डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ (अग्नि सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १२ ( अग्नि सूक्त )
ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे.
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
☆
अ॒ग्निं दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् । अ॒स्य य॒ज्ञस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ १ ॥
समस्त देवांचा अग्नी तर विश्वासू दूत
अर्पित हवि देवांना देण्या अग्नीचे हात
अग्नी ठायी वसले ज्ञान वेदांचे सामर्थ्य
आवाहन हे अग्निदेवा होउनिया आर्त ||१||
☆
अ॒ग्निम॑ग्निं॒ हवी॑मभिः॒ सदा॑ हवन्त वि॒श्पति॑म् । ह॒व्य॒वाहं॑ पुरुप्रि॒यम् ॥ २ ॥
मनुष्य जातीचा प्रिय राजा पवित्र अनलाग्नी
सकल देवतांप्रती नेतसे हविला पंचाग्नी
पुनःपुन्हा आवाहन करितो अग्नीदेवतेला
सत्वर यावे सुखी करावे शाश्वत आम्हाला ||२||
☆
अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह जज्ञा॒नो वृ॒क्तब॑र्हिषे । असि॒ होता॑ न॒ ईड्यः॑ ॥ ३ ॥
दर्भाग्रांना सोमरसातून काढूनिया सिद्ध
अर्पण करण्याला देवांना केले पूर्ण शुद्ध
हविर्भाग देवांना देशी पूज्य आम्हासी
सवे घेउनी समस्त देवा येथ साक्ष होशी ||३||
☆
ताँ उ॑श॒तो वि बो॑धय॒ यद॑ग्ने॒ यासि॑ दू॒त्यम् । दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ४ ॥
जावे अग्निदेवा होउनिया अमुचे दूत
कथन करी देवांना अमुच्या हवीचे महत्व
झणी येथ या देवांना हो तुम्ही सवे घेउनी
यज्ञवेदिवर विराज व्हावे तुम्ही दर्भासनी ||४||
☆
घृता॑हवन दीदिवः॒ प्रति॑ ष्म॒ रिष॑तो दह । अग्ने॒ त्वं र॑क्ष॒स्विनः॑ ॥ ५ ॥
सख्य करूनीया दैत्यांशी रिपू प्रबळ जाहला
प्राशुनिया घृत हवनाने तव प्रज्ज्वलीत ज्वाला
अरी जाळी तू ज्वालाशस्त्रे अम्हा करी निर्धोक
सुखी सुरक्षित अम्हास करी रे तुला आणभाक ||५||
☆
अ॒ग्निना॒ग्निः समि॑ध्यते क॒विर्गृ॒हप॑ति॒र्युवा॑ । ह॒व्य॒वाड् जु॒ह्वास्यः ॥ ६ ॥
स्वसामर्थ्ये प्रदीप्त अग्नी वृद्धिंगत होई
प्रज्ञा श्रेष्ठ बुद्धी अलौकिक गृहाधिपती होई
चिरयौवन हा सर्वभक्षक याचे मुख ज्वाळांत
मुखि घेउनी सकल हवींना देवतांप्रती नेत ||६||
☆
क॒विम॒ग्निमुप॑ स्तुहि स॒त्यध॑र्माणमध्व॒रे । दे॑वम॑मीव॒चात॑नम् ॥ ७ ॥
अग्नी ज्ञानी श्रेष्ठ देतसे जीवन निरामय
ब्रीद आपुले राखुनि आहे विश्वामध्ये सत्य
यज्ञामध्ये स्तवन करावे अग्नीदेवाचे
तया कृपेने यज्ञकार्य हे सिद्धीला जायचे ||७||
☆
यस्त्वाम॑ग्ने ह॒विष्प॑तिर्दू॒तं दे॑व सप॒र्यति॑ । तस्य॑ स्म प्रावि॒ता भ॑व ॥ ८ ॥
अग्निदेवा तुला जाणुनी देवांचा दूत
पूजन करितो हवी अर्पितो तुझिया ज्वाळात
यजमानावर कृपा असावी तुझीच रे शाश्वत
रक्षण त्याचे तुझेच कर्म प्रसन्न होइ मनात ||८||
☆
यो अ॒ग्निं दे॒ववी॑तये ह॒विष्माँ॑ आ॒विवा॑सति । तस्मै॑ पावक मृळय ॥ ९ ॥
प्रसन्न करण्या समस्त देवा तुम्हालाच पुजितो
यागामाजी यज्ञकर्ता तुमची सेवा करितो
सकल जनांना पावन करिता गार्हपत्य देवा
प्रसन्न होऊनी यजमानाला शाश्वत सुखात ठेवा ||९||
☆
स नः॑ पावक दीदि॒वोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒हा व॑ह । उप॑ य॒ज्ञं ह॒विश्च॑ नः ॥ १० ॥
विश्वाचे हो पावनकर्ते आवहनीय देवा
यज्ञामध्ये हवी अर्पिल्या आवसस्थ्य देवा
यज्ञ आमुचा फलदायी हो दक्षिणाग्नी देवा
सवे घेउनिया यावे यज्ञाला या समस्त देवा ||१०||
☆
स नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र गाय॒त्रेण॒ नवी॑यसा । र॑यिं वी॒रव॑ती॒मिष॑म् ॥ ११ ॥
अग्निदेवा तुमची कीर्ति दाही दिशा पसरली
गुंफुन स्तोत्रांमाजी मुक्तकंठाने गाइली
आशीर्वच द्या आम्हा आता धनसंपत्ती मिळो
तुझ्या प्रसादे आम्हापोटी वीर संतती मिळो ||११||
☆
अग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ विश्वा॑भिर्दे॒वहू॑तिभिः । इ॒मं स्तोमं॑ जुषस्व नः ॥ १२ ॥
प्रज्ज्वलित तुमची आभा ही विश्वाला व्यापिते
हवी अर्पितो समस्त देवांना तुमच्या ज्वालाते
प्रसन्न होउन अर्पियलेले हविर्भाग स्वीकारा
देऊनिया आशीर्वच आम्हा यज्ञा सिद्ध करा ||१२||
☆
हे सूक्त व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈