सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ मात… भाग – 4 (भावानुवाद) – सुश्री भावना ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(पूर्वसूत्र: अक्षय शालिनीला शाळेची नोकरी सोडून पांड्याजींची सेक्रेटरी व्हायला सांगतो. गरजेच्या वेळी ते मदत करतील, असंही सांगतो…. आता पुढे….)
आणि मग पुन्हा मासा गळाला लागला. ती सेक्रेटरी झाली.
हेही सांगितलं पाहिजे की माझ्या आग्रहावरून तिने आधीच तिचे लांब केस कापले होते. खूप प्रयत्नांनंतर ती स्लीव्हलेस ब्लाऊझ आणि हाय हिल सॅन्डल्स घालायला लागली होती. शेवटी तिचं रूपयौवन कोणाच्या खुशीसाठी होतं? माझ्याच ना? आता सगळेच खूश राहतील. मीही आणि पांड्याजीही.
दोन-चार दिवस सगळं व्यवस्थित चाललं. मी श्वास रोखून ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, तो आला एकदाचा.
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शालिनी ओक्साबोक्सी रडू लागली. पांड्याच्या गलिच्छ वागण्याने ती एवढी वैतागली होती, की मरण्यामारण्याच्या गोष्टी करू लागली. कितीतरी वेळ ती बोलत होती आणि मी ऐकत होतो.
किती मागासलेले संस्कार! आजकालच्या मुली एवढ्या बोल्ड आणि बिनधास्त असतात आणि माझ्या नशिबात साली ही काकूबाई लिहिलीय. कोणी नुसता स्पर्श केला, तरी कलंकित होणारी. माय फूट!
किती वेळ मी तिचं पावित्र्यावरचं लेक्चर ऐकत बसणार? शेवटी बोललोच, ” जराशी तडजोड करून जर आपलं आयुष्य सुधारणार असेल, तर काय हरकत आहे? जरा थंड डोक्याने विचार कर, शीलू. आपल्याला पांड्याची गरज आहे. त्याला आपली गरज नाहीय. या बारीकसारीक गोष्टींनी असा काय फरक पडतोय? “
ती विदीर्ण नजरेने बराच वेळ माझ्याकडे बघत राहिली. मग दाटलेल्या कंठाने बोलली, ” हो. काय फरक पडतोय!”
तिची नजर, तिचा स्वर यामुळे मी अस्वस्थ झालो. तरीही हसून बोलणार, तेवढ्यात तीच म्हणाली, “तू चांगले दिवस यायची किती वाट बघितलीस! आता येतील ते. असंच ना?”
माझ्या मनातलं तिच्या तोंडून ऐकल्यावर मी झेलपाटलोच. तरी स्वतःला सावरत म्हटलं, ” मला असं नव्हतं म्हणायचं, शीलू. तुझं सुख….. “
मला अर्ध्यावरच तोडत ती म्हणाली, “काही गोष्टी न बोलताही समजतात, अक्षय. तर पैशासाठी मी एखाद्या म्हाताऱ्याला गटवायचं, हेच ना?”
आता तुम्हीच सांगा, इतक्या दिवसांच्या प्रेमाची हिने अशी परतफेड करावी? प्रेम असं निभावतात? स्वार्थी!विश्वासघातकी बाई! जीवनाच्या वाटेवर चालताचालता मध्येच माझा हात सोडून दिला. शेवटी मीही तिचाच होतो ना? काय म्हणालात? मीच हात दाखवून अवलक्षण…..
आता काय सांगू? तिने माझ्या बापाशी लग्न केलं. आज ती माझी आई आहे. आणि माझ्या बापाला बोटांवर नाचवतेय. आत्ताच्या माझ्या या दशेला तीच कारणीभूत आहे. विश्वास नाही बसत?
क्रमशः ...
मूळ हिंदी कथा – सुश्री भावना
भावानुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈