सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ पाटीवर मांडलेली नाती – भाग 1 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
‘‘ वहिनी, ऑपरेशनचा निर्णय असा अचानक का बदलला गेला, हे जाणून घेण्यासाठी मी फार अधीर झालो आहे. सगळंच तर ठरलं होतं… अपोलो हॉस्पिटलने तारीखही दिली होती, आणि आज रेल्वेचं रिझर्वेशनसुद्धा करायचं होतं… मग अचानक असं झालं तरी काय?”
“ हे सगळं तुम्ही तुमच्या भावालाच विचारा… तेच तुम्हाला सगळं सांगतील. तुम्ही बसा. मी आत गॅसवर दूध ठेवलंय्…” आणि एवढं बोलून वहिनी, म्हणजे सौ.आगरकर आत निघून गेल्या.
मी फार अस्वस्थ झालो होतो… वैतागलो होतो. सकाळी मस्त चहा पीत बसलो होतो, तेवढ्यात फोन आला होता…
‘‘रवी, मी अप्पा बोलतोय्.”
‘‘ बोला अप्पासाहेब.”
‘‘ तू अजून रिझर्वेशन केलं नाहीयेस ना?”
‘‘ नाही. पण आता अंघोळ करून, पंधरा मिनिटातच निघणार आहे स्टेशनवर जाण्यासाठी.”
‘‘आज नको जाऊ मग.”
‘‘ का?”
‘‘ काही नाही रे. जरा विचार करतो आहे, की ऑपरेशन नाही केलं तरी चालण्यासारखं आहे. अजून दोन-चार वर्षं ढकलली गेली तरी पुरे. वर्षं काय… दोन…चार महिने गेले तरी पुरे. तसंही आता पुढचं आयुष्य म्हणजे बोनस मिळाल्यासारखंच आहे ना !”
‘‘ अप्पा, हे असं काय काहीतरी बोलताय् तुम्ही? मी आधी रिझर्वेशन करून टाकतो, आणि तिथून तसाच थेट तुमच्या घरी येतो. वाटलं तर नंतर रद्द करता येईल.”
‘‘ नाही रवी, आता ऑपरेशन वगैरे काही करून घ्यायचं नाही, असा निर्णय घेतलाय् मी…” असं म्हणून त्यांनी फोन कट केला. मी पुन्हा त्यांना फोन लावला. पण फोन उचललाच गेला नाही. माझ्या उत्सुकतेची जागा आता अस्वस्थपणाने घेतली होती.
दोन मुलं, दोन सुना, एक नातू, अप्पासाहेब, त्यांची बायको, आणि अन्वर… इतकी सगळी माणसं रहातात या घरात. पण इथे हे सगळं घर किती सुनंसुनं वाटतयं.. तेही इतक्या सकाळी-सकाळी. जशी काही रात्रभर वादळाशी झुंज देत होतं हे घर… इथे रहाणारे सगळे… हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येते आहे… अरेच्चा, हे घड्याळ तर अगदी तस्संच आहे… डॉ.अख्तर यांच्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं तसं. आणि त्यादिवशी अप्पासाहेबांना नेमक्या त्याच हॉस्पिटलमध्ये तर घेऊन गेलो होतो आम्ही… काय करावं हे तर थोडावेळ सुचलंच नव्हतं आम्हाला. फार तर सकाळचे सात वाजले असावेत तेव्हा… मालटेकडीवरून उतरून, स्टेशनच्या रस्त्याने आम्ही घरीच परतत होतो. सकाळी फिरायला जातानाचा आमच्या सगळ्यांचा हा ठरलेला रस्ता आहे. रेल्वेचा पूल क्रॉस करून राजकमल चौकात यायचं, आणि तिथे एकेक कप चहा प्यायचा, हेही ठरलेलंच होतं. चहाचे पैसे कुणी द्यायचे, यावरून आम्ही एकमेकांना कंजुष ठरवून टाकायचो. मग सगळ्यांनी मिळून पैसे द्यायचे असं ठरवलं जायचं. असा मजेत, गप्पा मारत वेळ घालवत असतांना, कुणीतरी स्वत:ला आवडणारं वर्तमानपत्र विकत घ्यायचा. आणि मग तिथून आम्ही आपापल्या घरची वाट धरायचो… पण एक दिवस, याच सगळ्या गोष्टी सुरू असतांना अचानक लक्षात आलं की अप्पासाहेब मागेच राहिले होते.
माझी आणि अप्पासाहेबांची ओळख खूप जुनी आहे. पण सकाळी फिरायला जाण्याच्या आमच्या या ग्रुपमध्ये ते गेल्या वर्षीपासूनच यायला लागले आहेत. पण या वर्षभरात, मालटेकडी चढतांना ते मागे पडलेत, किंवा रस्त्यावरून चालतांना ते मागे राहिलेत, असं कधीच झालेलं नव्हतं. त्रेसष्ठ वर्षांच्या अप्पासाहेबांना आम्ही कधी कधी चेष्टेच्या सुरात म्हणायचो सुद्धा, की, ‘‘अप्पासाहेब, ‘रजिस्ट्रार ऑफ को.ऑप.सोसायटीज्’ या पदावरून तुम्ही निवृत्त झाल्यापासून, तुमचं वय वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच व्हायला लागलंय् असं वाटतंय्”… पण त्या दिवशी मात्र छातीत प्रचंड दुखायला लागल्यामुळे कळवळणा-या अप्पासाहेबांना पाहून, आमच्या या ग्रुपमधल्या आम्हा सहाही जणांना अक्षरश: घाम फुटला होता…
‘‘नमस्कार साहेब. वहिनीसाहेबांनी तुमच्यासाठी चहा पाठवलाय्. साहेब पूजा करून यायलाच लागलेत.”
‘‘अरे अन्वर, इतका वेळ कुठे होतास तू? दिसला नाहीस.”
‘‘ मी मागच्या बाजूच्या कुंड्यांना पाणी घालत होतो.”
‘‘ आणि इतर कुणी दिसत नाहीयेत्. अंकितही नाही दिसला.”
‘‘ हो अंकितबाबा शाळेत गेलाय्. सूरजदादा सकाळीच कॉलेजला गेलेत. जातांना वहिनीसाहेबांना सांगितलं त्यांनी की त्यांचे एक ज्येष्ठ सहकारी रजेवर आहेत, त्यामुळे त्यांचे तासही दादांनाच घ्यावे लागत आहेत. मोठ्या वहिनीपण विदर्भ महाविद्यालयात पार्ट-टाईम काम करतात, त्यांची जायची वेळ होत आली आहे, म्हणून त्या आवरताहेत.”
‘‘आणि दीपकदादा? ”
‘‘ ते धाकट्या वहिनींना स्टेशनवर पोहोचवायला गेले होते ना पहाटेच. मग आता आल्यावर झोपलेत. ते उशिरानेच जातात फॅक्टरीत.”
… अन्वरने घरातल्या सगळ्या माणसांची अगदी पूर्ण माहिती दिली खरी मला, पण का कोण जाणे, मला असं वाटत होतं, की त्याने खूप काही लपवलंही होतं माझ्यापासून. घरातल्या मोजक्या सगळ्या व्यक्तींबद्दल आत्ता मला माहिती देणारा अन्वर, हा तो अन्वर नाहीये, जो डॉ.अख्तर यांच्या हॉस्पिटलमध्ये वीस दिवस अप्पासाहेबांची चोवीस तास सेवाशुश्रुषा करत होता. ते वीस दिवस अनेक जणांना अन्वर एकच एक प्रश्न वारंवार विचारत होता… ‘‘अप्पासाहेब पूर्ण बरे होतील ना साहेब?” अप्पासाहेब आणि अन्वर, दोघे एकाच ऑफिसमध्ये होते. आणि एकाच दिवशी निवृत्त झाले होते, हा जरी एक निव्वळ योगायोग असला, तरी दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नव्हती. निवृत्त झाल्याच्या लगेच दुस-या दिवशी, अप्पासाहेबांचा हा ऑफिसमधला चपराशी, त्यांचा मदतनीस म्हणून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आता त्यांच्या घरी ड्यूटी करायला लागला होता…
‘‘अच्छा, तू आला आहेस तर… तुला रहावलं नाही ना? मी ऑपरेशनचा विचार का सोडून दिला, याच्यावर भांडणार आहेस का आता माझ्याशी? ”
‘‘नाही अप्पासाहेब. अहो वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे मी… तुमच्याशी कसला भांडणार? पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये… डॉक्टरांनी जर अगदी स्पष्ट सांगितलंय् की ‘ बायपास करणं अत्यावश्यक आहे, आणि तेही जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर…’ मग तुम्ही…”
‘‘ हे बघ रवी. मी डॉक्टरांना त्यांचा सल्ला विचारला होता. म्हणून त्यांनी तो दिला. कोणत्याही गोष्टीवर सल्ला द्यायचा असेल तर सरकार सल्लागार-समिती स्थापन करते. पण त्या समितीचा सल्ला ऐकणं हे सरकारसाठी अनिवार्य तर नसतं ना?”
‘‘आप्पासाहेब, पण आत्ता आपण सरकारी कामाबद्दल बोलत नाही आहोत. तुम्ही चेष्टा करणं बंद करा आणि मुद्द्यावर या.”
‘‘ तू वैतागशील हे मला माहितीच होतं. चल बाहेर अंगणात जाऊन बसू… हो… अगदी हळूहळू चालत येतो मी. तिथेच बसून बोलू या. खूप दिवस झाले, तुझ्याबरोबर पायी चालणं झालंच नाहीये माझं…”
अंगणात एक जरासं छोटेखानी आंब्याचं झाड होतं. अप्पासाहेबांनी अगदी हौसेने त्याला लागून पार बांधला होता. आम्ही हळूहळू चालत त्या पारावर जाऊन बसलो.
— क्रमशः भाग पहिला
मूळ हिंदी कथा – ‘स्लेटपर उतरते रिश्ते’ – कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈