श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘हद्द…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆
तात्यांच्या ‘ बाहेर जाऊन बघण्याच्या..’ विचाराने आणखी घाबरून जात त्यांची बायको म्हणाली.
“अगं ,नको काय ? मागे गुरं आहेत गोठ्यात.. बघायला हवं.”
तात्या बॅटरी घेऊन मागचे दार उघडून मागील बाजूस आले. त्यांनी गोठ्यात बॅटरीचा झोत टाकला. गोठा आणि गुरं सुरक्षित होती.. पण झालेल्या आवाजाने बुजून दाव्यांतून मोकळे होण्यासाठी धडपडत होती..
” गंगे ss ! “
तात्यांनी गोठ्याजवळ जात गाईला हाक मारली तशी त्यांच्या आवाजाने सारी जनावरे आश्वस्थ झाल्यासारखी शांत झाली. तात्यांच्या आवाजाने त्यांना आधार वाटला असावा. त्यांनी गोठ्यात जाऊन सर्वत्र बॅटरीचा प्रकाशझोत टाकला आणि प्रत्येक जनावराच्या पाठीवर थाप मारत बाहेर आले. ‘जवळपास कुठंतरी झाड पडले असेल, बघू सकाळी.’ असे घराच्या मागच्या दारात उभ्या असलेल्या बायकोला म्हणत आत जाणार तितक्यात परत काहीतरी कोसळल्यासारखा आवाज झाला. त्यांनी पाऊल मागे घेत आवाजाच्या दिशेने सभोवार बॅटरीचा झोत टाकला. काहीच दिसेना. ते दोन पावले पुढे निघाले तोच भिऊन दाराशी थिजलेल्या त्यांच्या बायकोने ओरडून सांगितले,
” अहो, फार पुढं जाऊ नका… एखादे झाड नाहीतर झाडाची फांदी तुटून पडायची..”
ते क्षणभर थबकले. एक दोन पावले मागेही आले पण पुन्हा काहीसा विचार करून, बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पावसात भिजतच बॅटरीचा झोत सभोवार टाकत पुढं गेले.
बॅटरीच्या झोतात समोर दिसले ते पाहून त्यांची वाचाच गेल्यासारखे झाले. जणू पावले जमिनीला चिकटल्यासारखे ते निमिषभर खिळून राहिले. दारात ऊभा राहिलेल्या त्यांच्या बायकोला अंधारात ते दिसत नसले तरी बॅटरीच्या झोतामुळे त्यांचे अस्तित्व जाणवत होते. सभोवार फिरत पुढे सरकणारा बॅटरीचा झोत स्थिरावल्याचे पाहून भीती बरोबर तात्यांची काळजीही मनात दाटून आली आणि त्यांनी जरा जास्तच मोठ्या आवाजात विचारले,
” अहो, काय झाले? तुम्ही ठीक आहात ना ? “
बायकोच्या ओरडण्याने भानावर आलेले तात्या ओरडून म्हणाले,
” बाप रे ! अगं ss शेजारच्या वहिनींचे घर कोसळलंय.. “
ते झटकन परत आले. असल्या पावसातही त्यांना दरदरून घाम आला होता. त्यांनी ओरडून बायकोला सांगितले असले तरी तिला व्यवस्थित ऐकू आले नसणार याची जाणीव होऊन ते पुन्हा म्हणाले,
” अगं, वहिनींचे घर कोसळलंय.. बघायला हवं..दोघेही अडकली असणार… चल, जाऊया. पटकन कंदील लाव. “
” अहो पण .. आपण दोघेच..?”
” आता इथं आपल्या रानातल्या वस्तीच्य जवळपास कुणाचं घर तरी आहे का हाकेच्या अंतरावर ? चल पटकन..”
कंदील लावताच तसल्या पावसात दोघेही कंदील आणि बॅटरी घेऊन शेजारी गेले. सारं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं होतं. बॅटरीचा झोत पायाजवळ टाकून ते एक एक पाऊल पुढं टाकत होते. सावधपणे कानोसा घेत, स्वतःला सावरत ते दगड-विटा मातीच्या मलब्यावर चढून पुढे जात होते. भल्या मोठ्या तुळया कोसळल्या होत्या सर्वात शेवटी मागची भिंत कोसळली असणार.. तिच्या दगड-विटा, माती तुळ्यावर पुढच्या बाजूला घरंगळली होती. ते कोसळलेल्या दगडांचा, तुळयांचा आधार घेत पुढे सरकत, कानोसा घेत होते. त्यांना कण्हण्याचा आवाज आल्यासारखे वाटले.
क्रमशः...
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈