सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ ” दीप पाजळू या !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
आईबाबांचा लेक लाडका
दीप सर्वांच्या आशेचा असे
भविष्यातील आधार काठी
मानसिक स्वास्थ्य जपतसे ||
ज्ञानदीप उजळी जीवना
दूर करूनिया अज्ञानाला
विद्येचे हे पवित्र मंदिर
देतसे आकार आयुष्याला ||
स्नेहदीप हा माणुसकीचा
घराघरातून तेवतसे
स्नेहबंध हा मानवतेचा
घट्ट बांधुनिया ठेवीतसे ||
मांगल्याचा दीप उजळतो
शांतपणाने देवघरात
चैतन्याच्या लहरी उठवी
प्रसन्नचित्ते चराचरात ||
दीपकाचे पूजन करिती
कुटुंब स्वास्थ्य समृद्धीसाठी
विनम्र आवाहन तेजाला
उत्तम आरोग्य सर्वांसाठी ||
ज्योतीने पेटवितो ज्योत
दीप करीतसे दीपोत्सव
अखंडतेचे तत्व चेतवी
तिमिरातूनी प्रकाशोत्सव ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈