सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

“अगं,अगं, किती ग त्रास देतीयेस ! अतीच करतीस बाई! तुला भूक लागलीय का? काय हवंय खायला? तुला भात आवडत नाही .पोळी आवडत नाही. सारखा खाऊ दे म्हणतीस, छोट्या छोट्या गोळ्या हो ना ? दूध दिलं तर नाटकं किती करतीस गं ! एकदम थंड असलं तरी चालत नाही. जरासं गरम असलं तरी चालत नाही. शिळं आवडत नाही. ताजंच हवं. तेही वारणा पिशवीचं असलं की मग कसं भराभर जातं बरं पोटात.

सकाळी, सकाळी उठल्याउठल्या तुला खेळायची हुक्की येते. माझी साडी धरून, ओढून खेळायला चल म्हणतीस. पण मला वेळ असतो का ग तेव्हा? आणि काय गं, तुला खेळायला दोन छोटे बॉल आणून दिले होते ना, एक पांढरा- एक लाल, ते कुठं घालवलेस बरं? नुसती माझ्याकडे बघत राहिलीयेस.

अगं तो रोज सकाळी गोरा, गोरा, गब्बू ,गब्बू राजकुमार येतो ना, त्यालाही भूक लागते. त्यालाही खाऊ हवा असतो म्हणून तो येतो. तुला तो आवडत का नाही बरं ?आणि त्याचा राग का येतो बरं? किती छान आहे दिसायला. आणि किती गरीब आहे ना ! घरात आला की, त्याला हाकलून लावतेस. तो पण मग म्हणतो, बाहेर ये- मग तुला दाखवतो बरोबर. अगं त्याची ताकद तुझ्यापेक्षा जास्त आहे ना ! बाहेर गेलीस की तुझ्याशी भांडतो ना ? मग कशी घाबरून घरात पळून येतीस गं.

तुझी झोपायची पण किती तंत्रं. गादीवर सुद्धा काहीतरी मऊ मऊ, म्हणजे माझी कॉटन साडी तुला लागते. मग महाराणी निवांत झोपणार. झोपायच्या अगोदर सगळ्यांच्याकडून “अंग चेपून द्या, लाड करा,” म्हणून मागे लागतेस, हो ना ? आणि मग घरातलं प्रत्येकजण तुझी कौतुकं करत बसतात. प्रत्येकजण तुला मांडीवर खांद्यावर घ्यायला बघतात. पण तुला ना, कोणी उचललेलंच आवडत नाही. कोणी पापे घेतलेले आवडत नाही. असं का ग ? किती गोड आहेस ग ! म्हणून तर तुझं नाव ‘ रंभा ‘ ठेवलंय ना ! तुला कपाळाला टिकली लावली की, किती सुंदर दिसतेस .अगदी तुझी दृष्ट काढावीशी वाटते बघ.

तुझी आई किती शांत आहे ना ! ती बाहेरून, दुसरीकडून आलेली, म्हणून ती घरातली सून. आणि तू तिची मुलगी. याच घरात जन्माला आलीस ना? तू नात म्हणून सगळ्यांची जरा जास्तच लाडूबाई. म्हणशील ते लाड पुरवतो आम्ही  सगळेजण. तरीपण जराही अंग धरत नाहीस. बारीक ती बारीकच राहिलीस बाई !.सारखी इकडून तिकडे धावत असतीस ना. चालताना सुद्धा, शांतपणे आणि सावकाशपणे चालणं कसं  ते तुला माहीतच नाही. मी तर तुला तुडतुडीच म्हणते.

अगं रंभा ,मी एकटीच बडबडत राहिलेय.  तू काहीच बोलत नाहीयेस. रागावलीस का ? कशी ग माझी मुलगी ! बोल ना काहीतरी .बोल की ग.  बोल. बोल.” — 

“ म्याव, म्याव,  मियाव  मियाव, म्याऊ, म्याऊ…….”  

(आमच्या घरातील तीन मांजरांपैकी एकीशी केलेला संवाद.) 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments