सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 157
☆ लावणी – 2 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
साजणा हौस माझी पुरवा, हौस माझी पुरवा
यंदा जत्रेत मला की हो मिरवा मला तुम्ही मिरवा ॥धृ ॥
चोरून भेटण्यात वर्ष गेली चार
तुम्ही मर्द गडी तालेवार
मी सुकुमार देखणी नार
पाढा पुन्हा पुन्हा प्रीतीचा गिरवा
यंदा जत्रेत मला की हो मिरवा.. ॥१॥
राजसा,अहो दिलवरा माझं जरा ऐका
बक्कळ झालाय तुमच्या कडं पैका
इश्कबाजीचा बसू द्या ना शिक्का
सा-या गावाची तुम्ही जरा जिरवा
यंदा जत्रेत मला की हो मिरवा…॥२॥
पाळणा जत्रेतला घालतोय साद
खेटून बसताच मिटतील वाद
जडला जीवास तुमचाच नाद
हात हलकेच पाठीवर फिरवा
यंदा जत्रेत मला की हो मिरवा ..॥३॥
साज सोन्याचा, पुतळ्याची माळ
घडवा आतातरी चांदीचे चाळ
नाच नाचून बोलते मधाळ
विडा वर्खाचा ओठामधे भरवा
यंदा जत्रेत मला की हो मिरवा…॥४ ॥
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈