श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ शिक्षकी पेशा… अनामिक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मूळ इंग्रजीतील पोस्टचा प्रकाश भागवत कृत मराठी अनुवाद- वाचनिय आणि चिंतनशील सुद्धा.)
दीक्षांत समारोहात भाषण करतांना प्रमुख वक्ते जे स्वतः एका शिक्षण संस्थेत प्राचार्य पदावर होते, ते म्हणाले, डॉक्टर असणाऱ्या बापाला आपल्या मुलांनाही डॉक्टर व्हावं असं वाटतं, इंजिनीयर बापाला आपल्या मुलांनाही आपल्यासारखंच इंजिनियर व्हावं असं वाटतं, उद्योग धंदा करणाऱ्या बापाला आपल्या मुलांना एखाद्या कंपनीचा सीईओ व्हावं असं वाटतं. तसं शिक्षकी पेशा असणाऱ्या बापालाही आपल्या मुलानं यांच्यापैकीच कांहीतरी एक व्हावं असं वाटत असतं पण शिक्षक व्हावं असं कुणालाही स्वतःहून वाटत नाही.
ही परिस्थिती दुर्दैवी आहे परंतु हीच वास्तविकता देखील आहे.
रात्रीभोजच्या प्रसंगी जेवायला आलेले पाहुणे जेवणाच्या टेबल भोवती बसून आपापसात चर्चा करीत होते. त्यापैकी एक व्यक्ती जो एका कंपनीमध्ये सीईओ होता, त्याला शिक्षण क्षेत्राबद्दल फारशी आस्था नव्हती. हे क्षेत्र समाजोपपोगी नसल्याचं त्याचं मत होतं. तो म्हणाला, “ज्यानं केवळ शिक्षक होणं हाच आपल्या जीवनातला सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवलं तो मुलांसमोर काय आदर्श ठेवणार बोडख्याचा?*”
आपला मुद्दा पुढे रेटत तो बाजूलाच बसलेल्या एका शिक्षिकेला बोलला, ” दातार ताई, तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, अगदी प्रामाणिकपणे सांगा तुम्ही काय असं महत्वाचं कार्य करता तुम्हाला वाटतं?”
दातार ताई आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि फटकळपणाबद्दल प्रसिद्ध होत्या. त्या म्हणाल्या, मी काय काम करते हे तुम्हाला ऐकायचय ना ऐका तर मग?
त्या एक क्षणभर थांबल्या आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.
आपण जितके परिश्रम करू शकतो असं मुलांना वाटतं त्यापेक्षा अधिक परिश्रम मी मुलांकडून करवून घेते.
शिक्षिका होऊन मला अतिशय मोलाचा पुरस्कार मिळाला आहे असं मला वाटतं.
मुलांचे आई-बाप स्वतःच्याच मुलांना आय पाॅड, गेम क्यूब किंवा टीव्हीवर सिनेमा दाखविल्याशिवाय पाच मिनिटं देखील एका ठिकाणी बसवून ठेवू शकत नाहीत आणि मी या सर्वच मुलांना वर्गामध्ये ४० मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसवून ठेवू शकते.
मी काय करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? एक दीर्घ श्वास घेत त्या टेबलभोवती जमलेल्या सर्व पाहुण्यांकडे बघत म्हणाल्या –
मी मुलांचं शैक्षणिक मनोरंजन करते.
मी त्यांना प्रश्न विचारायला लावते.
मी त्यांना माफी मागायला शिकवते आणि माफी का मागायची त्याचं कारणही त्यांना सांगते. संस्कार, संस्कृती, सदाचार आणि नैतिकता शिकवून त्याप्रमाणे वागायला सांगते.
मी त्यांना इतरांबद्दल आदर बाळगायला शिकवते आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल जबाबदारी घ्यायलाही शिकवते.
मी त्यांना सुंदर हस्ताक्षरात लिहायचं कसं हे शिकवते आणि त्यांच्याकडून लिहूनही घेते.
केवळ अभ्यास करवून घेणं हेच काही सर्वस्व नाही, मी त्यांना सतत (पुस्तकं) वाचायला लावते.
मी त्यांच्याकडून प्रत्यक्ष आकडेमोड करवून घेते. मुलांनी, देवानं दिलेल्या त्यांच्या बुद्धिचा वापर करायला हवा माणसानं बनविलेल्या कॅल्क्युलेटरचा नव्हे.
इतर देशातल्या माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख अबाधित राखील, भारताबद्दल त्यांना जे काही जाणून घ्यावयाचे आहे त्याचा अभ्यास त्यांना करायला लावते.
माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल असा माझा वर्ग असावा हा माझा प्रयत्न असतो.
आणि शेवटचं हे की मी त्यांना हे समजावून सांगते की तुम्हाला देवाकडून जी कांही देणगी मिळाली आहे तिचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात, खूप परिश्रम केलेत, आणि आपल्या मनाचं ऐकून वागलात तर जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.
श्रीमती दातार पुन्हा काही क्षण थांबून म्हणाल्या, पैसा हेच काही सर्वस्व नाही असं मानणार्या मला, जेव्हा लोक मी काय काम करते यावरून माझी समाजातली पत ठरवतात तेव्हा मी माझं डोकं वर करून जगात वावरते आणि अशा लोकांकडे मी ढुंकूनही पाहात नाही कारण ते निर्बुद्ध, अशिक्षित, अज्ञानी, तर्कशुन्य आणि तत्वहीन असतात. मी काय करत असते ते तुम्हाला जाणून घ्यायचंय?
मुलांना शिक्षण देऊन मी त्यांना त्यांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा सीईओ होण्यासाठी तयार करते. तुम्ही काय करता मिस्टर सीईओ फक्त पैसा मिळवता?
तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, सीईओ किंवा यशस्वी उद्योजक होतात पण भावी पिढीला तेच बनण्यासाठी त्यांचा प्राथमिक स्तर किंवा पाया उभारु शकत नाहीत.
आता त्या सीईओ चं ‘थोबाड’ पाहण्यासारखं झालं होतं. तो गप्प बसला. क्षणभरच तिथे शांतता पसरली आणि त्यानंतर प्रत्येक जण आदरानं उभा राहून टाळ्या वाजवू लागला.
अनुवादक: प्रकाश भागवत
प्रस्तुती: सौ.उज्वला केळकर
मो. 9403310170 email-id – [email protected]
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈