श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 164
काळोख शमविण्याला येतात काजवे हे
घेऊन दीप हाती फिरतात काजवे हे
अंधार रात्र आहे पत्ता न चांदण्यांचा
त्यांचीत फक्त जागा घेतात काजवे हे
गुंफून हात हाती करतात नृत्य सारे
सुंदर प्रकाश गीते गातात काजवे हे
छळतो तिमिर तरीही थोडा उजेड आहे
आधार जीवनाचा होतात काजवे हे
नाजूक जीव आहे हलक्या मुठीत माझ्या
घेतो कधी कधी मी हातात काजवे हे
शेतात चोर रात्री येऊ नयेत म्हणुनी
घालून गस्त रात्री जातात काजवे हे
आहे स्वयंप्रकाशी इवला प्रकाश तरिही
निर्माण राज्य येथे करतात काजवे हे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈