सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
लेखक -राजेंद्र खेर
प्रकाशक- विहंग प्रकाशन, पुणे
पृष्ठ संख्या – 501
स्वाध्याय प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील ही सत्याधिष्ठीत कादंबरी…
पांडुरंग शास्त्री आठवले यांची ओळख “ स्वाध्याय “ या त्यांच्या कामामुळे माहीत होती. परंतू त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. ही कादंबरी जेव्हा वाचली तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला.
कादंबरीची सुरुवात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या, ते जपान भेटीला गेले असताना टोकियो विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या झालेल्या प्रतिक्रियेने होते.
जपानी लोकांची जलद हालचाल, आदर्श वागणं, आणि सतत कामात असणं, त्यांना भावलं होतं ! पुढे पांडुरंगशास्त्रींच्या जीवनाचा आलेख उलगडत जातो.
रोह्यासारख्या लहान गावात त्यांचे बालपणीचे दिवस गेले. आजोबांच्या सहवासात हिंदू धर्माचे प्रेम वाढीस लागले. परदेशात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. प्रभू-कार्यालाच वाहून घेण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. श्रीकृष्ण हा त्यांचा आदर्श होता. दीनदुबळ्यांना मदत करण्याची इच्छा होती. आजोळचे लक्ष्मणशास्त्री आठवले हे त्यांचे आजोबा. त्यांचा प्रभाव पांडुरंगशास्त्रींवर होता.
पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्यगण वसई, गुजरात बॉर्डर, या भागात अधिक होते. त्यांच्या सकाळच्या फेरीमध्ये त्यांचे शिष्यगण लोकांना ईश्वराचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत. कोळी समाजातील लोकांत त्यांचा वावर अधिक होता. खालच्या समाजातील बरेच लोक दारूच्या आहारी जातात. त्या दारूच्या आकर्षणापासून त्यांना मुक्त करण्याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी या समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांचे लोक भक्ती-फेरी काढत असत. श्रीकृष्ण हा सर्वांसाठी आदर्श देव आहे असे ते मानत. आपल्या आश्रमाच्या जागेवर त्यांनी कृष्ण मंदिर उभारले होते. तिथे लोक एकत्र येत असत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. जेव्हा लोक एकत्र येत असत तेव्हा ते त्यांना देवपूजेबरोबरच कामाचे महत्त्व पटवून देत असत. पांडुरंगशास्त्री यांच्या अनुयायांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता. विशेष करून आगरी, कोळी लोकांच्या समाजात त्यांनी कार्य केले.
या कादंबरीतून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनाचा चांगला परिचय होतो. एक सच्चा हिंदू धर्माचा प्रेमी, सर्व जगात आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देणारी व्यक्ती, म्हणून त्यांचा गौरव होतो. समाजातील सर्व स्तरात त्यांचा वावर होता. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत….. परंतू त्यांनी स्वतःच्या आश्रमासाठी श्रीमंतांकडून अजिबात पैसा घेतला नाही. अतिशय निरपेक्षपणे काम केले आणि लोकांमध्ये जागृती केली. त्यांच्या या सर्व कामात त्यांच्या पत्नीची तसेच त्यांच्या मुलीची त्यांना चांगली साथ मिळाली. आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांच्यामुळे हिंदू धर्माची व्याप्ती आणि महत्त्व सर्वांना समजले.
ही कादंबरी मला आवडली कारण साधी, सोपी ओघवती भाषा, आणि आवडीचा विषय ‘ हिंदू धर्म! ’. आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक, तसेच सनातन असा आहे. हिंदू धर्मात सर्वांचा आदर केला जातो. हिंदू धर्माची शिकवण या कादंबरीत चांगल्या प्रकारे विशद केली आहे. तसेच पांडुरंगशास्त्री यांचे व्यक्तिमत्त्वही या कादंबरीतून चांगले कळून येते..
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈