर्यबिंब झाकून टाकले. त्या ढगाच्या कडा सोनेरी तांबूस झाल्या. ढगाआडूनच सूर्यदेवांनी निरोप घेतला. निःस्तब्ध, हुरहुर लावणारी शांतता आसमंतात पसरली.
धूपगडच्या शिखर टोकावरील थोड्या मोकळ्या जागेत एक ब्रिटिशकालीन दणकट बंगला आहे. ब्रिटिशांची जिद्द, धाडसी सौंदर्यदृष्टी याचे काही वेळेला खरंच कौतुक वाटते. मोठमोठे चौकोनी चिरे व उत्तम लाकूड वापरून बांधलेला हा सुबक बंगला शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ऊन, वारा, पाऊस, थंडी यांना तोंड देत सातपुड्यासारखाच ठाम उभा आहे. आता या बंगल्यात म्युझियम केले आहे. सातपुड्याची माहिती देणारे लेख, नकाशे व तिथल्या निसर्गाच्या विविध विभ्रमांचे उत्तम उत्तम मोठे फोटोग्राफ तिथे आहेत. तसेच स्थानिक कोरकू आदिवासींची माहिती, त्यांच्या प्रथा सांगणारे लेख व फोटोग्राफस् आहेत.
पंचमढीला मिलिटरीची तसेच राज्य पोलीस दलाची खूप मोठी ट्रेनिंग सेंटर्स आहेत. प्रवाशांसाठी पॅरासेलिंग, नौका विहार, सातपुडा नॅशनल पार्क अशी आकर्षणे आहेत. पुरातन अंबामातेच्या देवळाचा सुंदर जिर्णोद्धार केला आहे. बेगम पॅलेसचे भग्नावशेष शिल्लक आहेत. इथले शंभर वर्षांपूर्वीचे रोमन कॅथलिक चर्च बघायला गेलो.१८९२ मध्ये बांधलेले हे सुबक सुंदर चर्च म्हणजे ब्रिटिश व फ्रेंच स्थापत्य शैलीचा नमुना आहे.चर्चच्या खूप उंचावर असलेल्या स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांवर लाल, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या रंगांमध्ये सुंदर नक्षी, कमळे, येशू, मेरी यांची चित्रे आहेत. चर्च शेजारी दुसऱ्या महायुद्धातील इटालियन सैनिकांचे चिरविश्रांती स्थान आहे.
आमच्या भोजनगृहाचे नाव ‘अमलताश’ असे होते. अमलताश म्हणजे बहावा (कॅशिया ) वृक्ष इथे भरपूर आहेत. वैशाख महिन्यात या झाडांवरून सोनपिवळ्या रंगाचे लांबट गुच्छ डुलायला लागतात तेव्हा निसर्गदेवतेच्या कानातल्या झुमक्यांसारखे वाटतात. आपल्याकडेही बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष दिसतो. तिथल्या मुचकुंदाच्या झाडांवर पोपटाच्या चोचीसारख्या आकाराच्या हिरव्या मोठ्या देठातून केशरी- लाल रंगाच्या पाच भरदार पाकळ्यांची फुले उठून दिसत होती. सतेज, प्रसन्न निसर्गसौंदर्याला कुर्निसात करून सातपुड्याच्या राणीचा निरोप घेतला.
मध्यप्रदेश भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈