विविधा
☆ पंढरपूर — एक शाश्वत धाम… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांना ज्ञात आहे. ते एक पवित्र धाम तर आहेच.पण ते शाश्वत धाम आहे. प्रलय कालात सुद्धा धाम नष्ट होत नाहीत. त्यापैकी पंढरपूर एक आहे.चंद्रभागा नदीला पूर्ण पंढरपूर बुडून जाईल इतके पूर अनेक वेळा आले.तरीही पंढरपूर होते तसेच आहे. आता उजनी धरणामुळे जास्तीचे पाणी रोखले जाते पण धरणात पाणी जास्त प्रमाणात असेल तर नदीपात्रात सोडले जाते.तेव्हा पंढरपूरला अजूनही वेढा पडतोच.
पंढरपूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण देवाचे चरणस्पर्श करू शकतो. ते अन्यत्र कुठेही नाही. कित्येक संतांना देवाने आलिंगन दिले होते यांचेही पुरावे अभंगात व इतर संतसाहित्यात आहेत. म्हणजे उराउरी भेट, आणि चरणस्पर्श फक्त श्री विठ्ठल रखुमाईलाच भक्त करू शकतात. मुख्य गाभाऱ्याच्या समोर गरूडखांब आहे. त्याला आलिंगन देण्याची प्रथा आजही आहे.
पंढरपूर जवळ पूर्वी दिंडीर नावाचा राक्षस मातला होता. देवाने त्याला ठार केलं. पण देवाच्या हातून मरण आले म्हणून स्वतःला धन्य समजून त्याने देवाला वरदान मागितले की या क्षेत्राला माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून पंढरपूर परिसर दिंडीरवन या नावाने प्रसिद्ध होता. देवावर रूसून रूक्मिणी माता याच दिंडीरवनात येऊन राहिली.अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
रूक्मिणीच्या पाठोपाठ देव दिंडीरवनात आले. ( विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते.) इतर ठिकाणी भक्त भगवंताच्या भेटीला जातात. पण पंढरपूरला भगवंत भक्तांची वाट पहात विटेवर उभा राहिला आहे.कटीवरती हात आणि समचरण हे इथे देवाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष संत नामदेव महाराजांना देवाने दृष्टांत दिला होता की मी इथे तुमच्यास्तव उभा आहे. आषाढी , कार्तिकी एकादशीला तरी मला भक्त भेटावेत.
इतर सर्वत्र देव अलंकारविभूषित व शस्त्रे धारण केलेले दिसतात.पण देवशयनी एकादशीला देव गोपवेषात असतात. विनाअलंकृत आणि तुळशीमाळा धारण केलेले देवाचे स्वरूप असते.
पंढरपुरातली ही विठ्ठल मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, जो ही मूर्ती घडविलेली आहे असे म्हणेल त्याला पाप लागेल. संत कधीच कुणाला दूषणे देत नाहीत. तरीही तुकाराम महाराज असे म्हणतात कारण ही मूर्ती खरोखरच स्वयंभू आहे.
त्या काळात लोक इतके गरीब होते की त्यांनाच खायला अन्न नसायचे. मग ते देवाला नैवेद्य कशाचा दाखविणार ? पंढरपुरात लोक ताकात पीठ कालवून तो नैवेद्य देवाला दाखवीत असत.अशी आख्यायिका आहे. पश्चिम द्वारा जवळ एका गल्लीत हे ताकपिठे विठोबा मंदिर आजही अस्तित्वात आहे. दहा वर्षापूर्वी सरकारी निकालानुसार बडवे आणि उत्पात यांचे देवाच्या पूजेचे व उत्पन्नाचे अधिकार काढून घेतले गेले. त्यानंतर पंढरपूरला बडवे मंडळींनी विठोबाचे एक मंदिर दुसऱ्या ठिकाणी बांधले आहे. तसेच उत्पात मंडळींनी रूक्मिणी मातेचे मंदिर बांधले आहे.
विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते कारण पंढरपूरला त्याच मंदिरात रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. त्याच्या जवळच देवाच्या पत्नी राही, सत्यभामा यांच्या मूर्ती असलेले गाभारे देखील आहेत. श्रीविष्णूंनी वेंकटेश अवतार घेतला,ते वेंकटेश मंदिर ही मुख्य मंदिराच्या आवारात आहे.इतरही अनेक देव देवतांचे दर्शन तिथे घडते.
गोपाळपूर येथे दोन्ही वाऱ्या झाल्यानंतर गोपाळकाला होतो. तिथे श्रीकृष्ण मंदिर आहे. जवळच विष्णुपद मंदिर आहे. देव प्रथम पंढरपूरला आले, ते विष्णुपद मंदिर परिसरात आले. त्यांचे पाऊल इथे एका दगडावर उमटले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात हे मंदिर आहे. दर मार्गशीर्ष महिन्यात देव इथेच येऊन राहतात,असे मानतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लोक होडीतून किंवा चालत इकडे दर्शनासाठी आणि सहलीसाठी येतात.मार्गशीर्ष अमावस्येला पालखीतून मिरवणूकीने ,वाजत गाजत देवांच्या पादुका पुन्हा मुख्य मंदिरात आणल्या जातात.
चंद्रभागा नदी हीच गंगा नदी आहे .असे म्हटले जाते. विष्णुपदाजवळ चंद्रभागेला पुष्पावती नावाची नदी येऊन मिळते. तीच यमुना आहे असेही मानतात.
संत नामदेवांनी सांगितलेच आहे की
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ||
असे आहे हे शाश्वत धाम.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈