सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ || मालक ||…भाग 2 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……
श्री मंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणात मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळाने ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे “तताबाबा” म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, ” इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा “. मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली. त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्याबरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, ” पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील का ?” काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी दुस-याला देऊन टाकल्या.
मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही. त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हा केव्हा गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.
नाटक नसलं की, रिकाम्या वेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. वऱ्हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पदाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !
मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. ” हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ,” असं सारखे मला म्हणायचे. आपली पाचही मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !
मालकांनी पुण्याला श्रीनाथ थिएटरसमोर असलेल्या रस्त्यावरील रेवडीवाला बोळात शुक्रवार पेठेत घर घेतलं, तेव्हा गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेऊन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !
मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, ” ते आमचे कुलदैवत आहे,” असे ते म्हणायचे !
मालकांनी “बलवंत सिनेटोन” ही चित्रपट कंपनी काढून, ” कृष्णार्जुन युद्ध ” हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप… फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !
मंगळवार दिनांक १६ डिसेंबर १९४१ चा तो दिवस. लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हा मालकांनी आपल्या लताचं गाणं घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, ” माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही “. मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, “म्हारा मुजरा”. मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
मालकांनी लताचं गाणं ऐकलं, पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं……
— समाप्त —
— माई मंगेशकर
शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे
ईमेल – [email protected]
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈