सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ जान है तो जहाँ है ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात.
इकडे लगातार तीन दिवस तीन वेगवेगळ्या टोकाच्या हवामानाचा अनुभव सगळ्यांनी घेतला. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण,कुंद हवा, पाऊस तर दुसऱ्या दिवशी थंडी, बोचरे वारे,आणि तिस-या दिवशी अचानक सर्वत्र ऊन. ह्या अचानक बदलत्या हवामानाने सगळीकडे सर्दी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला ह्यांच्या मा-याला आपल्याला तोंड द्यावं लागतयं.
खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.
त्यामुळे ह्या आजारपणाच्या काळात मात्र माणसाला माणसाची खरी किंमत कळायला लागते.सध्या ह्या आजारपणात घरात वा नोकरीच्या जागी तीन गट पडलेतं.पहिल्या गटात संपूर्णपणे आजारी असलेल्या व्यक्ती, दुसऱ्या गटात थोडफार बरं वाटत नसलेल्या व्यक्ती आणि तिस-या गटात एकदम ठणठणीत व्यक्ती. ह्यापैकी तिसऱ्या गटातील व्यक्तींचे संख्याबळ अगदी कमी आहे.
काल परवापर्यंत ह्या आजारपणात मी दुसऱ्या गटात मोडत होते.नंतर मात्र अंगावर काढल्याने शेवटी तिसऱ्या फेज मध्ये प्रवेशकर्ती झालीय. आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.
त्यामुळे आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेऊन झाल्यावर ह्या आजारपणात आलेल्या चांगल्या अनुभवांविषयीची पोस्ट काही दिवसात लिहीनच.
औषधांपेक्षाही सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागतं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈