सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ ती साडी… – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

आर्ट कॉलेजची मुलं, मुली नामवंत चित्रकार रेणूजी यांच्या घरातून रागारागानंच बाहेर पडली. त्या आपल्या गावात सेटल झाल्यात याचं त्यांना खरं तर मोठं कौतुक होतं. त्यांना भेटावं… आपली पेंटिंग्ज दाखवावीत… त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,म्हणून मोठ्या उत्साहाने त्यांनी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या बंगल्यात पाऊल टाकलं होतं.

पण एका तुसड्या, घमेंडी, माणूसघाण्या महिलेशी आपली गाठ पडेल असे त्यांना वाटलेच नव्हते.

” काय त्यांची अरेरावी… आपल्या पेंटिंग्जकडे बघून शंभर चुका काढणे…. त्याला टाकाऊ म्हणणे….छीऽऽ ती बाई माझ्या डोक्यात गेलीय यार.” एक जण म्हणाली. “कलाकार लहरी असतात असा एक समज आहे, आपण पण नवोदित कलाकारच आहोत .आपल्या रेषा पण बोलक्या आहेत. इतके टाकाऊ तर आपण निश्चितच नाही आहोत.”दुसरा एकजण पोट तिडकीने म्हणत होता. “आपण आहोत का असे लहरी ,बेछूट?” आणखी एक जण म्हणाली. तिच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट पास करत सगळे युवा आपला राग व्यक्त करत तिच्या बंगल्यातून बाहेर पडले.

त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे खरेच होते. खरेच रेणुने आजवर कधीच कोणाची पर्वा केली नव्हती. आपण किती महान आहोत हे दाखवायचा नेहमीच तिचा प्रयत्न असायचा.” ओ शिट्,” माझा किती टाइम वेस्ट केला या नवशिक्यांनी!” बडबडत ती आपल्या वरच्या मजल्यावरच्या स्टुडिओत गेली… आणि आपल्या कामात बुडून गेली.’थोड्या पेंटिंग्जवर काम करणं बाकी आहे. ते झालं की मुंबईत एक्झिबिशनला पेंटिंग्ज पाठवायला आपण मोकळ्या.’काम झाल्यावर  आळोखे पिळोखे देत रेणू विचार करत होती. ‘चला आता उद्या तयार झालेले कॅनव्हास खाली.. ड्रॉईंगरूममध्ये आशा मावशीं कडून ठेवून घ्यावेत’ आपल्या कलाकृती न्याहाळत न्याहाळत ती खाली आली.

संध्याकाळची वेळ….हातात ड्रिंकचा ग्लास घेऊन… मनपसंत म्युझिक लावून त्याच्या तालावर ती थिरकू लागली.

फोन वाजला…चंदनचा तर सकाळीच येऊन गेला… ‘आता कोण?’मनात म्हणत तिने फोन उचलला.’ ओऽह,चंदनची आई!’….कपाळावर आठ्यांचं जाळं झालं, “हॉं ऑन्टी बोला…” सासूला उद्देशून ती म्हणाली. बोलणं संपलं तशी तिने फोन सोफ्यावर भिरकावून दिला. विचार चक्र चालूच होतं ‘ट्रेनमध्ये बसल्यावर फोन केलाय म्हातारीने ….उद्या सकाळी  इथे येऊन धडकेल ती. चंदन इथं नाही हे माहीत असून सुद्धा येतेय. लग्न केलं तेव्हाच आपण हे सगळ्यांना सांगून टाकलतं की चंदन व्यतिरिक्त त्याच्या इतर कोणत्याही नातेवाईकांशी आपले कोणतेही नातं नसणार आहे…. तरीही येतेय… स्टुपिड!’ “छट्, माझा सगळा मूडच घालवून टाकला हिनं”पुटपुटत ती टीव्ही समोर बसून राहिली. बराच वेळ…. सकाळी सासूबाई समोर दिसल्या तशी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रेणू वरच्या मजल्यावर निघून गेली… त्या क्षणीच सासूबाईंचा चेहरा पडला. त्यांचा  खूप विरस झाला होता. पण समोरूनच, सगळं घर पुढाकार घेऊन सांभाळणाऱ्या मेड्-आशा मावशींना- लगबगीने येताना पाहून त्या जरा सावरल्या. आशा मावशींनी त्यांच्या हातातली बॅग घेऊन, गेस्ट् रूमध्ये ठेवून, त्यांच्या चहा नाश्त्या बद्दल विचारणा केली.  “नको, खरं तर आता एकदम जेवेनच. “सासूबाई म्हणाल्या.

आज जरा लवकरच त्या जेवायला बसल्या. रेणू रोजच्या वेळी खाली उतरली.अन् टेबलावर सज्ज असलेलं आपलं डाएट फूड खाऊ लागली. जशी ती पुन्हा वरच्या मजल्यावर जायला वळली तशी सासूबाई म्हणाल्या,” थांब रेणू, पुढच्या आठवड्यात मी युएस ला नंदूकडे जातेय.मुलाची मुंज  करतोय ना तो तिकडे. तुला चंदनने सांगितलंच असेल. तो पण… त्या दिवसात ….तिकडेच असणारेय.तू पण आलीस तर सगळ्यांना छानच वाटेल. ह्या बघ तुम्हा दोघी जावांसाठी एक सारख्या साड्या घेतल्यात.त्यातली तुला कोणती आवडलीय ते सांग,अन् काढून घे . आठ आठ हजाराची एक साडी. बघ टेक्श्चरआणि कलर कॉम्बिनेशन चांगलंआहे ना. तुझी कलाकारची नजर.”… त्या आपलेपणानं बोलत त्याची किंमत पण सांगून गेल्या.

रेणूच्या कपाळावरील आठ्यांचं जाळं त्यांना दिसलंच नाही .तिने एक साडी उचलली तशी त्या खुश झाल्या. तोवर तिचे पुढचे शब्द त्यांच्या कानावर पडले,” मी साडी कुठे नेसते?… हॉं , कधीकधी खास प्रसंगी नेसते….ती पण पंचवीस तीस हजारांच्या खालची नसते. ही चिप साडी….ओऽह नो!..”

सासुबाईंना खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं…. त्यांचे डोळे भरून आले. पण तोवर एकदम अंगात कसला तरी झटका आल्यागत रेणू मागे फिरली. स्वत: खाली फेकलेली साडी तिने उचलली. घडी मोडून त्याच्या नि-या करून तिने हाक मारली, “आशा मावशीऽ”त्यांना समोर बघून ती साडी तिनं त्यांच्या खांद्यावर टाकली,”ही घ्या आजीच्या नातवाच्या मुंजीची  साडी”एवढे दात कटकट करत  बोलून ती तेथून निघून गेली.

क्रमशः …

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments