सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ हृदयस्थ साक्षात्कार…. सुश्री संपदा वागळे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
वरवर पहाता एखाद्याच्या अंतःकरणाची कल्पना येणं कठीण ! नारळाच्या कठीण कवचाआड लुसलुशीत खोबरं दडलेलं असतं किंवा फणसाच्या काटेरी आवरणाखाली गोड गरे लपलेले असतात, तद्वत अनेकदा बाहेरून कडक,रागीट वाटणाऱ्या व्यक्तीच्या आतही ममतेचा झरा झुळूझुळू वहात असतो. जेव्हा हा हृदयस्थ साक्षात्कार होतो तेव्हा नतमस्तक होणं एव्हढंच आपल्या हाती उरतं.
मला आलेला हा अनुभव आहे महान अभिनेता विक्रम गोखले यांच्या बद्दलचा. सतरा वर्षांपूर्वीचा हा अनुभव त्यांच्या जाण्याने मनात पुन्हा एकदा लख्ख जागा झाला.
२००५ची गोष्ट. तेव्हा माझे यजमान कॅन्सरशी झगडत होते. ऑपरेशन झालं होतं. केमो सुरू होत्या. खूप अशक्तपणा आला होता. जेमतेम घरातल्या घरात फिरत होते इतकंच. एखादा दिवस आशा पालवीत उगवायचा तर पुढचा दिवस निराशेच्या खाईत ढकलायचा.असंच एकदा एका उत्साहाच्या दिवशी सकाळी पेपर वाचताना ते म्हणाले, ” येत्या शनिवारी गडकरीला विक्रम गोखल्यांचं ‘ खरं सांगायचं तर ‘ हे नाटक लागलंय. बरोबर सुप्रिया पिळगावकर आहे, म्हणजे मेजवानी आहे. वेळही रात्री साडेआठची आहे. म्हणजे आपली बॉडीगार्डही (सीए होऊन नुकतीच कामाला लागलेली आमची मुलगी,पल्लवी ) बरोबर असणार.हे जमवूया आपण…”
माझ्या समोरील अनेक प्रश्न मी गिळून टाकले. वाटलं न जाणो, सध्याच्या तणावयुक्त दिवसात हे नाटक थोडा ओलावा घेऊन येईलही. त्यानंतर एसीमध्ये तीन तास एका जागी बसण्यासाठी आमची तयारी सुरू झाली.
बनियन, वर स्वेटर, त्यावर फुलशर्ट, पायात गुढघ्यापर्यंतचे वुलन सॉक्स, बूट असा पेहराव चढवून हे सज्ज झाले. मधे खाण्यासाठी नाचणीची बिस्किटे, राजगिऱ्याची चिकी, आवळा सुपारी, पाण्याची बाटली, खोकला आला तर खडीसाखर, उलटी आली तर प्लॅस्टिक पिशवी इत्यादींनी माझी पिशवी गच्च भरली.
नाटक रहस्यप्रधान होतं. बघता बघता हे त्यात गुंतून गेले. आमचं मात्र अर्ध लक्ष यांच्याकडेच होतं. बऱ्याच दिवसांनी मिळालेलं वेगळं वातावरण,वेगळा विषय यामुळे स्वारी खुशीत होती. तो आनंद आमच्याही तनामनावर पसरला.
नाटक संपल्यावर पल्लवी म्हणाली, ” तुम्ही दोघं गेटजवळ थांबा. मी गाडी काढून तिथे येते.” आम्ही बरं म्हणून गेट जवळ तिची वाट पहात थांबलो. पण एक एक करत सर्व गाड्या गेल्या, तरी हिचा पत्ता नाही. म्हणून काय झालं ते बघायला आम्ही पार्किंगच्या जागी गेलो. बघतो तर तिथे तिची गाडीशी झटापट सुरू होती. आमच्या त्या जुन्या मारुती 800 ने असहकार पुकारला होता. हे पाहताच यांच्यातील इंजिनिअर जागा झाला.
“स्पार्क प्लग गेलाय का बघ, बॉनेट उघड. पाणी संपलय का पहा…” सूचना सुरू झाल्या आणि तिची निमूट अंमलबजावणी.
होता होता पार्किंगमध्ये फक्त आम्ही तिघेच उरलो . आमच्या गाडीच्या मागे एकच आलिशान कार उभी होती. नाटक संपून अर्धा तास झाला. घड्याळाचा काटा पावणेबारावर गेला. मी यांना म्हटलं, ” अहो,राहू दे ना आता. आपण गाडी इथेच सोडून रिक्षाने घरी जाऊया. उद्या मेकॅनिकला पाठवून गाडी आणू. आणखी उशीर झाला तर रिक्षाही मिळायची नाही…”
पण यांच्यातील इंजिनियरला एव्हाना चेव चढला होता. ते माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इतक्यात कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. बघितलं तर खुद्द विक्रम गोखले आपल्या एका सहकाऱ्याशी बोलत आमच्याच दिशेने येत होते. म्हणजे मागची गाडी त्यांचीच होती तर ! आम्हाला अगदी कानकोंडं झालं. मी खालमानेने त्यांची गाडी काढायला जागा आहे ना हे बघून घेतलं. वाटलं,’ हे लौकर कटलेले बरे, त्यांच्यासमोर शोभा नको.’ म्हणून आम्ही तिघेही बॉनेटमधे डोकं घालून ते जाण्याची वाट बघत राहिलो.
पण झालं भलतंच ! कानांवर शब्द आले, ‘ गाडी बंद पडलीय का ?’ चक्क विक्रम गोखले आम्हाला विचारत होते.
मी मानेनेच हो म्हटलं. यांच्याकडे पाहून एकंदर परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी आमच्या गाडीचा ताबा घेतला. आजूबाजूला शोधून एक तार आणली. कसल्याशा पॅकिंगसाठी रुपयाचं नाणं काढलं. आपल्या सहकलाकाराला हाताशी धरून रात्री बारा वाजता त्यांचा हा खटाटोप सुरू झाला.
साडे तीन तासांच्या तणावपूर्ण नाटकानंतर हा अभिनयाचा बादशहा पुसटशीही ओळख नसलेल्या प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करत होता. काटा साडेबारावर सरकला. विक्रम गोखल्यांचे दोन्ही हात काळे झाले होते. तरी ते सोडून द्यायला तयार नव्हते. आम्ही पूर्ण संकोचून बाजूला उभे. वाटलं म्हणावं, ” मला तुमचं काम खूप आवडलं, मी तुमची फॅन आहे…” पण वाटलं ,या क्षणी हे अगदीच कृत्रिम होतंय. इतक्यात ते आपल्या मित्राला म्हणाले, ‘ आपण ढकलतंत्र वापरून बघूया.’ त्या बिचाऱ्याने मान हलवली. तोही आमच्यासारखाच हतबल ! हा नटसम्राट त्या जुन्या गाडीच्या व्हीलवर बसला, आणि त्यांचा तो मित्र व हाक मारून बोलवलेला वॉचमन दोघे गाडी ढकलू लागले.
माणुसकीचा हा गहिवर पाहून त्या गाडीलाही पाझर फुटला. इंजिनाने फुर्र…फुर्र करत साथ दिली. गाडी तशीच चालू ठेवत त्यांनी पल्लवीला भरपूर सूचना दिल्या. सिग्नलला देखील इंजिन बंद करू नको हे बजावून सांगितलं. रंगायतनच्या इमारतीला वळण घेऊन आम्ही बाहेरच्या रस्त्याला लागेपर्यंत ते तिथेच उभे होते.
जे घडलं त्यातून भानावर यायला आम्हाला पाच मिनिटं लागली. त्यांचे आभार मानायचेही राहून गेले.अर्थात त्या शब्दांची गरज होती असं नाही मला वाटत.
त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे या प्रसंगाचा फोटो काढायचा राहिला. पण त्या भेदक नजरेच्या, भारदस्त व्यक्तिमत्वाच्या हळव्या हृदयाची अप्रतिम छबी मात्र काळजावर निरंतन कोरली गेली.
लेखिका : सुश्री संपदा वागळे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈