सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ ती साडी… – भाग- ३ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(रेणू भूतकाळात डोकावून पाहत होती . मनासारखा जीवनसाथी आणि मनासारखे आयुष्य ती जगू शकत होती. याचा तिला थोडासा गर्वच वाटू लागला होता.) आता पुढे….
तिच्या चित्र प्रदर्शनाच्या तयारीनं जोर पकडला होता. सकाळी सकाळीच “आशा मावशी ,खूप भूक लागलीय… ब्रेकफास्ट…” तिनं जोरात आवाज दिला. शेवटी खाली येऊन पाहिलं तर सगळं सामसूम!तिनं खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिलं, तर तिला घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळीकडे पाणीच पाणी दिसलं.
‘म्हणजे पूर आलेला दिसतोय….पण नो टेन्शन.’–ती नको नको म्हणत असतानाही आशा मावशीनं वरच्या स्टुडिओ शेजारच्या खोलीतला फ्रीज खाण्यापिण्याच्या पदार्थांनी गच्च भरून ठेवला होता. शेजारीच एक गॅसची शेगडी आणि सिलेंडर तसेच थोडी भांडीकुंडी, पाणी अशी सगळी इमर्जन्सीच्या काळातली तयारी पण केली होती.ती वर आली. सँडविच व कॉफी घेऊन ती आरामात सोफ्यावर बसली. तिचं मन आशा मावशीला धन्यवाद देत होतं.लाईट पण गेलेत हे तिला गिझर ऑन केल्यावर कळलं. ‘काही हरकत नाही …आज नो अंघोळ’… ती पुटपुटली. खिडकीतून पुन्हा ती खाली पाहू लागली तेव्हा तिला दिसले की घरात पाणी शिरलेय. दुपारी खाली जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली तेव्हा खालच्या सात आठ पायऱ्या पाण्यात बुडाल्यात,… आणि तिची ड्रॉइंग हॉलमधील पेंटिंग्स पण पाण्यात बुडालीत हे दिसलं. बेचैन झाली खरी,… पण विचलित न होता वाढलेलं पाणी, बुडणारी झाडं ,घरं निर्धास्तपणे ती बाल्कनीतून बघत राहिली. रात्री खाऊन पिऊन काळ्या कुट्ट अंधारात बिछान्यावर आडवी झाली.’ हेऽऽ एवढ्याशा संकटानं घाबरण्याइतकी लेचीपेची मी थोडीच आहे!’ आपल्या मनाचा अंदाज घेऊन स्वतःवरच खुष होत ती झोपली.
सकाळी पाणी आणखी वाढलेलं दिसलं. तशी ती गच्चीत आली. बाय चान्स तिला एक नाव दिसली. “हेल्प मी, हेल्प मी” ओरडत हातातला रंगीत रुमाल तिनं हवेत फडकवला. त्या नावेतल्या डिझास्टर मॅनेजमेंट टीमने खूप प्रयत्न करून तिला नावेत उतरवून घेतले. खरा प्रश्न पुढे उभा राहिला… आपला ओव्हर- कॉन्फिडन्स दाखवायचा नादात गच्चीतून आत खोलीत जाऊन मोबाईल बरोबर घ्यायलाही ती विसरली होती…कपडे वगैरे तर दूरची गोष्ट !…..ते लोक विचारू लागले कुठे जाणार? तेव्हा कोणाचाही फोन नंबर, घरचा पत्ता ती सांगू शकली नाही. “इतक्या पूरग्रस्त लोकांना तुम्ही कुठे ठेवलेय तिथेच मला सोडा… अशा रहाण्यातलं थ्रिल मला अनुभवायचंय”..ती बेफिक्रीनं उद्गारली…तिथे पोहोचल्यावर,” थँक्स गाईज! मी पुढचं सगळं छान मॅनेज करेन.” ती म्हणाली.
छान पैकी जेवली. खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची धावपळ एन्जॉय करत राहिली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव निरखत मनातच त्यांची स्केचेस बनवत राहिली.पण रात्री एका चटईवर.. बिना उशीचं झोपताना तिला अवघड वाटू लागलं….आणि रात्री अंधारात डासांचं नृत्य, संगीत आणि कडाडून चावणं दोन-तीन दिवस तिनं सहन केलं पण हळूहळू तिचा ताठा, स्वतःबद्दलच्या वल्गना… सगळं लुळं पांगळं झालं. एका अनामिक भीतीने मनाचा कब्जा घेतला.जोरजोरात थंडी वाजू लागली… आणि सपाटून ताप चढला. केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी औषध दिलं. ब्लड टेस्ट झाली. पण ताप उतरायची चिन्हे दिसेनात.तिची झोप उडाली….मनात नाही नाही ते विचार घोंगावू लागले… आपल्या भिजलेल्या पेंटिंग्जची दुरावस्था आठवून ती व्याकूळ झाली.
“अगोबाई मॅडम तुम्ही इथं?” ओळखीचा आवाज ऐकून तिने डोळे किलकिले केले. समोर आशामावशी उभ्या! रेणू एकदम हरकून गेली. त्या शेजारणी बरोबर त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आल्या होत्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे पुढाकार घेत त्या तिला म्हणाल्या ,”तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्या घरला. काय अवस्था झाली तुमची. आमच्याकडे पूर बीर नाहीये… रिक्षात घालून नेतो… वाटेत डॉक्टरला पण दाखवतो… तुमचं चांगल पथ्य पाणी पण करतो. तिथल्या व्यवस्थापकांची परवानगी घेऊन त्या रेणुला आपल्या घरी घेऊन आल्या. घरी तिची योग्य सेवा सुश्रुषा झाली. हळूहळू तिचा ताप उतरला. त्यापूर्वीचे एक दोन दिवस आशा मावशीने स्पंजींग करून तिला आपले जुने गाऊन घालायला देऊन तिचे अंगावरचे कपडे धुऊन टाकले होते.
“मॅडम पाणी गरम आहे. चार-पाच दिवसात तुमची अंघोळ झालेली नाहीये.आज तुम्ही अंघोळ करून घ्या.” आशा मावशीने सांगितले.,” मॅडम तुमची कापडं, गाऊन काहीच वाळलं नाहीय हो… बाहेर धो धो पाऊस आहे…. माझ्या साड्याही आंबट ओल्या आहेत… तर असं करा माझं तिथं ठेवलेलं परकर झंपर घाला. आणि हेही सांगतोय की दार पावसानं फुगलंय .आतनं कडी नाही बसणार …मी राहतो बाहेर उभी, तुमच्यासाठी साडी घेऊन. काळजी करू नका. अंघोळ करून घ्या तुम्ही. हातात एक कॅरीबॅग घेऊन आशा मावशी बाहेर पडल्या. त्या स्वयंपाक- घरातल्या छोट्याशा मोरीत रेणूनं कशीबशी आंघोळ आटोपली . ढगळा ब्लाऊज व परकर घातलाआणि दरवाजा खडखडवला.आशामावशी आत आल्या घडी मोडून निऱ्या केलेली एक साडी त्यांनी तिच्या खांद्यावर टाकली. आणि दरवाजा बंद करून बाहेर उभ्या राहिल्या. साडी बघून रेणूच्या मनात चर् र् झालं. ती,….’ती’ साडी होती. सासूचा बेदरकारपणे अपमान करत आशा मावशीच्या खांद्यावर टाकलेली साडी….आज ती साडी नेसणं भाग होतं.नियतीने तिला समझौता करायला… चलता है… म्हणायला भाग पाडलं होतं. तिच्या बेछूट, उर्मटपणे वागायच्या सगळ्या फंड्यांना जणू ती साडी वाकुल्या दाखवून हसत होती. आयुष्यातला हा असा पराभव पचवणं तिला शक्य नव्हतं. त्या स्ट्रॉंग, ओव्हर कॉन्फिडंट, आयुष्यात कधीही न रडलेल्या स्त्रीला त्या साडीनं ओक्साबोक्शी रडायला भाग पाडलं होतं. पण हे अश्रू खरंच पश्चातापाचे होते का?
** समाप्त**
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈