श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

पावसाची शक्यता

वा-याने आधीच होती वर्तवली

भिजली.. कुडकुडली.. ज्यांनी दुर्लक्षिली…

***

नकोश्या पाना-फुलांना

झाडाने वा-यावर सोडलं

धरतीने पदरात घेतलं….

***

क्षणभर पक्षी

खिडकीच्या गजांवर बसला

घराचा खोपा झाला…

***

हिरवळ; कितीही

अन् कुणीही तुडवा

पावलांना देतच रहाते गारवा….

***

भर वस्तीतला

तो एक वाडा पडका

भरल्या घरातला जणू म्हातारा पोरका…

***

क्षणभर मासोळी

पाण्याच्या पृष्ठभागावर आली

चाणाक्ष पक्षाने पट्कन टिपली…

***

पुराच पाणी

काठोकाठ असतं वहात

म्हणून त्यात कोणी बसत नाही नहात…

***

शांत आत्ममग्न डोह

दिसायला समाधिस्त दिसतो

इवलसं पान पडताच थरथरतो…

***

अंधारात पक्षी किलबिलू लागले

की उजाडणार हे समजावे

असे नाही की सूर्यानेच दिसावे…

***

कितीही उंची गाठली तरी

उतार मिळताच धावू लागत पाणी

मग त्याला अडवू शकत नाही कोणी…

***

कच-याच्या ढिगावर

मोहक रंगीत पक्षी बसला

कचरा लक्षवेधी बनला…

***

पक्षाचा खोपा

टांगता अधांतरीच असतो

पक्षाचा फांदीवर गाढ विश्वास असतो…

***

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments