सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अपघात आणि सुरक्षा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही  दिवसांपूर्वी यवतमाळला मन सुन्न करणारी घटना घडली. यवतमाळातील सुप्रसिद्ध गायनिक डॉक्टर सुरेखा बरलोटा ह्यांच अतिशय दुर्दैवी अपघाती दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. सुरेखा ह्यांच्या निधनानं यवतमाळातील एक सुविद्य, निष्णात डॉ. तर आपण गमावलाच पण त्याचबरोबर निष्णात मऩोविकारतज्ञ डॉ. पियुष बरलोटा ह्यांना त्यांच्या सेवाभावी कार्यात भक्कम साथ देणारी सहधर्मचारिणी आणि दोन उमलत्या वयांतील मुलांची आई गमावल्या गेली.

सगळं गेलेलं परत पुन्हा मिळू शकतं परंतु आपली गमावलेली व्यक्ती मात्र परत कधीच हाती येत नाही.

आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे घडलेले अपघात हे आपल्याला हादरवून तर सोडतातच परंतु खूप विचारात देखील पाडतात.

सगळ्यात पहिला मुद्दा स्वरक्षण,स्वतःची काळजी घेण्याचा. ह्या अपघाती घटनांवरुन एक लक्षात येतं सुविद्य, समजदार व्यक्ती सुद्धा प्रवास करतांना घ्याव्या लागणा-या आवश्यक खबरदा-यांमध्येही बेफिकीरी,लापरवाही करतात आणि हीच गोष्ट कदाचित आपल्या स्वतःच्या जीवावर बेतते. बरेचवेळा आपल्या कामाच्या घाईने म्हणा वा एक प्रकारच्या वेगाच्या धुंदीत वाहन बेसुमार वेगात चालवितात

कुठलही वाहन अपघात झाला असता जितक्या कमी वेगात असतं तितकी हानी कमी होते. त्यामुळे सिटबेल्ट न बांधण, वाहन अतिस्पीड मध्ये पळवणं ह्या गोष्टी सुद्धा “आ बैल मुझे मार”

सारखं अपघातांना आणि वेगवेगळ्या होणाऱ्या नुकसानींना आमंत्रण देत असतात हे विसरून चालणार नाही.

बरेचसे अपघात हे सहलीला जातांना, सहलीहून परततांना वा देवदर्शनासाठी जातांना वा येतांना घडतात. ह्या बाबीकडे लक्ष पुरविलं असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. आजचं आपल जीवनमान हे अतिशय वेगवान झालयं. त्यात आपल्याला कमी कालावधीत, झटपट सगळ्याचं गोष्टी हव्या असतात,जणू कमी कालावधीत “कर लो दुनिया मुठ्ठीमे”सारखं. जरा काही दिवस गेले की आपल्याला “चेंज” हवा असतो.आणि हा चेंज बहुतेकांना त्यांच्या अल्प सुट्टीतच कसाबसा कोंबून भरल्यासारखा हवा असतो.

सहल ,पर्यटन तसं आवश्यकच. पण कुठलिही गोष्ट निवांतपणे आणि जरा वाटबघून अल्प प्रमाणात मिळाली की ती तब्येतीला मानवते,आनंद देते बघा. पण आजकाल अगदी दोन दिवसाच्या सुट्टी मध्येही स्वतःच्या घरात पाय टिकंत नाही, सतत कुठेतरी घाईबडीत का होईना बाहेर जायचंच ही प्रघात असल्यासारखी पद्धतच जणू पडतेयं.कदाचित आता नातेवाईक आणि पाहुणे जाणं ही संकल्पना हळूहळू -हास पावतेयं म्हणूनही असावं.असो

त्यामुळे शांतपणे, निवांतपणे भरपूर वेळेची स्पेस ठेवूनच पर्यटनाला जावं,वाहनं हळू आणि कमी वेगात हाकावी, सीटबेल्ट सारख्या सोयींचा वापर करावा  ह्या निदान आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी माणसांनी पाळाव्यात असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments