सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 160
☆ एक स्फुट ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
आज खूप दिवसांनी….
मीरा ठकार आठवल्या …
कुठल्याशा मैत्रिणीच्या संदर्भात—
त्या म्हणाल्या होत्या,
ती म्हणजे फक्त, “मेरी सुनो” !!!
आणि आजच आठवला ,
आम्हाला वडोदरा नगरीत,
सन्माननीय कवयित्री म्हणून,
दावत देणारा…..
कुणीसा जामदार,
स्वतःबद्दल बरचंसं बोलून झाल्यावर,
म्हणाला होता,
मी जास्त बोलतोय का ?
सहकवयित्री म्हणाली होती,
नो प्रॉब्लेम, “वुई आर गुड लिसनर्स” !
आणि मग आम्ही ऐकतच राहिलो,
त्याची मातब्बरी !!
असेच असतात…
अनेकजण…इथून..तिथून…
इकडे तिकडे…अत्र तत्र….सर्वत्र!!
“मेरी सुनो” “मेरी सुनो”म्हणत,
अखंड स्वतःचीच,
टिमकी वाजवणारे!!!
माझी श्रवणशक्ती हळूहळू
कमी होत चालली आहे,
हा सततचा अनुभव
येत असतानाच,
उजाडतो , एक नवा ताजा दिवस
या ही वळणावर,
तू भेटतोस…..
‘”सारखी करू नये खंत, वय वाढल्याची”
म्हणतोस!
आणि मी अवाक!
किती वेगळा आहेस,तू सर्वांपेक्षा !
कधीच बोलत नाहीस,
स्वतःविषयी….अहंभावाच्या खूप पल्याड तुझी वस्ती !
ब-याचदा विचार येतो मनात,
“खुदा भी आसमाँसे जब जमींपर देखता होगा, इस लडकेको किसने
बनाया सोचता होगा।”
मी शोधत असलेला,
“बोधिवृक्ष”
तूच असावास बहुधा….
© प्रभा सोनवणे
५ डिसेंबर २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद संपादक मंडळ 🙏