सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका ‘निरा’ ची गोष्ट… शब्दांकन – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. भारताच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केलं गेलं. आज जेव्हा त्याच कुटुंबांची पुढची पिढी तो इतिहास न वाचता बेताल वक्तव्य करते तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते. ब्रिटिश काळात काळ्या पाण्याची शिक्षा काय असते हे माहित नसलेले अनेक जण त्याबद्दल आपल्या अकलेचे तारे तोडत असतात. त्याच अंदमान च्या काळोखी भिंतीत इतिहासाचं एक पान लुप्त केलं गेलं ज्याबद्दल आजही भारतीयांना काहीच माहित नाही. ही गोष्ट आहे एका निरा ची. जिने अपरिमित यातना भोगताना पण देशाशी गद्दारी केली नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने देशासाठी आपल्या पतीचे प्राण घ्यायला पण मागेपुढे बघितलं नाही. ही गोष्ट आहे एका निराची जिने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही पण स्वातंत्र्य भारतात तिच्यावर अक्षरशः झोपडीत राहण्याची वेळ आणली गेली. कारण इतिहासाची अशीच कित्येक सोनेरी पाने एका कुटुंबासाठी जाणून बुजून लुप्त करण्यात आली. 

गोष्ट सुरु होते ५ मार्च १९०२ साली जेव्हा उत्तर प्रदेशातील भागपत जिल्ह्यात निरा आर्या यांचा जन्म झाला. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या निरा यांच शिक्षण कोलकत्ता इकडे झालं. लहानपणापासून त्यांच्यात देशभक्ती भिनलेली होती. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही त्या तयार होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर देशप्रेमाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच ओढीतून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील झाशीच्या राणी  रेजिमेंट मधे प्रवेश केला. नेताजींनी त्यांच्यावर सरस्वती राजामणी यांच्या सोबत हेरगिरी करण्याची जबाबदारी दिली. त्या देशाच्या पहिल्या गुप्तहेर सैनिक बनल्या. मुलगी बनून तर कधी पुरुष बनून ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश मिलिट्री कॅम्प मधील गोष्टी त्या आझाद हिंद सेनेला पुरवत राहिल्या. घरच्यांना कळू न देता त्यांच देशकार्य सुरु होतं. 

त्यांच्या या गुप्तहेर कार्याची माहिती नसलेल्या घरच्यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठित अश्या एका ब्रिटिश सेनेतील ऑफिसरशी त्यांचं लग्न जमवलं. त्या ऑफिसरचं नावं  होतं श्रीकांत जय राजन दास. लग्नाचे सोनेरी दिवस सरले तसे त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या विचारांमधील दरी वाढायला लागली. श्रीकांत दास यांना निराच्या वेगळ्या रूपाबद्दल कल्पना आली. निरा ब्रिटिश सत्तेविरुद्ध हेरगिरी करून आझाद हिंद सेनेची मदत करत आहे हे समजल्यावर त्यांनी तिला नेताजींबद्दल विचारण्यास सुरुवात केली. नेताजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी तिच्यावर प्रत्येक प्रकारे जबरदस्ती केली पण निरा कशाला दबली नाही. उलट तिने अजून वेगाने स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. एके दिवशी महत्वाची माहिती नेताजींना कळवण्यासाठी एका गुप्त भेटीसाठी निरा निघाली असताना याची माहिती ब्रिटिश अधिकारी श्रीकांत यांना लागली. त्यांनी गुपचूप तिचा पाठलाग केला. नेताजींसोबत भेट होत असताना श्रीकांत यांनी नेताजींच्या दिशेने गोळी झाडली. पण ती गोळी नेताजींच्या ड्रायव्हरला लागली. पुढे काय होणार याचा अंदाज निराला आला. एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळ असलेल्या चाकूने तिने आपल्या जोडीदाराचा म्हणजे श्रीकांत दास यांचा कोथळा बाहेर काढला. श्रीकांतचा जीव घेऊन तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवला. 

एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी ब्रिटिश सरकारने निरा आर्याला काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेसाठी सेल्युलर जेल,अंदमान इकडे पाठवलं. इकडे सुरु झाला एक अत्याचाराचा न संपणारा प्रवास. हाड गोठवणाऱ्या थंडीत छोट्याश्या कारागृहात त्यांच्यावर रोज अत्याचार करण्यात येत होते. साखळदंडात अडकवलेल्या हातापायांच्या बेड्यांनी चामडी सोलून हाड घासत होती. पण ब्रिटिशांचे अत्याचार संपत नव्हते. एक दिवस जेलरने त्यांच्याकडे ऑफर दिली की जर तुम्ही नेताजींचा ठावठिकाणा सांगितला तर तुला आम्ही या जाचातून मुक्त करू. पण यावर निराने एकही शब्द बोलण्यास नकार दिला. नेताजी कुठे असतील तर ते माझ्या हृदयात आहेत. या उत्तराने चवताळलेल्या त्या जेलरने तिचे कपडे फाडले. तिथल्या लोहाराला बोलावून चिमटीने निराचा उजवा स्तन कापायचा आदेश दिला. त्या लोहाराने क्षणाचा विलंब न करता निरा आर्या यांचा उजवा स्तन कापला. पुन्हा मला उलट बोललीस तर तुझा डावा स्तन ही धडावेगळा करेन.  पण त्यावरही निरा यांनी नेताजींचा ठावठिकाणा किंवा त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलण्यास नकार दिला. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमान कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात आली. चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांनी पद्धतशीरपणे निरा आर्या यांचं बलिदान इतिहासाच्या पानात लुप्त केलं. देशासाठी स्वतःच्या जोडीदाराचा खून करणारी आणि वेळप्रसंगी स्वतःच्या स्तनाचं बलिदान करणारी रणरागिणी भारतीयांच्या नजरेत पुन्हा कधीच आली नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत सरकारी जमिनीवर उभ्या केलेल्या एका अनधिकृत झोपडीत त्यांनी हैद्राबादच्या रस्त्यांवर फुलं विकत आपलं आयुष्य काढलं. देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणारी निरा आर्या  २६ जुलै १९९८ रोजी अनंतात विलीन झाली. सरकारने त्यांची ती झोपडी पण बुलडोझर चालवून जमीनदोस्त केली. त्यांचा साधा सन्मान करण्याची मानसिकता गेल्या ७५ वर्षात भारत सरकार दाखवू शकलेलं नाही हा एक भारतीय म्हणून आपला पराजय आहे. इकडे टुकार चित्रपटात काम करणारे हिरो आणि तळवे चाटणारी लोकं जेव्हा पद्म पुरस्काराचे मानकरी ठरतात, तेव्हा इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्या अनेक अनाम वीरांचा सन्मान करायला आपण आजही विसरतो आहोत याची जाणीव होते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही वाचाळवीर राजकारणी जेव्हा अंदमानमधल्या सेल्युलर जेल, तिथल्या शिक्षेबद्दल बेताल वक्तव्य करतात, तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं, ज्या स्तनातून दूध पिऊन तुम्ही या जगात आलात त्या स्तनाला स्त्रीच्या शरीरापासून वेगळं करताना काय यातना झाल्या असतील याचा थोडा विचार करा. 

धन्य तो भारत ज्यात निरा आर्यासारख्या स्त्रिया जन्माला आल्या. धन्य ते नेताजी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणापलीकडे जीव देणारी अशी लोकं आणि आझाद हिंद सेना उभी केली. धन्य ती आझाद हिंद सेना ज्या सेनेत निरा आर्यासारख्या सैनिकांनी आपलं योगदान दिलं. फक्त करंटे आम्ही ज्यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला. करंटे आम्ही, ज्यांनी ७५ वर्षात अश्या लोकांची कदर केली नाही. करंटे आम्ही ज्यांना भारताचा स्वातंत्र्य लढा कधी समजलाच नाही… 

निरा आर्या यांचा जीवनपट उलगडणारा एक चित्रपट येतो आहे. अर्थात त्यात कितपत खऱ्या गोष्टी दाखवल्या जातील याबद्दल शंका आहे. पण भारताच्या या पहिल्या गुप्तहेर निरा आर्या यांना माझा साष्टांग दंडवत. एक कडक सॅल्यूट…. 

जय हिंद!!!

शब्दांकन श्री विनीत वर्तक   

(फोटो शोध सौजन्य :- गुगल )

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments