सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘सृजनवलय’ – श्री अशोक भांबुरे ☆ परिचय – सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर ☆
(हिन्दी राष्ट्रभाषा पंडित, उर्दू भाषा अभ्यासक, प्रोफेशनल फोटोग्राफर किंचित कवयित्री अशी स्वतःची ओळख देणाऱ्या सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर यांनी ‘सृजनवलय’ या पुस्तकाचा परिचय खालीलप्रमाणे करून दिला आहे.)
पुस्तक – सृजनवलय
भाषा – मराठी
लेखक – कवि अशोक भांबुरे
प्रकाशक – संवेदना प्रकाशन
किंमत – रु.150
पृष्ठसंख्या – 96
पुस्तक परिचय- सुश्री कांचन पाडळकर
कवी अशोक भांबुरे हे माझ्या साहित्यिक ग्रुपचे सदस्य आहेत. तसेच अनेक काव्य संमेलनांमध्ये मी त्यांच्या कविता आणि गझल ऐकत असते. त्यांच्या कविता आणि गझल ह्या नेहमीच मनाला भावतात. नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा तिसरा काव्यसंग्रह “सृजनवलय” वाचला आणि अपेक्षेप्रमाणे या काव्यसंग्रहाने काव्यरसाची तहान ही पूर्णतः भागवली.
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
कवी अशोक भांबुरे यांची कविता निसर्ग, प्रेम, सामाजिक-राजकीय दरी, सामाजिक रूढी, स्त्री, जाती-धर्माच्या भिंती यावर भावनिक भाष्य करते. पुस्तकाचं पहिलं पान उलटलं आणि त्यांची पहिली गझल आवडली.
वेदना सांभाळते माझी गझल
अन व्यथा कुरवाळते माझी गझल
*
कोण कुठला जात नाही माहिती
माणसांवर भाळते माझी गझल
स्त्री स्वतः विषयी, तिच्या दुःखाविषयी, वेदने विषयी लिहिते. पण कवी किंवा लेखकाने जेव्हा स्त्रीची वेदना अधोरेखित केलेली असते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कवीने, त्या लेखकाने आपल्या भावनिक पातळीवर त्या गोष्टींची अनुभूती घेतलेली असते.
या काळया बुरख्यामागे मी किती दडविले अश्रू
पुरुषांची मक्तेदारी नडताही आहे आले नाही
स्त्री आयुष्यभर आपल्या घरादारासाठी संसारासाठी झटत असते. समर्पणाची भावना निसर्गाने स्त्रीला जन्मताःच बहाल केलेली आहे. स्त्री घराबाहेर पडते, नोकरी करते, संसार सांभाळते. पण हल्ली नोकरी न करणाऱ्या स्त्रीबद्दल, ” ती काय घरीच असते” अशी सामान्य विचारधारा समाजाची काही ठिकाणी दिसून येते. तिचं घरासाठी, मुलांसाठी दिवसभर कामात बिझी असणं याकडे कोणी लक्ष देत नाही. यावर भाष्य करणारे काही काही शेर सुंदरपणे मांडले आहे…..
कामाला ती जात कुठेही नाही बहुदा
सातत्याने घरी स्वतःची हाडे दळते
*
वेदनेतुनी प्रकाश देते कुणा कळेना
समई मधली वात जळावी तशीच जळते
कवीने स्त्री विषयी फक्त व्यथाच मांडलेली नाही,तर आशावादही व्यक्त केला आहे…
काळासोबत झुंजायाला तयार नारी
लेक लाडकी पुढे पुढे ही जावी म्हणतो
जाती-धर्माच्या भिंती आणि समाजातील रूढी, प्रथा, परंपरा यावर लक्ष केंद्रित करणारे ही काही शेर आहेत.जसे…..
धर्माचे छप्पर होते, जातीच्या विशाल भिंती
मज सागरात प्रीतीच्या बुडता ही आले नाही
*
सारे पसंत तरीही फुटली न का सुपारी
नाकारताच हुंडा सारे उठून गेले
समाजात वावरणाऱ्या माणसाची वृत्ती आणि विरोधाभास यावरचा पुढील शेर वाचला आणि मला अचानक काही लोकांची आठवण झाली.
ढोंगीपणा करूनी आयुष्य भोगतो जो
त्याचे म्हणे घराणे गावात थोर आहे
कवीचे मन फक्त माणूस आणि त्याच्या भावना इतकच फक्त सीमित नसतं. तर त्यामध्ये असते संवेदना. ती मग फुलांविषयी असेल, झाडांविषयी असेल, पक्षी-प्राण्यांविषयी असेल. हल्ली खरी जंगलं नष्ट होऊन माणसाने जे सिमेंटची जंगलं उभारली आहेत त्याचा वन्य जीवनावर झालेल्या परिणामाबद्दल कवी म्हणतात…
वस्तीत श्वापदांच्या वस्ती उभारतो अन्
मिळते जनावरांना शिक्षा कठोर आहे
या पुस्तकातली खूप आवडलेली एक गझल, त्यातले काही शेर आपल्यासमोर मांडते…..
देखणेपणास गंध, शाप हाच वाटतो
फास देऊनी फुलास, माळतात माणसे
*
बाण लागला उरात, जखम चिघळली अशी
मीठ नेमके तिथेच चोळतात माणसे
*
घातपात, खून हेच कर्म मानतात जे
साळसुद ही स्वतःस समजतात माणसे
*
द्रौपदी पणास लाव डाव थांबवू नको
हा जुगार रोजचाच खेळतात माणसे
समाजात वावरणाऱ्या मानवरुपी दानवाचा विनाश होण्याची प्रार्थना ही कवी करतात. कवी म्हणतात की….
नटराजा तू पुन्हा एकदा कर रे तांडव
टाक चिरडूनी धरती वरचे सारे दानव
कवी अशोक भांबुरे यांची कविता प्रेरणेने भरलेली आहे. सामाजिक वैयक्तिक जीवनाचे दुःखच फक्त कुरवाळत न बसता स्वतःच्या वर्तनाचा, कष्टाचा माणसाने वेध घ्यावा. आपला दृष्टिकोन विधायक असावा या विचाराचा कवी आग्रह करताना दिसून येतं….
घमेंड नाही जीत ठेवली होती त्याने
ससा हरला आणि जिंकले येथे कासव
*
कष्टात राम आहे त्याला कसे कळावे
हा राम राम म्हणतो नुसताच खाटल्यावर
*
दगडात सावळ्या तू दिसतो जरी मनोहर
माहित हे मला ही तू सोसलेस रे घण
ईश्वराच्या सुंदर मूर्तीलाही पूजनीय होण्यासाठी अनेक घाव सोसून आकारलला यावं लागतं. तेव्हाच मूर्ती समोर सगळे नतमस्तक होतात.
वादळातही दोर प्रीतीचा तुटला नाही
भिरभिरणारा पतंग माझा कटला नाही
प्रेमाचा प्रांत ही कवीने खूप सुंदररित्या रेखाटला आहे. सृजनवलया काव्यसंग्रहात एकूण 95 कविता आहेत. मुक्तछंदातल्या कविता गझल लावणी, गोंधळ जोगवा तसेच शिवराय आणि जिजाऊंच्या कर्तुत्वावर केलेल्या रचनाही सुंदर आहेत. पुस्तकाला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे.
साहित्याने पोट भरत नसतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काहीवेळा साहित्यिकाला येत असतात. व्यक्त होणे ही माणसात असलेली नैसर्गिक बाब आहे. साहित्याने पोट भरत नसलं तरी एका सुज्ञ आणि रसिक माणसाला साहित्यिक भूक असते. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याद्वारे विधायक बदल आपल्या जीवनात आणि समाजात व्हावे ही साहित्यिकाची अपेक्षा असते. असे विचार कवी अशोक भामरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे. काही शेर….
या तापसी युगाचा आता करूच अंत
हृदयात एक एक जागा करून संत
*
देऊ प्रकाश स्वप्ने बदलून टाकू सर्व
इतकेच स्वप्न माझे व्हावे इथे दिगंत
या पुस्तकातील सर्वच काव्य प्रकार छान आहेत. पण यातल्या गझल मला विशेषतः खूप जास्त भावल्या.
ते माझं गजले वर मनस्वी प्रेम असल्यामुळे असेल बहुदा.
सुचल्या न चार ओळी हे रक्त आटल्यावर
आली बघा गझल ही काळीज फाटल्यावर
बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला उत्तम लेखक वावरत असतात, उत्तम कवी वावरत असतात पण आपल लक्ष फारसं त्यांच्याकडे जात नाही. प्रसिद्ध होण्याची हातोटी त्यांच्याकडे नसावी बहुतेक, अन् ना ही प्रसिद्धीची हाव असावी. तर बऱ्याचदा काहींचं लिखाण मात्र जिमतेम असूनही प्रसिद्ध कसं व्हावं यांची कला अवगत असल्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्या आजूबाजूला जी माणसं साधी सरळ आहेत. ते लिखाणातनं व्यक्त होत असतात. लिखाणही उत्तम असतं.त्यांना कोणत्याही काही अपेक्षा नसतात तरी ते रसिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे साहित्याची जाण असणाऱ्या आपण सर्व आणि साहित्यिकाची कदर करणारे आपण सर्व परिचित नसलेल्या पण चांगल्या साहित्यिकाची ओळख करून द्यावी म्हणून हा पुस्तक परिचय आपणापर्यंत पोहोचवते. चांगली माणसं चांगल्या माणसांपर्यंत पोहोचवावी आणि जुळावी असं मला मनापासून वाटतं.
© सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈