श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 138 ☆ ज्ञानयोग..! ☆ श्री सुजित कदम ☆
संतश्रेष्ठ मांदियाळी
नाम माउलीचे घेऊ
ज्ञानदेव कृष्णरूप
काळजाच्या पार नेऊ…! १
संत निवृत्ती सोपान
मुक्ता बहिण धाकली
वंशवेल अध्यात्माची
भावंडात सामावली…! २
ग्रंथ भावार्थ दीपिका
तमा अखिल विश्वाची
संत कवी ज्ञानेश्वर
तेज शलाका ज्ञानाची..! ३
ग्रंथ अमृतानुभव
विशुद्धसे तत्वज्ञान
जीव ब्रम्ह ऐक्य साधी
माऊलींचे भाषा ज्ञान…! ४
मराठीचा अभिमान
कर्म कांड दूर नेली
ज्ञानेश्वरी सालंकृत
मोगऱ्याची शब्द वेली…! ५
नऊ सहस्त्र ओव्यांचा
कर्म ज्ञान भक्ती योग
दिला निवृत्ती नाथाने
अनुग्रह ज्ञानयोग…! ६
चांगदेव पासष्टीत
ज्ञाना करी उपदेश
पत्र पासष्ठ ओव्यांचे
अहंकार नामशेष…! ७
सांप्रदायी प्रवर्तक
योगी तत्वज्ञ माऊली
ग्रंथ अमृतानुभव
गीता साराची साऊली…! ८
भागवत धर्म तत्वे
अद्वैताचे तत्वज्ञान
आलें प्राकृत भाषेत
वेदांताचे दैवी ज्ञान…! ९
चंद्रभागे वाळवंटी
अध्यात्मिक लोकशाही
पाया रचिला धर्माचा
सांप्रदायी राजेशाही…! १०
माऊलींची तीर्थ यात्रा
हरीपाठ बोधामृत
देणे पसाय दानाचे
अभंगांचे सारामृत…! ११
इंद्रायणी तीरावर
संपविला अवतार
संत ज्ञानेश्वर नाम
हरिरुप शब्दाकार…! १२
संजिवन समाधीचे
झाले चिरंजीव रूप
घोष माऊली माऊली
पांडुरंग निजरूप…! ,१३
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈