डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ संस्कृत साहित्यातील स्त्रिया…4 – शकुंतला ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
शकुंतला
संस्कृत साहित्यातील एक अजरामर प्रेमकथा म्हणजे दुष्यंत- शकुंतला यांची कथा म्हणावी लागेल. महाभारतातील आदीपर्वात ही कथा आली आहे. अप्सरा मेनका व विश्वामित्र यांची कन्या म्हणजे शकुंतला! ती शिशुअवस्थेत असतानाच मेनका तिला जंगलात सोडून जाते. त्यानंतर ती कण्व मुनींनी सापडते आणि ते तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करतात. जेव्हा ती यौवनात येते तेव्हा अतिशय सुंदर दिसत असते. अशाच वेळी एकदा राजा दुष्यंत शिकारीसाठी तिथे आला असताना तिला बघतो व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यावेळी कण्व मुनी आश्रमात नसतात. पण दुष्यंत- शकुंतला गांधर्व विवाह करतात. त्यानंतर राजा दुष्यंत आपली अंगठी तिच्याकडे खूण म्हणून ठेवून आपल्या राजधानीत परत जातो. मधल्या काळात दुर्वास मुनी आश्रमात आले असता राजाच्या आठवणीत रमलेली शकुंतला त्यांना योग्य तो सन्मान देत नाही. त्यामुळे रागावलेले दुर्वास मुनी तिला शाप देतात की ज्याच्या चिंतनात ती मग्न होती तो तिला विसरेल.
काही दिवसांनी कण्व मुनी परत येतात व शकुंतलेच्या विवाहाचे समजल्यावर तिच्या पाठवणीची तयारी करतात. ती दुष्यंताकडे जाते. त्याचवेळी ती गर्भवती पण असते. पण दुर्वासमुनींच्या शापामुळे तो तिला ओळखत नाही व तिचा अपमान करून तिला हाकलून देतो. ती पुन्हा कश्यप ऋषींच्या आश्रमात राहू लागते. तिथेच एका पुत्रालाही जन्म देते.
काही दिवसांनी एका कोळ्याला माशाच्या पोटात दुष्यंताचे नाव असलेली ती खुणेची अंगठी मिळते आणि तो ती नेऊन राजाला देतो. तेव्हा राजाला सर्व आठवते व तो शकुंतलेच्या शोधास बाहेर पडतो. असे ढोबळ मानाने कथानक आहे.
महाभारतात दुर्वास मुनींचा उल्लेख नाही. मात्र कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकात रंजकता निर्माण करण्यासाठी तो प्रसंग घातला असावा. आपल्या प्रतिभेच्या जोरावर कालिदासाने हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.
मात्र यातील शकुंतला ही एक अतिशय सामर्थ्यवान आणि स्वावलंबी स्त्री होती असे म्हणावे लागेल. ज्यावेळी ती राजा दुष्यंताच्या प्रेमात पडते त्यावेळी सहजपणे त्याच्याशी गांधर्वविवाह करून मोकळी होते. आजच्या काळात ‛live in relationship’ बद्दल अनेक चर्चा घडत असताना त्या काळात केला गेलेला किंवा त्यावेळी जे सर्रास गांधर्व विवाह होत असत ते त्याचेच प्रतीक होते का ? अशी शंका सहज उत्पन्न होते. आजच्या लेखात ही चर्चा अपेक्षित नाही. पण त्यावरून त्या काळातील स्त्री किती स्वतंत्र विचाराची होती हे लक्षात येते. शकुंतला हे त्याचेच एक प्रतीक आहे असे मला वाटते. शिवाय आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्यही त्या काळात होते असे लक्षात येते.
शकुंतला आणि तिच्या सख्या म्हणजे प्रियंवदा आणि अनुसूया याना कण्व मुनींनी उत्तम शिक्षण दिले होते. केवळ मौखिक शिक्षण नव्हे तर त्या सर्वजणी उत्तम लेखनही करत असत. कारण नाटकामध्ये कमलपत्रावर शकुंतला दुष्यंतासाठी पत्र लिहिते असा प्रसंग आहे व तिच्या सख्या तिला यासाठी मदत करत असतात.
वास्तविक शकुंतलेला लहानपणी आई- वडिलांचे प्रेम मिळाले नाही. जंगलातील पशु- पक्षी- झाडे यांच्या सहवासातच ती अधिक वाढली. त्यामुळेच बहुतेक तिचे तिने लावलेल्या झाडावेलींवरही तितकेच प्रेम होते. त्यामुळे ती जेव्हा दुष्यंताकडे जायला निघते तेव्हा वारंवार डोळे भरून आपण लावलेल्या वेलींकडे बघते आणि मैत्रिणींना त्यांची काळजी घ्यायची पुन्हा पुन्हा सूचना देते. शिवाय तिचा सांभाळ ज्या कण्व मुनींनी केलेला असतो त्यांचीही तिला काळजी वाटत असते आणि त्यांना सोडून जाताना तिला अतिशय दुःख होत असते. त्यातून एक सहृदयी, कोमल मनाची शकुंतला आपल्याला भेटते.
मात्र एवढी हळवी असणारी शकुंतला जेव्हा दुष्यंत राजाकडे जाते आणि तो तिला ओळखत नाही. शिवाय तो तिचा अपमान करताना म्हणतो,“ हे तपस्विनी, तू मला आणि तुझ्या कुळाला अशाप्रकारे कलंकित करत आहेस ज्याप्रमाणे एखादी नदी आपलाच बांध फोडून बांधावरील झाडे मोडून टाकते आणि स्वतःचे पाणी पण मालिन करते.” ते शब्द ऐकून स्वाभिमानी शकुंतला गर्भवती असण्याचा विचारही न करता दरबारातून बाहेर पडते आणि जन्माला येणाऱ्या जीवाला एकट्यानेच सांभाळायचे ठरवते. आणि पुढे कश्यप ऋषींच्या आश्रमात राहून ते सिद्धही करते. ही स्वाभिमानी आणि निश्चयी शकुंतला त्या काळातील सशक्त स्त्रीचे उदाहरण आहे असे मला वाटते.
काही वर्षांनी राजा दुष्यंताला ती खुणेची अंगठी सापडते व तो शकुंतलेचा शोध घेऊ लागतो. ती सापडल्यावर तिला आपल्याबरोबर येण्यासाठी मनवतो. पण अपमानित झालेली मानी शकुंतला बराच काळ ते मान्य करत नाही. पण शेवटी स्त्रीसुलभ कोमलतेने ती त्याचा प्रस्ताव स्वीकारते आणि मुलासहित त्याच्याकडे निघून जाते आणि अनेक वर्षे ते सुखाने संसार करतात. यातून शकुंतलेमधील ती स्त्री दिसून येते जी कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देणारी होती. म्हणूनच त्या प्रसंगी आपला अपमान बाजूला ठेवून ती राजाबरोबर जाण्यास तयार होते.
त्यामुळेच कदाचित काल्पनिक असली तरी त्या काळातील भावनाप्रधान पण निश्चयी, मानी, विद्याविभूषित स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी शकुंतला पण एका स्त्रीशक्तीचे प्रतीक होती असे मला वाटते.
© डॉ. मेधा फणसळकर
सिंधुदुर्ग.
मो 9423019961
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈