इंद्रधनुष्य
☆ दोन चित्रे – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
आईने तिच्यासाठी शब्दकोडे, चित्रकोडे यांचे पुस्तक आणले होते. आधी ती हरखून गेली. तिनं मग ते पुस्तक उघडले. पहिलाच खेळ होता– मांजराला माश्याकडे मार्ग दाखवा. तिनं पेन्सिलीने रेघांची वेटोळी ओलांडून क्षणात ते कोडं ओलांडलं. पुढचा खेळ होता योग्य जोड्या जुळवा– तिनं क्षणार्धात मोची आणि चप्पल, शिंपी आणि सदरा, डॉक्टर आणि औषध, सुतार आणि कपाट, असं सगळं जुळवलं.
आई कौतुकाने ते बघत होती. पुढ़च्या शब्दखेळाला ती थबकली – थोडीशी हिरमुसली. तिनं ते पुस्तक बाजूला ठेवले. आई ते बघत होती.
” काय झालं बाळा, तुला नाही आवडलं का पुस्तक.”
“तसं नाही आई, मला तो पुढला चित्रखेळ नाही आवडला. ‘ दोन चित्रातील फरक ओळखा.’ –आई मला दोन चित्रातला फरक नाही ओळखता येत.”
आई म्हणाली, “अगं सोपाय. बघ ह्या चित्रात चेंडू लाल रंगाचा आहे, त्या चित्रात हिरवा. ह्या झाडावर पक्षी बसलेला आहे, त्या झाडावर नाहीये.”
“आई मला फरक ओळखायला नाही आवडत. उलट दोन्ही चित्रात साम्य किती आहेत. ह्या मुलाकडाची बॅट आणि त्या मुलाकडची बॅट सारखी आहे. दोघांची टोपी सारखी आहे. दोन्ही मैदानावर गवत आहे, सुंदर हिरवे गार. दोन्ही चित्रात खूप खूप सुंदर, सारखी झाडं आहेत. दोन्हीकडे सूर्य सारखाच हसतोय. दोन्ही ढग सारखेच सुंदर आहेत. दोन्ही चित्रात इतकी अधिक साम्य असतांना, आपण जे थोडेसे फरक आहेत ते का शोधत बसतो.”
आई एकदम चमकली— किती सहज सोपं तत्वज्ञान आहे हे. आपण आपला पूर्ण वेळ चित्रातला फरक शोधण्यात घालवतो, पण हे करतांना आपण दोन चित्रातली साम्य– जी चित्रातल्या फरकांपेक्षा अधिक आहेत, ती लक्षात घेत नाही.
मुलांच्या बाबतीत सुद्धा अगदी हेच करतो. ‘ ती समोरची मुलगी आपल्या मुलीपेक्षा अधिक उंच आहे. वर्गातल्या बाजूचा मुलगा गणितात अधिक हुशार आहे, ती दुसरी मुलगी माझ्या मुलीपेक्षा छान गाते.’ —- आपण केवळ आणि केवळ फरकच शोधत बसतो आणि साम्यस्थळे अगदी आणि अगदी विसरून जातो.
आईने तो चित्रखेळ पुन्हा उघडला. त्यावर ‘ दोन चित्रातील फरक ओळखा ‘ मधील ‘फरक’ हा शब्द खोडून त्या जागी ‘साम्य’ हा शब्द लिहिला. आता तो खेळ ‘ दोन चित्रातील साम्य ओळखा ‘ असा गोमटा झाला होता. मुलीने हसुन तो खेळ सोडवायला घेतला. आईने मुलीला जवळ घेतले.
दोन्ही चित्रे आता एक होऊन त्यातील फरक मिटला होता. आता त्यात राहिले होते ते फक्त आणि फक्त साम्य—आणि अमर्याद पॉझिटिव्हिटी.
लेखक – अनामिक.
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈