डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० ( इंद्र सूक्त )

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र 

मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील दहाव्या सूक्तात इंद्र देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

गाय॑न्ति त्वा गाय॒त्रिणोऽ॑र्चन्त्य॒र्कम॒र्किणः॑ ।

ब्र॒ह्माण॑स्त्वा शतक्रत॒ उद्वं॒शमि॑व येमिरे ॥ १ ॥

गायत्रीतुन भक्त उपासक तुझेच यश गाती

अर्कस्तोत्र रचुनी ही अर्कअर्चनेस अर्पिती

पंडित वर्णित तुझीच महती तुझेच गुण गाती

केतनयष्टी सम ते तुजला उच्च स्थानी वसविती  ||१||

यत्सानोः॒ सानु॒मारु॑ह॒द्भूर्यस्प॑ष्ट॒ कर्त्व॑म् ।

तदिन्द्रो॒ अर्थं॑ चेतति यू॒थेन॑ वृ॒ष्णिरे॑जति ॥ २ ॥

भक्त भटकला नगानगांच्या शिखरांवरुनीया

अगाध कर्तृत्वा इंद्राच्या अवलोकन करण्या 

भक्ती जाणुनि वर्षाधिपती प्रसन्न अति झाला

सवे घेउनीया लवाजमा साक्ष सिद्ध झाला ||२|| 

यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा ।

अथा॑ न इन्द्र सोमपा गि॒रामुप॑श्रुतिं चर ॥ ३ ॥

घन आयाळी वर्षादायक अश्व तुझे बहु गुणी

धष्टपुष्ट देहाने त्यांच्या रज्जू जात ताठुनी 

जोडूनिया बलशाली हयांना रथास आता झणी

प्रार्थनेस अमुच्या ऐकावे सन्निध रे येउनी ||३||  

एहि॒ स्तोमा॑ँ अ॒भि स्व॑रा॒भि गृ॑णी॒ह्या रु॑व ।

ब्रह्म॑ च नो वसो॒ सचेन्द्र॑ य॒ज्ञं च॑ वर्धय ॥ ४ ॥

अमुचि आर्जवे सवे प्रार्थना ऐका धनेश इंद्रा

प्रसन्न होऊनी प्रशंसून त्या त्यासि म्हणा भद्रा

अमुची अर्चना स्वीकारा व्हा सिद्ध साक्ष व्हायला 

यज्ञा अमुच्या यशप्राप्तीचे आशीर्वच द्यायला ||४||

उ॒क्थमिन्द्रा॑य॒ शंस्यं॒ वर्ध॑नं पुरुनि॒ष्षिधे॑ ।

श॒क्रो यथा॑ सु॒तेषु॑ णो रा॒रण॑त्स॒ख्येषु॑ च ॥ ५ ॥

ऐका याज्ञिक ऋत्वीजांनो इंद्रस्तोत्र गावे

सर्वश्रेष्ठ ते सर्वांगीण अन् परिपूर्ण ही असावे

सखेसोयरे पुत्रपौत्र हे असिम सुखा पावावे

देवेंद्राच्या कृपादृष्टीने धन्य कृतार्थ व्हावे ||५||

तमित्स॑खि॒त्व ई॑महे॒ तं रा॒ये तं सु॒वीर्ये॑ ।

स श॒क्र उ॒त नः॑ शक॒दिन्द्रो॒ वसु॒ दय॑मानः ॥ ६ ॥

मनी कामना इंद्रप्रीतिची वैभव संपत्तीची

करित प्रार्थना शौर्यप्राप्तीचा आशीर्वच देण्याची 

आंस लागली देवेंद्राच्या पावन चरणद्वयाची

प्रदान करी रे शक्ती आम्हा अगाध कर्तृत्वाची ||६||

सु॒वि॒वृतं॑ सुनि॒रज॒मिन्द्र॒ त्वादा॑त॒मिद्यशः॑ ।

गवा॒मप॑ व्र॒जं वृ॑धि कृणु॒ष्व राधो॑ अद्रिवः ॥ ७ ॥

तुझ्या कृपेने प्राप्त जाहली कीर्ती दिगंत होई

लहरत लहरत पवनावरुनी सर्वश्रुत ती होई

हे देवेंद्रा प्रसन्न होऊनी धेनु मुक्त करी 

प्रसाद देऊनि आम्हावरती कृपादृष्टीला धरी ||७||  

न॒हि त्वा॒ रोद॑सी उ॒भे ऋ॑घा॒यमा॑ण॒मिन्व॑तः ।

जेषः॒ स्वर्वतीर॒पः सं गा अ॒स्मभ्यं॑ धूनुहि ॥ ८ ॥

तुमच्या कोपा शांतवावया कधी धजे ना कोणी

भूलोकी वा द्युलोकीही असा दिसे ना कोणी

स्वर्गोदकावरी प्रस्थापुन सार्वभौम स्वामित्व

सुपूर्द करुनी गोधन अमुचे राखी अमुचे स्वत्व ||८||

आश्रु॑त्कर्ण श्रु॒धी हवं॒ नू चि॑द्दधिष्व मे॒ गिरः॑ ।

इन्द्र॒ स्तोम॑मि॒मम् मम॑ कृ॒ष्वा यु॒जश्चि॒दन्त॑रम् ॥ ९ ॥

श्रवण तुम्हाला समस्त सृष्टी ऐकावी प्रार्थना 

प्रसन्न व्हावे स्वीकारुनिया माझ्या या स्तोत्रांना 

तुम्हीच माझे सखा मित्र हो माझ्या हृदयाशी

जतन करावे या स्तवनाला घ्या अंतःकरणाशी ||९||

वि॒द्मा हि त्वा॒ वृष॑न्तमं॒ वाजे॑षु हवन॒श्रुत॑म् ।

वृष॑न्तमस्य हूमह ऊ॒तिं स॑हस्र॒सात॑माम् ॥ १० ॥

सर्वश्रेष्ठ तू अशी देवता ज्ञान अम्हापाशी

ऐकुनिया भक्तांची प्रार्थना सहजी प्रसन्न होशी

वरुणाचा तर तूच अधिपति तुझी प्रीति व्हावी

सहस्रावधी श्रेष्ठ कृपा तव अम्हावरती व्हावी ||१०||

आ तू न॑ इन्द्र कौशिक मन्दसा॒नः सु॒तं पि॑ब ।

नव्य॒मायुः॒ प्र सू ति॑र कृ॒धी स॑हस्र॒सामृषि॑म् ॥ ११ ॥

सोमरसाला स्वीकारुनिया सत्वर होई प्रसन्न

इंद्र कौशिका दीर्घायुष्य आम्हा देई दान 

सर्वांहुनिया सहस्रगुणांनी श्रेष्ठ ऐसे ऋषित्व

वर्षुनिया आम्हावरती द्यावे आम्हासि ममत्व ||११||

परि॑त्वा गिर्वणो॒ गिर॑ इ॒मा भ॑वन्तु वि॒श्वतः॑ ।

वृ॒द्धायु॒मनु॒ वृद्ध॑यो॒ जुष्टा॑ भवन्तु॒ जुष्ट॑यः ॥ १२ ॥

वैखरीतुनी सिद्ध स्तोत्र ही तुझेच स्तवन करो

स्वीकारास्तव मम स्तवने ही पात्र श्रेष्ठ ठरो 

करी सुयोग्य सन्मान तयांचा सर्वस्तुत देवा 

अनंत तव आयुसम त्यांना चिरंजीव वर द्यावा  ||१२|| 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

https://youtu.be/VvefU67uon4

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments