सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले…

त्यावेळी पूर्व आणि पश्चिम (आजचा बांग्लादेश) पाकिस्तानच्या समुद्री वाटा संपूर्ण तोडण्याची (complete naval blockade) महत्वाची जबाबदारी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली.  

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख सडेतोड उत्तर देण्यासाठी नौदलाच्या इतिहासातील घातक आणि धाडसी हल्ला करण्यास भारतीय नौदल सज्ज झाले. 

यासाठी गरज होती योग्य वेळ साधून अचानक हल्ला करण्याची, कारण हल्ला होणार होता तो थेट पाकिस्तानच्या कराची बंदरावर ! कराची बंदर हे पाकच्या नौदलाचे व संपूर्ण व्यापाराचे प्रमुख बंदर. येथूनच पाकिस्तानला अमेरिका व ब्रिटन या देशांकडून युद्धासाठी मदत मिळत असे व पूर्व पाकिस्तानला पाठवली जात असे. असे हे कराची बंदरच नष्ट करून पाकचा कणाच मोडण्याचं ठरलं. 

ह्या मोहिमेला नाव देण्यात आले “Operation Trident“. 

यासाठी भारतीय नौदलाने निवड केली ती आकाराने छोट्या, तेज व चपळ अशा क्षेपणास्त्रवाहू Osa-class missile boat जहाजांची –                                          

१) INS Nipat, २) INS Veer, ३) INS Nirghat, ४) INS Vinash, ५) INS Nashak, ६) INS Vidyut, ७) INS Vijeta, ८) INS Nirbhik

ह्या जहाजांची मर्यादा बघता ही जहाजे कराची बंदराच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या जहाजांनी ओढून (TOE) नेण्याचे ठरले. तिथून पुढे हल्ला करून ती सर्व जहाजे तीन दिशांना जाणार होती. नुकतेच रशियाहून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या, उत्तम अस्खलित रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्यात आली. मोहिमेदरम्यान आपल्या सर्व जहाजांना रेडिओ वापरण्यास मनाई होती. गरज भासल्यास संभाषण हे रशियन भाषेतूनच करावे, जेणेकरून पाकला ह्या मोहिमेचा पत्ता लागणार नाही आणि रशियन नौदल समजून तो कोणतीही हालचाल करणार नाही, ह्या साठीचा हा डाव होता. 

पहिला हल्ला :–  ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ही सर्व जहाजं सौराष्ट्रच्या किनाऱ्याजवळून कराचीच्या दिशेने निघाली. कराचीजवळ येताच रडार पिंग करू लागले. त्यांना काही पाकिस्तानी जहाजं तिथे गस्त घालताना आढळली.

सुमारे १०.४५ ला INS Nirghat ला हल्ला करण्याचे आदेश मिळाले. तात्काळ पहिलं क्षेपणास्त्र सुटलं आणि जाऊन पाकिस्तानी जहाजावर धडकलं. ते जहाज होतं Battle-class Destroyer PNS Khaibar.– PNS Khaibar ने बुडता बुडता पाकिस्तानी नौदलाला रेडिओ संदेश पाठवला, “enemy aircraft attack-number one boiler hit – ship sunk…” (PNS Khaibar ला त्यांच्यावर हल्ला कुठून कसा झाला हेही समजलं नव्हतं.)

सुमारे ११.२० वाजता कराचीपासून अवघ्या ३२ मैलांवर असलेल्या INS Veer ला अजून एक जहाज दिसलं, ते होतं  PNS Muhafiz (Adjutant-class mine-sweeper) — INS Veerने क्षणाचाही विलंब न करता २ क्षेपणास्त्रे PNS Muhafiz च्या दिशेने सोडली. पुढची ७० मिनिटं Muhafiz जळत होतं. 

दरम्यान INS Nipat च्या अवघ्या २६ मैलावर एक जहाज टप्प्यात आलं, ते होतं venus challenger – पाकिस्तानसाठी दारुगोळा आणि हत्यारं आणतानाच नेमकं सापडलं. INS Nipat ने त्या जहाजाला तळ दाखवला. 

त्याच पाठोपाठ पाकिस्तानी PNS ShahJahan (British C class destroyer) यावर हल्ला केला. 

PNS ShahJahan बुडालं नाही, पण अगदीच निकामी झालं आणि INS Nipat तडक कराचीच्या दिशेने वेगात निघालं आणि अवघ्या १४ मैलांवरून कराची बंदराच्या मुख्य मार्गाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं. —

(जगातील युद्धाच्या इतिहासात कोणत्याही नौदलाने जहाजावरून जहाजावर मारा करण्यासाठी असलेल्या क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरील लक्ष्य भेदण्यासाठी आजपर्यंत केलेला नाही. भारतीय नौदलाने ते यशस्वीरित्या करून दाखवलं.) सुमारे ११.५९ वा.कराची बंदरातील भल्या मोठ्या तेलाच्या टाक्यांना त्यांनी लक्ष्य बनवलं. एक टाकी फुटताच इतर टाक्या फुटू लागल्या. संपूर्ण कराची हादरलं. मध्यरात्री भरदिवसासारखा उजेड पसरला. कराची बंदर धडधडून पेटत होतं.)

— आणि भारतीय नौदल मुख्यालयाला पहिला रेडिओ संदेश पाठवण्यात आला —-A N G A A R..

हा कोड होता दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा ! 

दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेने उरलंसुरलं कराची ठोकून काढलं.

८ डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या फक्त तीन जहाजांनी Operation Pythonच्या अंतर्गत कराचीवर हल्ला चढवला. ह्या सततच्या हल्ल्यांमुळे अर्धं पाकिस्तानी नौदल रसातळाला गेलं आणि बरंचसं निकामी झालं. उरलेलं पूर्णपणे हादरून गेलं होतं. 

अश्या ह्या भारतीय नौदलाच्या कामगिरीसाठी आणि ह्या विजयासाठी ‘ ४ डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस ‘ म्हणून साजरा होतो आणि ज्या जहाजांच्या ताफ्याने हा हल्ला केला, त्यांना तेव्हापासून नौदलात killer squadron संबोधलं जाऊ लागलं.  

पुढे १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि —-

आणि एक नवीन ‘बांग्ला देश’ निर्माण झाला… 

भारतीय नौदलाच्या  या अतुलनीय कामगिरीला विनम्र अभिवादन…!  जय हिंद !!!  

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments