सुश्री गायत्री हेर्लेकर

 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वप्नांचे पंख’ – सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

लेखिका :  सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी

प्रकाशक: अरिहंत पब्लिकेशन, पुणे

पृष्ठसंख्या: १९२

किंमत: रू. 290/-

परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर.

साहित्यप्रेमींचा तसेच साहित्यिकांचा आवडता, नव्हे काहीसा जिव्हाळ्याचा साहित्यप्रकार म्हणजे कथा.

छोट्यामोठ्या,वेगवेगळ्या विषयावरच्या कथा वाचकांनाही आवडतात.

अशाच कथांचा समावेश असलेला कथासंग्रह म्हणुन स्वप्नांचे पंख या कथासंग्रहाचा उल्लेख करता येईल..

लेखिका आहेत कोथरुड,पुणे येथील शुभदा भास्कर कुलकर्णी.

त्यांचा भावफुले हा काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर हा कथासंग्रह.

या कथासंग्रहात लेखिकेने नुसतीच स्वप्ने दाखवली नाहीत तर त्यांची परिपूर्ती होण्यासाठी –उत्तुंग आकाशातून भरारी घेण्यासाठी  त्यांना पंखांचे बळ दिले. हे स्वप्नांचे पंख या नावावरुन दिसुन येते.

निळ्या प्रसन्न रंगातली मुखपृष्ठ आकर्षक आणि शिर्षकाला साजेसे आहे.

नाव, आशय-विषय, प्रसंग, व्यक्ती, स्थळ, काळ, भाषा या सर्वांची सहजसुंदर, मोहक गुंफण असेल तर कथा मनोवेधक होऊन वाचनाचा आनंद मिळतोच पण त्यातुन जीवनोपयोगी बोधपर संदेश मिळत असेल तर दर्जा अधिक उंचावतो.

या संग्रहातील शुभदाताईंच्या  कथा या कसोटीवर पुरेपुर उतरल्या आहेत हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते ..अनेक कथा बक्षीसपात्र ठरल्या आहेत हाच त्याचा पुरावा म्हणता येईल.तरीही पुष्ट्यर्थ काही दाखले निश्चितच  देता येतील.

“स्वप्नांचे पंख”ही पहिलीच शिर्षक कथा आहे.,”एक कळी– फुलतांना”,सुवर्णमध्य”,सुखदुःख”,

“सोनेरी वळण”,”फुललेले चांदणे”

“स्मृतीगंध””,”ऊषःकाल”

अशी ही कथांची नांवे नुसतीच आकर्षक नाहीत तर कथेचा आशय -विषय प्रतित करणारी—जणु काही कथांचे आरसेच आहेत.

कथांचे प्रसंगही तसे साधेसुधे, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातले.

जसे—तारुण्यसुलभ प्रेम, लग्न, मुलांचे शिक्षण, पुढील  शिक्षणासाठी परदेशगमन, प्रवास, मुलींची छेड, मृत्यु, ई. पण शुभदाताईंनी कथेतुन ते वेगवेगळ्याप्रकारे मांडले आहेत.

त्यातुन  त्यांची चिकित्सक दृष्टी दिसते.

शांता, ईंदिरा, रमा, मुक्ता, माया, चारु, दीपा, राजश्री, मीता, श्रीराम, श्रीकांत, महेश, अनंत, आनंद, सुमित, अमित अशी नवीजुनी नावे असलेल्या वेगवेगळ्या कथेतील अनेक नव्हे सर्वच व्यक्तिरेखा आपल्याभोवती वावरणाऱ्या आहेत.असेच वाचतांना वाटते.

नव्हे आपणही त्यातलेच आहोत असेही वाटते.”स्वप्नांचे पंखमधील” –आई–मानसीचा मनातील धास्ती आपणही अनुभवलेली जाणवते. तर “गोफ–आयुष्याचा” मधील “मुलांकडे जावे की इथेच रहावे” हा निर्णय घेतांना गोंधळलेल्या आईच्या जागी कितीतरी जणी स्वतःलाच पहातील.”

“रंगबावरी” सारखी प्रेमकथा मनाला स्पर्श करुन जाते.

काही कथातुन आलेल्या, मामंजी, सासुबाई, माई, दी, आत्या अशा संबोधनांमुळे आपुलकीचे नाते निर्माण होते.

कथांची पार्श्वभुमी वेगवेगळ्या काळातील आहे. लाल आलवणाचा पदराचा बोळा तोंडात कोंबून हुंदका देणारी आत्या “स्मृतीगंध” मध्ये आपल्या डोळ्यातुन पाणी आणते. तर “सुवर्णमध्य”मधे लग्नाला ठामपणे नकार देणारी, नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतली  मीता सुखावून जाते. काही कथातुन शुभदाताईंनी. आजीआजोबा.

आईबाबा, नातवंडे अशा तीन पिढ्यांची, केलेली गुंफण मनाला भावते. पण त्याचबरोबर झालेले बदल ही  योग्य प्रकारे टिपले आहेत. “घराचे जुने चिरे एक एक करुन ढासळले पण नव्याने नविन उभे राहिले.” अशा शब्दात केलेले बदलांचे समर्थन मनाला पटते. शुभदाताईंचा समृध्द अनुभवही यातुन दिसतो.

शहरातील कथा नेमक्या पध्दतीने सांगणारी शुभदाताईंची लेखणी गावाकडचे —तिथल्या स्थळांचे वर्णन करतांना जास्त खुलते. शिंगणापूर, बेलापूर अशी गावे. तिथली हिरवीगार शेती, तिथले पाण्याचे तळे, थंडगार पाण्याचा पाट, घुंगरांची गाडी, एस.टी. स्टँड, गणपती, शंभु-महादेवाची देवळे, चौसोपी वाडा, दिंडी दरवाजा, दगडी चौथरा, दारावरची पितळी फुले आणि इतके बारीकसारीक वर्णन वाचतांना ती स्थळे, दृश्य डोळ्यापुढे उभे रहातात. शुभदाताईंचे सुक्ष्म निरीक्षण आणि समर्पक शब्दांतून केलेले वर्णन —दाद देण्यासारखेच आहे.

कथांची एकंदरित बैठक घरगुती असल्यामुळे साध्या सोप्या बोली भाषेचा वापर संयुक्तिक आहे. तरीही अनेक ठिकाणी शब्दसामर्थ्य दाखवणारी वाक्येही आहेत.

“आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्तच रुजलाय हा मनात, -अन् मनाच्या गाभाऱ्यातुन हुंकार आला.” -सुवर्णमध्य.

“आयुष्याचे एक एक पदर सांभाळता ,सांभाळता हा एक धागा हातातुन निसटला”.

मध्यमवर्गीयांच्या जीवनात नित्य येणाऱ्या काही अडचणी, समस्या —कथांचा केंद्रबिंदू असल्याने काही कथा नकळत का होईना  थोडाफार संदेश देतात. “संपलं, —संपलं म्हणायच नाही”.

“आपल्या जगण्याचे निर्णय आपण इतरांमार्फत का घ्यायचे?”.

एक खास वैशिष्ठ्य म्हणुन सांगता येईल —

“सकारात्मकता हा सर्वच कथांचा स्थायीभाव आहे. मतभेद, विचारात फरक आहेत, जरुर आहेत. पण वैमनस्य, विरोधामुळे टोकाच्या भुमिका नाहीत, सामंजस्य, आणि परिस्थिती स्विकारुन पुढे आयुष्य जगणे हा महत्वाचा संदेश मिळतो.. आणि तोच सद्यपरिस्थितीत ऊपयुक्त आहे.

कौटुंबिक, सामाजिक, –सर्वच ठिकाणी अनुभवाला येणारी अस्थिरता, असमाधान, यामुळे नैराश्य आणि नकारात्मक भावना. अशावेळी सकारात्मक कथा निश्चितच भावतात. मनाला आनंदित करतात. जगण्याचा दृष्टीकोन बदलतात. म्हणुनच वाचकांच्या पसंतीस उतरेल. 

असा सुंदर कथासंग्रह वाचकांच्या हाती दिल्याबद्दल —-लेखिकेचे मनःपुर्वक अभिनंदन—

एकुण १८ कथा असलेल्या या कथासंग्रहाची पृष्ठसंख्या १९२ असुन किंमत २९०रु.आहे.अरिहंत पब्लिकेशन,*पुणे * यांनी हे पुस्तक जानेवारी २०२२ मध्ये प्रकाशित केले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे – 411038 

दुरध्वनी – 9403862565, 9209301430 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments